खलिस्तानी कधी डसतील याचा नेम नाही !

खलिस्तानी समर्थकांवर कॅनडातील भारतीय वंशाचे खासदार चंद्रा आर्य यांची टीका

कॅनडातील भारतीय वंशाचे खासदार चंद्रा आर्य (उजवीकडे)

ओटावा (कॅनडा) – कॅनडामध्ये येत्या ८ जुलैला खलिस्तानी समर्थकांकडून ‘किल इंडिया’ नावाने मोर्चा काढण्यात येणार आहे. या संदर्भात काही दिवसांपूर्वीच त्यांच्याकडून एक भित्तीपत्रक प्रसारित करण्यात आले आहे. यात भारतीय राजदूतांना ते खलिस्तानी आतंकवाद्यांचे मारेकरी असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या पार्श्‍वभूमीवर कॅनडातील भारतीय वंशाचे खासदार चंद्र आर्या यांनी खलिस्तानी समर्थकांवर नाव न घेता टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे, ‘आपल्या अंगणात साप असून त्याने फणा काढला आहे. तो केव्हा डसेल याचा नेम नाही.’ आर्य हे मूळचे कर्नाटकातील आहेत. ते कॅनडातील ‘लिबरल पार्टी’चे खासदार आहेत.

आर्य यांनी या संदर्भात एक ट्वीट केले आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, खलिस्तान समर्थक द्वेष आणि हिंसाचार पसरवत आहेत. यामुळे कॅनडातील लोकांचे अधिकार आणि स्वातंत्र्य यांचे हनन होत आहे. खलिस्तानी समर्थकांचे हे कृत्य लाजिरवाणे आहे. भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येचे समर्थन करत त्या दिवसाचा जल्लोष साजरा करण्यात आला. याचा एकाही लोकप्रतिनिधीने निषेध केला नाही. यामुळे त्यांची भीती चेपली गेली असून त्यांनी आता भारतीय राजदूतांवर आक्रमणे करणे चालू केले आहे.