आदित्‍य ठाकरे यांच्‍या आरोपांना पत्रकार परिषद घेऊन सडेतोड प्रत्‍युत्तर देणार ! – दीपक केसरकर, शालेय शिक्षणमंत्री

कोल्‍हापूर, २६ जून (वार्ता.) – सत्तांतर झाल्‍यावर आमच्‍या बैठकीत उद्धव ठाकरे, आदित्‍य ठाकरे आणि त्‍यांच्‍या कुटुंबियांविषयी कोणतीही टीका करायची नाही, असे ठरले होते; मात्र आता त्‍यांनीच ताळतंत्र सोडले आहे. आदित्‍य ठाकरे ज्‍या पद्धतीने टीका करत आहेत, त्‍यामुळे माझ्‍यासारख्‍या सहनशील व्‍यक्‍तीलाही आता ही टीका सहन होणार नाही. त्‍यामुळे आदित्‍य ठाकरे करत असलेल्‍या आरोपांना मुंबईत २७ जूनला पत्रकार परिषद घेऊन सडेतोड प्रत्‍युत्तर देणार आहे, अशी माहिती राज्‍याचे शालेय शिक्षणमंत्री तथा कोल्‍हापूर जिल्‍ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी कोल्‍हापूर येथे पत्रकार परिषदेत दिली.

पालकमंत्री दीपक केसरकर पुढे म्‍हणाले, ‘‘आदित्‍य ठाकरे यांच्‍यासारख्‍या तरुणांना शिकवणारे दुसरेच कुणीतरी आहे. ‘खोटे बोला; पण रेटून बोला’, असे करून आमच्‍यावर खोटे आरोप करत आहेत. आदित्‍य ठाकरे यांना प्रबोधनकार ठाकरे यांचा वारसा असून ते हा वारसा विसरत आहेत. आरोप करतांना किमान सामाजिक भान पाळून वैयक्‍तिक स्‍तरावर जाता कामा नये, हे लक्षात ठेवले पाहिजे. आमच्‍या सहकार्‍यांना टीका न करण्‍याच्‍या बंधनातून आम्‍ही मुक्‍त केले, तर आमचा नाईलाज होईल.’’