तीर्थक्षेत्रे आणि मंदिरे यांचा परिसर ‘मद्य-मांस मुक्‍त’ करा !

  • पंढरपूर येथे वारकरी अधिवेशनात एकमुखी मागणी वस्‍त्रसंहिता लागू करण्‍याचीही मागणी !

  • हिदु धर्मावरील आघातांना उत्तर देण्‍यासाठी संघटित होण्‍याविषयी वारकरी आणि हिदुत्‍वनिष्‍ठ यांचे अधिवेशनात एकमत !

(वस्‍त्रसंहिता म्‍हणजे मंदिरात प्रवेश करतांना परिधान करायच्‍या कपड्यांच्‍या संदर्भातील नियमावली)

पंढरपूर – ‘हरिद्वार’ आणि ‘ऋषिकेश’ या तीर्थक्षेत्रांप्रमाणे महाराष्‍ट्रातील श्रीक्षेत्र पंढरपूर, देहू, आळंदी, पैठण आदी तीर्थक्षेत्रांसह सर्व मंदिरांचा परिसर १०० टक्‍के ‘मद्य-मांस मुक्‍त’ करण्‍यात यावा, अशी एकमुखी मागणी पंढरपूर येथे झालेल्‍या वारकरी अधिवेशनात करण्‍यात आली. यासह पंढरपूर येथील चंद्रभागा नदीत आणि आळंदी येथील इंद्रायणी नदीत सांडपाणी सोडण्‍यावर बंदी घालावी, तसेच सर्व तीर्थक्षेत्रे अन् मंदिर येथे ‘वस्‍त्रसंहिता लागू करावी, अशाही मागण्‍या या वेळी करण्‍यात आल्‍या.

वारकर्‍यांच्‍या विविध प्रश्‍नांसाठी ३० जून या दिवशी परमपूज्‍य श्री बालयोगी महाराज मठ, दत्तघाट येथे वारकरी संप्रदाय, हिंदु जनजागृती समिती आणि परमहंस परिव्राजकाचार्य श्री स्‍वामी नारायणानंद सरस्‍वती यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने हे अधिवेशन आयोजित करण्‍यात आले होते. या अधिवेशनात अनेक संत-महंत, ह.भ.प. (हरिभक्‍त परायण), धर्माचार्य आणि हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांचे प्रमुख यांनी मार्गदर्शन केले.

‘हलाल जिहाद’ रोखण्‍यासाठी वारकरी संप्रदायाने हिंदूंचे प्रबोधन करावे ! – ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ

वारकरी संप्रदायात हिंदुत्‍वाचे कार्य करण्‍याची शक्‍ती आहे, हे वैकुंठवासी वक्‍ते महाराज यांनी दाखवून दिले होते. ‘हलाल जिहाद’ रोखण्‍यासाठी वारकरी संप्रदायाने हिंदूंचे प्रबोधन केले पाहिजे. यापुढील काळात कीर्तनकारांचे प्रबोधन करण्‍यासाठी त्‍यांचे अधिवेशन घेण्‍याची आवश्‍यकता आहे. जे ‘पाकिस्‍तान झिंदाबाद’ म्‍हणतात त्‍यांना त्‍याच भाषेत प्रत्‍युत्तर देण्‍याची आवश्‍यकता आहे.’’

तीर्थक्षेत्राच्‍या ठिकाणी मद्य-मांस विक्रीवरील बंदीसाठी कायदा हवा ! – ह.भ.प. रामेश्‍वर शास्‍त्री महाराज

ह.भ.प. रामेश्‍वर शास्‍त्री महाराज

पंढरपूर पवित्र तीर्थक्षेत्र असूनही येथे सर्रास मांसविक्री होते. तीर्थक्षेत्री मद्य-मांस विक्रीवरील बंदीसाठी कठोर कायदा व्‍हावा. यासाठी समस्‍त वारकरी आणि हिंदू यांनी सरकारवर दबाव आणायला हवा. या कायद्यांची शासनाने कार्यवाही करायला हवी. राज्‍यातील कीर्तनकारांनी या विषयांवर समाजाचे प्रबोधन करावे, जागृती करावी. त्‍यासाठी कीर्तनकारांनी संघटित होऊन प्रयत्न करावेत.’’

अधिवेशनात करण्‍यात आलेले विविध ठराव !

सर्व मंदिरे सरकारच्‍या कह्यातून मुक्‍त करावीत, हलाल प्रमाणपत्र असलेल्‍या उत्‍पादनांवर बहिष्‍कार घालावा, गोवंशहत्‍या बंदी कायद्याची कठोर कार्यवाही करावी, लव्‍ह जिहाद आणि धर्मांतरबंदी हे कायदे लागू करावेत, हिंदु देवता, संत, श्रद्धास्‍थानांचे विडंबन रोखण्‍यासाठी कठोर कायदा करावा, गायरान भूमींवरील अतिक्रमण हटवून त्‍या भूमी गोमातेसाठी संरक्षित करण्‍यात याव्‍यात, गीता-रामायण, तसेच संत साहित्‍याचा अभ्‍यासक्रमात समावेश करावा, यांसह अनेक ठराव या अधिवेशनात संमत करण्‍यात आले.


हिदु धर्मावरील आघातांना उत्तर देण्‍यासाठी संघटित होण्‍याविषयी वारकरी आणि हिदुत्‍वनिष्‍ठ यांचे अधिवेशनात एकमत !

पंढरपूर येथे वारकरी अधिवेशन

वारकरी अधिवेशनात विविध ठरावांना हात उंचावून अनुमोदन देताना वारकरी

पंढरपूर – येथे पार पडलेल्‍या वारकरी अधिवेशनात वारकरी आणि हिंदुत्‍वनिष्‍ठ वक्‍ते सहभागी झाले होते. हिंदु धर्मावर विविध माध्‍यमांतून होणार्‍या आघातांच्‍या विरोधात संघटित होण्‍यावर सर्वांचे एकमत झाले.

कुणाचेही हिंदु धर्मावर आक्रमण करण्‍याचे धाडस होणार नाही ! – ह.भ.प. मारुति महाराज तुणतुणे

वैदिक धर्म हा अनादी-अनंत असून त्‍याची परंपरा अब्‍जावधी वर्षांची आहे. त्‍याचा आपल्‍याला अभिमान नसल्‍याने परधर्मियांचे आपल्‍यावर आक्रमण होत आहे. वारकर्‍यांनी कोणत्‍याही परिस्‍थितीत दिंडीत परधर्मियांना प्रवेश देता कामा नये. कलियुगात संघटित राहिल्‍यानेच प्रत्‍युत्तर देता येते. त्‍यामुळे आपण जर संघटित झालो, तर कुणाचेही हिंदु धर्मावर आक्रमण करण्‍याचे धाडस होणार नाही.

या प्रसंगी ह.भ.प. नरहरी महाराज चौधरी म्‍हणाले, ‘‘सध्‍या शैक्षणिक क्षेत्रातही धर्मांध प्रवृत्तींचे अतिक्रमण चालू आहे. शालेय शिक्षणात खरा इतिहास शिकवला जात नाही. मोगलांचा इतिहास शिकवला जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या शौर्याचा इतिहास, तसेच संत साहित्‍य पाठ्यपुस्‍तकांतून शिकवले जावे. यासाठी वारकरी संप्रदायाच्‍या माध्‍यमातून प्रशासनाकडे वेळोवेळी मागणी करायला हवी.’’

हिंदु धर्मावरील आघात रोखण्‍यासाठी कठोर कायदे करावेत ! – ह.भ.प. निवृत्ती महाराज हल्लाळीकर

ह.भ.प. निवृत्ती महाराज हल्लाळीकर

मंदिरांच्‍या सरकारीकरणामुळे होत असलेले दुष्‍परिणाम मागील अनेक वर्षांपासून आपण भोगत आहोत. मंदिरांत जमा झालेली रक्‍कम सरकार आणि अन्‍य धर्मियांच्‍या तिजोरीत जात आहे. सध्‍या अनेक ठिकाणी पुस्‍तके, चित्रपट, नाटके अशा विविध माध्‍यमांतून देवतांचे विडंबन करण्‍यात येत आहे. ‘धर्मावर होणारे हे आघात रोखण्‍यासाठी कठोर कायदे करावेत’, या मागणीसाठी हिंदूंनी संघटित होणे आवश्‍यक आहे.

हिंदु धर्माच्‍या रक्षणासाठी हिंदूंनी कृतीशील होऊन प्रयत्न करावेत ! – सुनील घनवट, महाराष्‍ट्र आणि छत्तीसगड राज्‍य संघटक, हिंदु जनजागृती समिती

श्री. सुनील घनवट

९ मार्च २००४ या दिवशी सर्वोच्‍च न्‍यायालयाचे न्‍यायमूर्ती डी.एम्. धर्माधिकारी आणि न्‍यायमूर्ती शिवराज पाटील यांच्‍या खंडपिठाने ‘हरिद्वार’ अन् ‘ऋषिकेश’ या तीर्थक्षेत्री स्‍थानिक नगरपालिका प्रशासनाने आणलेली ‘मांस-मद्य’ यांवरील बंदी कायम ठेवली होती. त्‍याप्रमाणेच महाराष्‍ट्र शासनानेही हा निर्णय तात्‍काळ लागू करावा. सर्व हिंदूंनी हलाल उत्‍पादनांवर बहिष्‍कार घालून अशी उत्‍पादने देशातून हद्दपार करण्‍यासाठी संघटित होणे आवश्‍यक आहे. यासह लव्‍ह जिहाद, गोहत्‍या, वक्‍फ बोर्ड कायदा, धर्मांतर असे हिंदु धर्मावर होणारे आघात रोखायला हवेत. हिंदु धर्माच्‍या रक्षणासाठी हिंदूंनी हिंदु राष्‍ट्र स्‍थापनेसाठी कृतीशील होऊन प्रयत्न करावेत.

१ सहस्र मंदिरात वस्‍त्रसंहिता लागू करणार ! – राजन बुणगे, सोलापूर जिल्‍हा समन्‍वयक, हिंदु जनजागृती समिती

श्री. राजन बुणगे

मंदिर संस्‍कृतीचे रक्षण करण्‍यासाठी केवळ ४ मासांत महाराष्‍ट्रातील १४५ हून मंदिरांमध्‍ये वस्‍त्रसंहिता लागू करण्‍यात आली आहे. पुढील काही मासांत १ सहस्र मंदिरात वस्‍त्रसंहिता लागू करण्‍याचे नियोजन करण्‍यात आले आहे.

श्री. हर्षद खानविलकर

सूत्रसंचालन समितीचे डॉ. श्रीपाद पेठकर यांनी केले. ठरावांचे वाचन हिंदु जनजागृती समितीचे युवा संघटक श्री. हर्षद खानविलकर यांनी केले. पसायदानाने अधिवेशनाची सांगता करण्‍यात आली.

उपस्‍थित मान्‍यवर

उपस्‍थित मान्‍यवर – ह.भ.प. जय महाराज, ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ, ह.भ.प. रामेश्‍वर शास्‍त्री महाराज, ह.भ.प. नरहरी महाराज चौधरी, ह.भ.प. मारुति महाराज तुणतुणे शास्‍त्री, ह.भ.प. भगवान महाराज कोकरे,  ह.भ.प. बापू महाराज रावकर, हिंदु जनजागृती समितीचे अधिवक्‍ता संघटक अधिवक्‍ता नीलेश सांगोलकर, अधिवक्‍ता आशुतोष अनिल बडवे, श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर संरक्षण समितीचे अध्‍यक्ष श्री. गणेश लंके, ह.भ.प. निवृत्ती महाराज हल्लाळीकर, ह.भ.प अनंत सातपुते, ह.भ.प. वनवे महाराज, ह.भ.प. सुभाष महाराज शिंदे, ह.भ.प. रामचंद्र महाराज पेनोरे

विशेष

१. प्रारंभी देशभरात हिंदु मंदिरांवर होणारे आघात या संदर्भातील सद्यस्‍थिती दर्शवणारा, हिंदु राष्‍ट्र-जागृती सभेच्‍या संदर्भात माहिती देणारा, तसेच मंदिर महासंघाची माहिती देणारा एक दृष्‍यपट दाखवण्‍यात आला.

२. अधिवेशनानंतर अनेक ह.भ.प., तसेच मान्‍यवर यांनी हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील घनवट, तसेच अन्‍य मान्‍यवर यांच्‍या समवेत थांबून चर्चा केली.

हिंदु जनजागृती समिती राष्‍ट्र आणि धर्माचे कार्य चिकाटीने करत आहे ! – ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ

हिंदु जनजागृती समिती गेली अनेक वर्षे राष्‍ट्र आणि धर्म यांचे कार्य अत्‍यंत चिकाटीने करत आहे. श्री. सुनील घनवट हे उभयता हिंदुत्‍वाचे कार्य करत आहेत. या कार्यासाठी आम्‍ही समितीच्‍या समवेत आहोत. हिंदुत्‍वाचे कार्य करणार्‍यांना दीर्घायुष्‍य देण्‍याची प्रार्थना मी श्री विठ्ठलाकडे करतो.