१. वस्त्रसंहितेचे स्वागत आणि विरोध ! (वस्त्रसंहिता म्हणजे मंदिरात प्रवेश करतांना परिधान करायच्या कपड्यांसंबंधीची नियमावली)
सध्या मंदिरात वस्त्रसंहिता असावी का ? याविषयी जनमानसात आणि सामाजिक संकेतस्थळांवर मोठ्या प्रमाणावर चर्चा चालू आहे. या विषयाद्वारे ‘मंदिरात प्रवेश करतांना वस्त्र कसे असावे ?’, याविषयी संस्कार, तसेच संस्कृती यांविषयीची दिशा लक्षात येते. काही मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू झाल्यावर ‘सर्वत्र हे धोरण लागू व्हावे’, असे मत व्यक्त करण्यात आले. तुळजापूर येथे तुळजाभवानी मंदिराच्या ठिकाणी वस्त्रसंहितेच्या संदर्भातील फलक लावण्यात आला. काहींनी यावर आक्षेप घेतल्याने गदारोळ झाला. मग वस्त्रसंहिता मागे घेण्यात आली. तुळजापूर मंदिर देवस्थानच्या प्रशासक तहसीलदारांनी तो निर्णय मागे घेतला आणि ‘येथे कोणतेही निर्बंध लागू नाहीत’, असा फलक लावला. सप्तशृंगी गड ग्रामपंचायतीनेही त्यांच्या मासिक बैठकीत ठराव केला. हा ठराव संस्थानकडे दिला जाणार होता, त्याचे भाविकांकडून स्वागतही झाले; परंतु देवस्थानच्या व्यवस्थापकांनी ठराव आल्यानंतर ‘विश्वस्त आणि भाविक यांच्याशी चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाईल’, असे म्हणून वस्त्रसंहिता लागू नसल्याचे सांगितले.
२. स्वतःचा वेगळेपणा दाखवून परिस्थिती बिघडवणारे छगन भुजबळ !
‘मंदिरात अशी वस्त्रसंहिता लागू करणे, हा निव्वळ मूर्खपणा आहे’, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ म्हणाले. ‘मंदिरात असणारे पुजारीही अर्धनग्न अवस्थेत असतात. त्याचे काय ? त्यांना एखादा सदरा किंवा बंडी घालण्यासाठी सक्ती करावी’, अशी मागणी केली. अर्थात् विषयाला वेगळे वळण देण्याचा हा प्रयत्न असल्याचे स्पष्ट दिसते. विरोधासाठी विरोध म्हणून भाष्य करायचे आणि आपले वेगळेपण दाखवायचे, हे त्यांचे नेहमीचे आहे. देव, ब्राह्मण आणि पुजारी म्हटल्यानंतर त्यांनी त्याच्यावर भाष्य केले नाही, तर मग नवलच काय ? अशा प्रकारे विषयाला मूळ सूत्रापासून दूर नेण्याचे काम त्यांनी करायला नको. राहिला प्रश्न तो पुजार्यांचा ! पुजारी असला, तरी त्याच्याकडे पाहून काही कुणाची वासना जागृत होत नाही, हे भुजबळ यांनी लक्षात घ्यावे आणि उगीच प्रत्येक वेळी मंदिर, ब्राह्मण, पुजारी यांच्याविषयी काहीतरी बोलून परिस्थिती बिघडवावी, हे योग्य नाही.
३. वस्त्रसंहिता लागू व्हायला हवी अशी मंदिरे !
महाराष्ट्रातील प्रमुख मंदिरे जसे श्री गजानन महाराज मंदिर, शेगाव; श्री विठ्ठल मंदिर, पंढरपूर; श्री महालक्ष्मी मंदिर, मुंबई; श्री अष्टविनायक मंदिरे, महाराष्ट्रात असलेली ज्योतिर्लिंगे, राजुरीचे गणपति मंदिर, नाशिकचे काळाराम मंदिर, पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपति मंदिर, माहूरगड येथील रेणुकामाता मंदिर, अशा सर्वच मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू व्हायला हवी.
४. मंदिराचे पावित्र्य राखा !
वस्त्रसंहिता लागू झाल्यावर ज्यांना देवस्थानचे नियम पाळायचे नसतील, त्यांनी आपल्या घरी राहून पूजा करावी आणि मंदिरात यायचेच असेल, तर देवस्थानचे नियम पाळावेत. खरे तर निर्बंध घालायची वेळ येते, हीच गोष्ट लाजिरवाणी आहे. मंदिराचे पावित्र्य राखणे, हे आपल्या हातात आहे. मंदिराचे नियम पाळणे आवश्यक आहे; परंतु दानपेटीतील पैसे न्यून होऊ लागले; म्हणून निर्णय मागे घेतला जातो, हेही योग्य नाही.
५. संस्कृती आणि परंपरा जपली पाहिजे !
व्यक्तीस्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे ! ‘फॅशन’च्या नावाखाली इतरांना लाज वाटेल, असे पोषाख का घालावेत ? हिंदु समाजाने धर्मनिष्ठ रहायला हवे. हा निर्णय योग्यच आहे. आपणच आपली संस्कृती आणि परंपरा जपली पाहिजे. तिरुपती बालाजी मंदिर, पद्मनाभ मंदिर, तसेच स्वामीनारायण मंदिर अशा अजूनही काही ठिकाणी नियमावली लागू आहे आणि त्याप्रमाणेच दर्शन दिले जाते. मग इतर ठिकाणी तसे का होऊ नये ? समाजप्रबोधन करणारी प्रत्येक व्यक्ती, कीर्तनकार, प्रवचनकार यांनी यावर प्रबोधन करायला हवे.
सध्या कशा प्रकारचे पोषाख परिधान करावेत ? याचे बंधन नाही. त्यामुळे निरनिराळ्या वेशभूषा आणि कपडे बघायला मिळतात. अर्थात् प्रत्येकाची आवड निवड वेगळी असते. अंग झाकणारा ड्रेस असाही नको की, तो अगदी घट्ट बसावा की, ज्यातून शरिराचे एकेक अवयव स्पष्ट दिसतील. कधी कधी अर्धी (हाफ) ‘पँट’ घातल्यास मुले-मुली दोघांच्याही मांड्या दिसतात तशा !
६. नियमावलीची आवश्यकताच का भासते ?
‘भारतीय राज्यघटनेनुसार नागरिकांनी काय खावे ? काय प्यावे ? कुठली वेशभूषा परिधान करावी ? याचे स्वातंत्र्य आहे, तो प्रत्येकाचा हक्क आहे. मनामध्ये भक्तीभाव असावा. त्यामुळे अशी बंदी आणणे म्हणजे मूर्खपणा आहे’, असाही सूर उमटला. आता हा प्रश्न चर्चेचा आणि वादाचा न करता अशी नियमावली लावण्याची आवश्यकताच का निर्माण झाली ? हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे.
७. चांगल्या गोष्टींची बळजोरीच करावी लागते !
आपण स्वतःहून कुठलीही गोष्ट करायला सिद्ध नसतो. त्यामुळे नियम आणि कायदे करून ती बळजोरी आपल्यावर लादली जाते. असे होत नाही, तोपर्यंत आपण त्या गोष्टीचे पालन करत नाही. यामागील हेतू चांगला असल्यामुळे ती स्वेच्छेने स्वीकारायला आपण का पुढे येत नाही ? जर स्वीकारले गेले, तर मग बळजोरी किंवा नियम करण्याची आवश्यकताच नाही.
८. तरुणांसाठी आवश्यक सूत्रे
८ अ. तरुण परिधान करत असलेली इतरांना ओशाळायला लावणारी वेशभूषा ! : आता कुणाला काहीही सांगण्याचीही सोय राहिलेली नाही. मंदिरात येणार्या काही स्त्रियांच्या छातीचा भाग उघडा दिसतो. काही वेळा पाठीवर फक्त ब्लाऊजचे बंद बांधलेले असतात. फॅशनच्या नावाखाली पाठ आणि पोट उघडेच असते. त्यामुळे बघणारा माणूस ओशाळतो. काही मुले-मुली जागोजागी फाटलेल्या पँट घालतात, काय तर ही नवीन फॅशन आहे ! पायाच्या पोटरीवर, मांड्यांवर त्या फाटलेल्या असतात. काही वेळा पंजाबी पोशाख परिधान केल्यावरही अनेक मुली ओढणी घेत नाहीत. ओढणी असली, तरी ती गळ्याभोवती आवळलेली असते. पोशाखाचा गळा मोठा असल्यास त्यातून छातीचा भाग दिसतोच. असे कपडे घातल्यावर कुणाचेही लक्ष तिकडे जाणारच ना ! अगदी वयस्कर माणूस असो किंवा तरुण मुलगा असो, अशाने मंदिरातील पावित्र्य कसे टिकून रहाणार ?
८ आ. भाविकांचे चित्त विचलित करू नका ! : मोठमोठ्या ऋषींची तपश्चर्या रंभा, मेनका, अप्सरा यांच्या आविर्भावाने भंग पावली, तर आपण काय सामान्य माणूस ! अशा प्रकारांतून दर्शनासाठी आलेल्या भाविकांचे चित्त विचलित होते. त्यांची नजर सतत तिकडे जाते, त्यांच्या भावना चाळवल्या जातात. हे स्वाभाविक आहे. अर्थात्च मंदिरात अशा गोष्टी घडणे योग्य नाही. आपण भक्तीभावाने मंदिरात जाऊन प्रार्थना किंवा उपासना करतो. त्यामुळे अशा ठिकाणी तरी स्त्री-पुरुषांनी हे भान ठेवावे.
८ इ. मंदिरात जातांना भान ठेवा ! : बर्याच मंदिरामध्ये चांगले वातावरण असावे; म्हणून आजूबाजूला बगीचा किंवा फुलझाडे असलेल्या ठिकाणी तरुण मुला-मुलींचा प्रेमालाप चालू असतो. या सगळ्यांवर बंधने हवीतच. त्यात जर कुणी काही सुचवले, तर त्याचा विपर्यास आणि गदारोळ न करता ते स्वीकाराला हवे. चांगल्या गोष्टीसाठी विरोध कशाला ? तुम्हाला हवे तसे ड्रेस घालायचे असतील, तर ते पर्यटनस्थळी घालावेत किंवा भटकंतीला जातांना घालावेत; कारण कुठलाही ड्रेस घातल्यानंतर आपण कसे दिसतो, हे कुणीतरी बघावे, ही सुप्त इच्छा-अपेक्षा असतेच; पण ती मंदिरात नसावी.
८ ई. तरुणांनी दायित्वशून्यतेने वागू नये ! : ‘मंदिरे ही धर्म आणि संस्कृती संरक्षण, संवर्धन करणारी केंद्रे असावीत’, असा विश्वास स्वामी विवेकानंद यांनी व्यक्त केला होता. त्यांचे पावित्र्य जपणे आणि टिकवून ठेवणे हे आपल्या हातीच आहे. स्वामी विवेकानंद यांना तरुणांकडून पुष्कळ अपेक्षा होत्या. ‘त्यांनी दायित्वशून्यतेने वागू नये’, असे त्यांना वाटायचे.
९. मंदिरांची पर्यटनस्थळे होऊ नयेत !
धर्म आणि संस्कृती यांच्या रक्षणासाठी महाराष्ट्र मंदिर महासंघ अन् हिंदु जनजागृती समिती यांनी या कार्यात सहभाग घेतला आहे, ही चांगलीच गोष्ट आहे. त्यांना आपण सगळ्यांनी सहकार्य करावे. मंदिर व्यवस्थापन समितीने यात प्रामुख्याने सहभाग नोंदवावा. शासन धार्मिक स्थळे, मंदिरे, गडदुर्ग यांच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देत असते. त्यासाठी त्यांना पर्यटनस्थळाचा दर्जा देत असते. अशांना धार्मिक स्थळांचा दर्जा देऊन विकास अवश्य करावा. त्यांचे संवर्धन आवश्यक आहे; परंतु पर्यटकानांही नियम हवेतच. मंदिरांची पर्यटनस्थळे होऊ नयेत, एवढाच यामागील उद्देश आहे. (२५.६.२०२३)
– श्री. दिलीप देशपांडे, जामनेर, जिल्हा जळगाव. (संपर्क क्रमांक – ८९९९५६६९१७)