वारकर्‍यांचा भाव !

१. ‘पालखी प्रस्थानापासून पंढरपूरला विठ्ठलाचे दर्शन होईपर्यंत ‘माऊली’ कशी काळजी घेतात’, असाच भाव वारकर्‍यांच्या बोलण्यातून जाणवतो.

२. ‘वारी हे अमृत आहे. हिंदु धर्मात आणि संतभूमी असलेल्या महाराष्ट्रात जन्म मिळणे, हे मोठे भाग्य आहे’, अशा भावना ते व्यक्त करतात.

३. रिमझिम पावसातही डोक्यावरील तुळशी वृंदावन सांभाळत ‘माऊली-माऊली’ असा जयघोष करत चालणार्‍या महिला वारकरी पाहिल्या की, आपल्यातील अहंकाराची जाणीव होते.

४. ‘सहज संवाद साधणे आणि भरभरून बोलणे’, हे वारकर्‍यांचे अजून एक वैशिष्ट्य ! भोळ्या भावामुळेच बहुतांश भक्तीमार्गी वारकरी हे इतरांशी सहज संवाद साधत त्यांच्याकडचे अनुभव ‘हातचे न राखता’ सांगतात.

५. वारकर्‍यांची निरीच्छ वृत्ती : ‘एका वर्षी पुणे महापालिकेने प्रत्येक दिंडीला एक पखवाज भेट दिला; पण राज्यसरकारचे रेनकोट मिळणार असल्याच्या बातम्या होत्या. ते मिळाले नाहीत; पण आम्हाला कोणती अपेक्षा नाही. आम्ही वैष्णव कोणाकडूनही काही घेत नाही’, या प्रतिक्रियेतून वारकर्‍यांची निरीच्छ वृत्ती दिसून येते.

– डॉ. ज्योती काळे, सौ. सायली ढमढेरे, पुणे आणि सौ. गौरी कुलकर्णी, सनातन आश्रम, फोंडा, गोवा.