राजकारणाची ऐशीतैशी !

लोकशाहीच्‍या मूल्‍यांचे अवमूल्‍यन करणारा राजकारणातील गोंधळ संपवण्‍यासाठी पितृशाही हवी !

सध्‍या महाराष्‍ट्राच्‍या राजकारणात जे काही चालू आहे, तशी उलथापालथ आतापर्यंत भारतातच काय जगातील अन्‍य कुठल्‍या देशांतील राज्‍यातही झाली असेल, असे वाटत नाही. सध्‍याच्‍या घडीला तरी राज्‍यातील जनतेपुढे अलिप्‍त राहून ‘जे जे होईल ते ते पहावे’ असेच बाकी रहात आहे. त्‍यामुळे सध्‍या तरी सामाजिक माध्‍यमांतून विविध चुटके आणि मागील प्रसंगांचे स्‍मरण यांना ऊत आला आहे. एकाने म्‍हटले ‘महाराष्‍ट्राचा प्रमुख खेळ ‘पक्षफोडी’ घोषित करावा.’ यातील विनोदाचा भाग सोडला, तरी मनसेचे राज ठाकरे यांनी म्‍हटल्‍याप्रमाणेे, ‘आता शत्रू कोण आणि मित्र कोण ? काहीच कळेनासे झाले आहे’, हे मात्र अगदी खरे आहे. एकाने फेसबुकवर म्‍हटले आहे, ‘काळे केलेले चेहरे स्‍वच्‍छ केले.’ दुसर्‍या एकाने फेसबुवर म्‍हटले आता ‘सीबीआय आणि ईडीवाले खुश होऊन कार्यालयांना कुलुपे लावून शांत बसतील.’ एका वाहिनीने मथळा दिला, ‘आता सोमय्‍यांचे काय होणार ?’ या प्रतिक्रिया अत्‍यंत बोलक्‍या आहेत. सर्वसामान्‍यांच्‍या मनातील आहेत. असो ! राजकारणी सारवासारव करण्‍यात पटाईत असतात. त्‍यामुळे याला मोठ्या सराईतपणे ते बगल देतील, यात काही नवल नाही. सामान्‍य मतदारांची अशीच भावना आहे की, जसे भाजपने पूर्वी काश्‍मीरमध्‍ये देशद्रोही पीडीपीशी युती करून त्‍याचा लाभ उठवून ३७० कलम हटवले, तसेच सध्‍याच्‍या घडामोडींतूनही चांगले काहीतरी देशहितकारी निष्‍पन्‍न होऊ दे. त्‍यामुळे आणखी काही दिवस वाट पहाण्‍यास जनता सिद्ध आहे. अंमलबजावणी संचालनालयाच्‍या ज्‍या अधिकार्‍यांनी प्रामाणिकपणे भ्रष्‍टाचार्‍यांचा सखोल अभ्‍यास करून कारवाया केल्‍या असतील, त्‍यांचे खच्‍चीकरण होण्‍याचीही शक्‍यता नाकारता येत नाही. तसे झाले, तर देश भ्रष्‍टाचारमुक्‍त करण्‍याच्‍या पंतप्रधानांच्‍या स्‍वप्‍नातील तो एक फार मोठा अडथळा ठरेल. त्‍यामुळे ‘यापुढे कुठले अधिकारी कुणाचा भ्रष्‍टाचार सचोटीने बाहेर काढण्‍यास पुढाकार घेतील का ?’, असा गंभीर प्रश्‍न निर्माण होऊ शकतो.

या सत्तानाट्याविषयी प्रतिक्रिया व्‍यक्‍त करतांना अभिनेते शरद पोंक्षे यांनी म्‍हटले, ‘तत्त्व, वैचारिक बैठक, नीतीमत्ता हे शब्‍द आज वारले’, तर प्रसिद्ध अधिवक्‍ता उज्‍ज्‍वल निकम यांनी म्‍हटले आहे, ‘सध्‍या राजकारणात एकाच्‍या नावाने गृहप्रवेश, दुसर्‍याच्‍या नावाने मंगळसूत्र, तिसर्‍याच्‍या नावाने संसार आणि गर्भ चौथ्‍याचाच, असे चालू आहे.’ यातील अतिशयोक्‍ती सोडली, तरी ‘युद्ध आणि प्रेम यांत सर्वकाही चालते’ या इंग्रजी म्‍हणीप्रमाणे ‘राजकारणातही ‘सर्व काही चालते’ असेच सध्‍याच्‍या परिस्‍थितीवरून कुणालाही म्‍हणावेसे वाटल्‍यास गैर नाही. हे सारे पाहून प्रत्‍येकाची त्‍याच्‍या त्‍याच्‍या प्रवृत्तीप्रमाणे प्रतिक्रिया व्‍यक्‍त होईल. कुणी थट्टा करून मनोरंजन करून घेईल, कुणी उपहासात्‍मक बोलेल, कुणाला राग येईल, तर कुणी दुर्लक्ष करून सोडून देईल. काही संवेदनशील माणसांना हे सारे पाहून निराशाही येईल. त्‍यामुळे एकाने सामाजिक माध्‍यमावर म्‍हटले आहे, ‘सध्‍याचे राजकारण आपल्‍या समजण्‍यापलीकडचे आहे, त्‍यामुळे आपण आपल्‍या डोक्‍याचा भुगा का करून घ्‍यावा ?’ तरीही काही आशावादी त्‍यांच्‍या बुद्धीप्रमाणे राज्‍यात झालेल्‍या राजकीय घडामोडींविषयी विविध तर्क लावत आहेत. काही जण म्‍हणत आहेत, ‘औरंगजेबाविरुद्ध लढण्‍यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनीही निजामशाही, कुतुबशाही यांचे साहाय्‍य घेतले होते.’ काही जण इतिहासाचे दाखले देत म्‍हणत आहेत, ‘छत्रपती शिवाजी महाराजांनीही छत्रपती संभाजी महाराजांना स्‍वतःहून मोगलांकडे पाठवले होते.’ तर काहींना नाना फडणवीस आणि महादजी शिंदे यांच्‍या पेशवाईतील राजकारणाची आठवण होत आहे.

सत्तेसाठी…?

‘आपत्‌धर्मात आणि शासनधर्मातही राष्‍ट्रवादी काँग्रेसशी युती करणार नाही, अविवाहित राहीन; पण राष्‍ट्रवादीशी युती करणार नाही’, असे देवेंद्र फडणवीस काही वर्षांपूर्वी एका वाहिनीवरील मुलाखतीत म्‍हणाल्‍याचे ‘व्‍हिडिओ’ सध्‍या प्रसारित होत आहेत. ‘सत्तेसाठी भाजप काहीही करू शकतो, हे मला दाखवायचे होते; म्‍हणून मी पहाटेचा शपथविधी होऊ दिला’, ही शरद पवार यांनी अंगाशी आल्‍यावर नुकतीच टाकलेली गुगली या पार्श्‍वभूमीवर अधोरेखित होते. कुणी म्‍हणत आहे, ‘पवारांच्‍या संमतीविना हे शक्‍य नाही’, तर कुणी म्‍हणत आहेत, भाजपच्‍या विरोधात देशपातळीवर होणारी विरोधी पक्षांची संभाव्‍य ताकद न्‍यून करायला भाजपने हे केले आहे. ‘तांत्रिकदृष्‍ट्या शिंदे गटातील आमदार न्‍यून होण्‍याची शक्‍यता वाढल्‍याने हा ‘दुसरा पर्याय’ भाजपने सिद्ध ठेवला’, अशाही चर्चा होत आहेत. कहर म्‍हणजे एका गटावर नेटकर्‍याने म्‍हटले आहे, ‘अतर्क्‍य, अभ्‍यासू, राजकारण करणारा थंड डोक्‍याचा, चेहर्‍यावर कमालीचे निर्मळ हसू असणारा हा माणूस शिकार टप्‍प्‍यात येण्‍याची वाट बघत नाही. टप्‍प्‍यात शिकार आणतो.’

ज्‍या कारणासाठी मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेतून बाहेर पडले, त्‍याच सगळ्‍या वैचारिक आणि तत्त्वनिष्‍ठेशी तडजोड केल्‍यामुळे येणार्‍या मानसिक अडचणी पुन्‍हा येण्‍याची दाट शक्‍यता या महायुतीमुळे निर्माण झाली आहे. शिवसेनेच्‍या लोकांनी कितीही नाही म्‍हटले, तरी मविआमध्‍ये निवडणुका लढवतांना त्‍यांना स्‍थानिक पातळीवर ज्‍या अडचणी येत होत्‍या, त्‍याच अडचणी आताही येण्‍याची शक्‍यता आहे. दोन पक्षांचे विभाजन झाल्‍याने त्‍यांच्‍या सर्व घटनात्‍मक तांत्रिकदृष्‍ट्या गोष्‍टी जुळवता जुळवता नाकी नऊ येणार आहेत. पक्षांतर्गत ताकद वाढवणे आणि युतीतील ताकद कायम ठेवणे, हे राजकारण करतांना जनतेच्‍या कामांचे काय होणार ? हा प्रश्‍न आहेच. वरील सर्व सूत्रे पहाता लोकशाहीच्‍या मूल्‍यांना किती ठिकाणी आणि किती प्रमाणात तडा जात आहे ? याची गणतीच करता येणार नाही. हा सर्व गोंधळात गोंधळ पहाता रामराज्‍य देणारी पितृशाही हीच कशी राज्‍यशकट चालवण्‍यासाठी सर्वश्रेष्‍ठ आहे, हे सामान्‍य जनतेने मनावर बिंबवून घेतले पाहिजे !