दोडामार्ग – २७ जून या दिवशी असणार्या दोडामार्ग तालुका वर्धापनदिनाच्या पार्श्वभूमीवर येथील ‘सुशिला हॉल’मध्ये दोडामार्ग तालुका पत्रकार समितीच्या वतीने पुरस्कार वितरण आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या वेळी दैनिक ‘सनातन प्रभात’चे पत्रकार श्री. सुनील नांगरे यांचा ‘उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला. यासह अन्य पत्रकार आणि तालुक्यातील इयत्ता १० वी आणि १२ वीच्या परीक्षांतील गुणवंत विद्यार्थी अन् चांगला निकाल लागलेल्या शाळांचे मुख्याध्यापक यांचाही सत्कार करण्यात आला. दोडामार्ग तालुका पत्रकार समिती आणि श्रीमती सुशिलाबाई मेमोरियल ट्रस्ट दोडामार्ग यांच्या संयुक्त विद्यमाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी जिल्हा पत्रकारसंघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, तहसीलदार अरुण खानोलकर, नगराध्यक्ष चेतन चव्हाण, पोलीस निरीक्षक अरुण पवार, तालुका पत्रकार समितीचे अध्यक्ष संदीप देसाई, सचिव गणपत डांगी, जिल्हा कार्यकारिणी सदस्य लखू खरवत, पत्रकार समितीचे माजी अध्यक्ष प्रभाकर धुरी, सुहास देसाई यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
‘श्रीमती सुशिलाबाई मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्ट’ दोडामार्गचे अध्यक्ष तथा उद्योजक विवेकानंद नाईक म्हणाले, ‘‘केवळ आर्थिक श्रीमंती प्राप्त करण्यासाठी अभ्यास करू नका, तर तुमची श्रीमंती ही तुमचे संस्कार, ज्ञान आणि दानधर्म यांतून समाजाला दिसायला हवी.’’ जिल्हा पत्रकारसंघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर म्हणाले, ‘‘पत्रकारांना पत्रकारांच्या समितीकडूनच सन्मान मिळणे, हे कौतुकास्पद असून हे कार्य दोडामार्ग तालुका पत्रकार समितीने यशस्वीरित्या पार पाडले. पत्रकार हे लोकशाहीचे चौथे स्तंभ असून आपल्या जिल्ह्यातील पत्रकार हे नेहमी आपल्या लेखणीतून समाजाला योग्य दिशा आणि पीडित घटकाला योग्य न्याय देण्याचेही काम नेहमी करत असतात.’’
सन्मानित इतर पुरस्कारार्थी !
‘उदयोन्मुख पत्रकारिता पुरस्कार’ गजानन बोंद्रे आणि ओम देसाई यांना आणि ‘दोडामार्ग तालुका उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार’ दैनिक ‘तरुण भारत संवाद’चे पत्रकार तेजस देसाई यांना प्रदान करण्यात आले. सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, शाल आणि श्रीफळ, असे पुरस्काराचे स्वरूप होते.