‘संतुलित आहार’ हा शब्द ऐकताच प्रथिने, पिष्टमय पदार्थ, असे शब्द आपल्या डोळ्यांसमोर येतात; परंतु आयुर्वेदाच्या दृष्टीने आपल्या आहारामध्ये ६ चवीचे (षड् रस) पदार्थ असतील, तर तो संतुलित आहार समजला जातो. आपण मागील एका लेखामध्ये ६ चवी कोणत्या हे जाणून घेतले होते. त्या पुढीलप्रमाणे आहेत.
हे ६ चवींचे पदार्थ आपण प्रतिदिन सेवन केले पाहिजे. त्यामुळे आपल्या शरिरातील दोष, धातू आणि मल संतुलित राहून आपण निरोगी रहातो. एकाच चवीचे अन्न सतत सेवन केले, तर रोग निर्माण होतात. उदाहरणार्थ, आपण केवळ गोडच पदार्थ सेवन केले, तर जंत होणे, वजन वाढणे, दात किडणे असे त्रास होतात. अती प्रमाणात मीठ सेवन केल्यास रक्तदाब वाढतो. आंबट लोणची अती प्रमाणात सेवन केली, तर पित्त होते इत्यादी. आपले ताट हे ६ रसांनी युक्त असायला हवे. आता आपण प्रत्येक चवीची विस्तृत माहिती बघूया.
१. मधुर रस
मधुर रस योग्य प्रमाणात घेणे अतिशय पौष्टिक आहे. त्यामुळे शरिरातील रस, मांस, मेद, मज्जा आणि शुक्र या धातूंची वाढ होते. केवळ साखर आणि गूळ घातलेले गोड चवीचे पदार्थ नाहीत, तर जे पदार्थ सेवन केल्याने छातीत जळजळ न होणे, आंबट करपट ढेकरा न येणे, वजन वाढणे, कफदोष वाढणे, वातदोष आणि पित्त अल्प होणे, असे परिणाम होतात, ते सगळे घटक मधुर रसाचे म्हणून ओळखले जातात. उदाहरणार्थ, दूध, तूप, मध, गूळ, मूग, द्राक्षे, मनुका, आंबा, खजूर, केळे, दुधी भोपळा, पडवळ, पालक, कोबी, शिंगाडे, तांदूळ, गहू, मका इत्यादी.
ज्या व्यक्तींना वजन वाढवायचे आहे, त्यांनी गोड पदार्थ आणि गोड चवीच्या भाज्या खाव्यात. ज्या व्यक्तींना पुष्कळ थकवा आलेला आहे, त्यांनी गोड चवीचे पदार्थ खावेत. गोड रस थंड असतो आणि पित्त अल्प करतो. त्यामुळे ज्यांना अल्सर आणि आम्लपित्त यांचा त्रास आहे, त्यांनी दुधी भोपळा, भेंडी, पडवळ, कोबी या गोडसर भाज्या अधिक प्रमाणात खाव्यात.
गोड पदार्थ, म्हणजे पक्वान्न (श्रीखंड, बासुंदी, मिल्क शेक) पचायला जड असतात. त्यामुळे ती अल्प प्रमाणातच खावीत. मधुर रसाचे अतीप्रमाणात सेवन केल्यास चरबी वाढणे, आळस येणे, सुस्ती येणे, मधुमेह होणे, जंत होणे, दात कीडणे, स्थूलता येणे, असे त्रास होतात.
२. आम्ल रस
आंबट रस हा चव उत्पन्न करणारा आणि पचन योग्य घडवून आणणारा आहे. आंबट चवीच्या पदार्थांचा विचार जरी केला, तरी आपल्या तोंडाला पाणी सुटते. चिंचेचे नाव घेतल्यानंतर तोंडाला पाणी सुटणार नाही, असे होणारच नाही. लिंबू, चिंच, कोकम हे पदार्थ, तर अंबाडी, आंबटचुका या भाज्या आणि संत्री, मोसंबी, बोर, करवंद, डाळिंब, ही फळे अम्ल रसाची आहेत. आम्ल रस योग्य प्रमाणात घेतल्यास तो सारक आणि पोटातील वायू अल्प करणारा आहे. त्यामुळे पोहे, भात यांवर लिंबाची एखादी फोड घेणे योग्य ठरते. थोड्या प्रमाणात वापरलेला लिंबूरस आणि चिंच हे पदार्थ पाचक असून भूक वाढवणारे आहेत. आम्लरस अती प्रमाणात सेवन केल्यास दात आणि हिरड्या सैल होणे, केस पांढरे होणे, त्वचेला खाज सुटणे, पुरळ येणे, पित्त वाढणे, उष्णता वाढून जळजळ होणे, त्वचेचा घट्टपणा अल्प होणे, त्वचेला सुरकुत्या पडणे, असे त्रास होतात.
पित्त प्रकृतीच्या व्यक्तींनी आंबट पदार्थ अगदी अल्प खावेत; पण वात प्रकृतीच्या व्यक्तींनी त्यांच्या आहारात आम्ल रसाचा अल्प प्रमाणात वापर करण्यास हरकत नाही.
३. लवण रस
आपल्या आहारामध्ये अनन्य साधारण महत्त्व असलेला; पण अत्यल्प प्रमाणात लागणारा हा रस आहे. जेवणात योग्य प्रमाणात मीठ असेल, तर ते जेवण रुचकर लागते. मिठामुळे अन्नपचन आणि त्याचे शोषण चांगले होते. मिठामुळे अन्नाला मऊपणा येतो आणि त्यामुळे आपल्या पोटातील पाचकस्त्राव अन्नासमवेत मिसळतात. मीठ हे उष्ण आहे. त्यामुळे ते वात आणि कफ न्यून करणारे आहे. आपल्या आहारात सैंधव मिठाचा वापर आवर्जून करायला हवा. सैंधव मीठ हे हृदय आणि डोळे यांसाठी आरोग्यकारक आहे. काही जणांना भूक लागत नसल्यास आल्याच्या रसासह सैंधव मीठ खायला दिल्यास चवीने जेवण होते.
खारट पदार्थ (लोणची, पापड, वेफर्स) अधिक प्रमाणात सेवन केल्यास केस अकाली पांढरे होणे, केस गळणे, दाह होणे, सतत तहान लागणे, त्वचारोग, उच्च रक्तदाब असे आजार निर्माण होतात. त्यामुळे आपल्या आहारामध्ये खारट चवीचे पदार्थ अत्यल्प प्रमाणात असावेत. स्थूल आणि आम्लपित्ताचा त्रास असणार्या व्यक्तींनी मीठ अल्प खावे.
४. तिखट रस
ज्या रसामुळे तोंड आणि हात यांची आग होते, जो रस नाक आणि डोळे यांमधून पाणी आणतो, तो तिखट रस होय. आपल्या आहारामध्ये तिखटपणा थोड्या प्रमाणात असणे, हे पचन आणि आरोग्य यांच्या दृष्टीने आवश्यक आहे. मिरची, मिरी हिंग, कांदा, लसूण, सुंठ, मोहरी, पिंपळी आणि मुळा हे आपल्या प्रतिदिन वापरातील तिखट चवीचे पदार्थ होय. तिखट चव हा शरिरातील मेद धातू आणि कफ अल्प करणारा आहे. प्रतिदिन आपल्या आहारामध्ये तिखट चव अल्प प्रमाणात असेल, तर अन्नाचे शोषण व्यवस्थित होते.
अतीप्रमाणात तिखट चवीचे पदार्थ सेवन केल्यास तोंड येणे, तोंड कोरडे पडून तहान लागणे, त्वचा निस्तेज आणि कोरडी दिसणे, आपल्या शरिरातील धातूंची गुणवत्ता अल्प होणे, असे परिणाम होतात. तिखट पदार्थांमुळे शरिराची झीज लवकर होते आणि अकाली वार्धक्याची लक्षणे दिसू शकतात. अतीतिखट चवीचे पदार्थ खाणे पोटातील व्रणाला आमंत्रण देतात. पित्त आणि वात प्रकृतीच्या व्यक्तींना तिखट चव त्रासदायक ठरते. कफ प्रकृतीच्या व्यक्तींनी तिखट चवीचे पदार्थ सेवन केल्यास त्यांना तेवढा त्रास होत नाही.
५. कडू रस
जिभेला अप्रिय असणारी चव, म्हणजे कडू चव होय. कडू रस रक्त शुद्ध करणारा आहे. पचनानंतर सिद्ध होणार्या अन्न रसाचे शोषणही कडू रस करत असतो. त्वचेचा तेलकटपणा अल्प करून त्वचा स्वच्छ करतो. आपल्या आहारात कारली, मेथी, गवार, हळद इत्यादी कडू चवीचे पदार्थ येतात. कडू रस पित्ताची उष्णता अल्प करणारा आहे. कडू रसामुळे गर्भवतीमध्ये दुधाची निर्मिती होण्यास साहाय्य होते. त्यामुळे गर्भारपणात मेथीचे लाडू आणि मेथीची भाजी करण्याची पद्धत आहे. हळदीचा कडूपणा कफ अल्प करतो. त्यामुळे घसा दुखणे आणि घसा बसणे यांवर हळदीचे दूध घेणे लाभदायक ठरते. पित्त प्रकृतीच्या व्यक्तींनी पित्त अल्प करण्यासाठी कडू भाज्या खाव्यात. वात प्रकृतीच्या व्यक्तींनी मात्र अल्प प्रमाणात कडू भाज्या खाव्यात.
६. तुरट रस
तुरट चवीचे पदार्थ सेवन केल्याने तोंड कोरडे पडून तहान लागते. या चवीचे पदार्थ शरिरातील पाण्याचे प्रमाण अल्प करतात. तसेच ते कफ दोष आणि मेद धातू अल्प करतात. तुरट चव पित्त अल्प करणारी आहे. आवळा, जांभूळ, उंबर, हिरडा आणि सुपारी हे काही तुरट चवीचे पदार्थ आहेत.
मधुमेही रुग्ण, स्थूल व्यक्ती आणि पित्ताचा त्रास असणारे व्यक्ती यांनी तुरट चवीचे पदार्थ खावेत. वात प्रकृतीच्या व्यक्तीने मात्र तुरट चवीचे पदार्थ अल्प प्रमाणात खावे. तुरट चवीचे पदार्थ अती प्रमाणात सेवन केल्यास तहान लागणे, शरीर दुर्बल होणे, मलबद्धता होणे, गॅसेस होणे आणि संधिवात, हे विकार होऊ शकतात. तुरट चवीचे बहुगुणी फळ म्हणजे आवळा ! आवळ्यापासून सिद्ध केलेला मोरावळा किंवा आवळा सुपारी मुखशुद्धीकारक आणि पाचकही असते. त्यामुळे तुरट रसाचा आवळा सेवन करणे अतिशय उपयुक्त ठरते.
अशा पद्धतीने आपण आपल्या आहारातील ६ चवींचे महत्त्व पाहिले. तेव्हा आपल्या आहारामध्ये आपल्या प्रकृतीनुसार कोणत्या चवीचे पदार्थ किती प्रमाणात असायला हवे, याचा अभ्यास करता येईल. जेवणाचा प्रारंभ भात आणि पोळी अशा गोड चवीच्या पदार्थांनी, तर शेवट तुरट चवीच्या पदार्थांनी करावा.’
– वैद्या (सौ.) मुक्ता लोटलीकर, पुणे. (२.७.२०२३)