राजापूर (जिल्हा रत्नागिरी) येथील पू. (श्रीमती) सुशीला शहाणेआजी यांच्या निधनानंतरचा आज बारावा दिवस आहे. त्या निमित्ताने…
१६.६.२०२३ या दिवशी पू. (श्रीमती) सुशीला शहाणेआजी यांनी देहत्याग केला. त्यांनी देहत्याग करण्यापूर्वी आणि देहत्याग केल्यावर त्यांचे कुटुंबीय अन् शेजारी यांना जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.
१. सौ. कविता रविकांत शहाणे (पू. शहाणेआजींची सून), नाटे, तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी.
१ अ. आसक्ती न्यून होणे : ‘पू. आजींना त्यांच्यासाठी कुणी काही पैसे दिले, तर त्या ‘तुला घे’, असे म्हणून लगेच त्यांच्या मुलाकडेे द्यायच्या. यावरून ‘आसक्ती कशी न्यून होते ?’, हे मला शिकायला मिळाले.
१ आ. स्वावलंबी : पू. आजींचे वय ९८ वर्षे असूनही त्या स्वावलंबी होत्या. त्या स्वतःची कामे स्वतः करायच्या. ‘सुनांनी त्यांची सेवा करावी’, अशी त्यांची अपेक्षा नसायची.
१ इ. पू. आजी रात्रभर जाग्या असणे आणि ‘त्या सूक्ष्मातून अनिष्ट शक्तींशी लढत असून कुटुंबियांचा त्रास न्यून करत आहेत’, असे जाणवणे : पू. आजींना वैद्यांनी सांगितल्याप्रमाणे रात्री प्रत्येक २ घंट्यांनी पाणी द्यायला लागायचे. त्यासाठी त्यांची नात (माझी पुतणी कु. नारायणी शहाणे) त्यांना उठवत असे. तेव्हा ‘पू. आजी रात्रभर जाग्याच असायच्या’, असे तिने मला सांगितले. ‘त्या सूक्ष्मातून अनिष्ट शक्तींशी लढत असून आमचा त्रास न्यून करत आहेत’, असे मला जाणवले.
१ ई. पू. आजींच्या देहत्यागाविषयी मिळालेली पूर्वसूचना !
१ ई १. साधिकेची प्रकृती बिघडणे, मन अस्थिर होणे, दुसर्या दिवशी ‘आज पू. आजी देहत्याग करतील कि काय ?’, असा विचार मनात येणे आणि त्याप्रमाणे त्याच दिवशी पू. आजींनी देहत्याग केल्याचे समजणे : पू. आजींनी देहत्याग केला, त्याच्या आदल्या दिवशी, म्हणजे १५.६.२०२३ या दिवशी सायंकाळी ५ वाजल्यापासून मला पुष्कळ त्रास होत होता. ‘पोटातून कुणीतरी काहीतरी ओढत आहे’, असे मला वाटत होते. मला पुष्कळ थकवा जाणवत होता. माझे मन अस्थिर झाले होते. नामजपादी उपाय केल्यावर दुसर्या दिवशी मला थोडे बरे वाटले. त्याच वेळी ‘आज पू. आजी देहत्याग करतील कि काय ?’, असा विचार माझ्या मनात आला. त्यानंतर १६.६.२०२३ या दिवशी रात्री पू. आजींनी देहत्याग केल्याचे समजले.
१ उ. देहत्यागानंतर जाणवलेली सूत्रे
१. पू. आजी माझे दीर श्री. मिलिंद शहाणे यांच्या नाटे (तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी) येथील घरी होत्या. आम्ही कुटुंबीय सकाळी रत्नागिरीहून नाटे येथे पोेचलो. त्या वेळी मला वातावरणात पुष्कळ दाब जाणवत होता. नंतर प्रार्थना करून ‘श्री गुरुदेव दत्त ।’, हा नामजप मी भ्रमणभाषवर लावला. त्यानंतर दाब न्यून झाला.
२. पू. आजींचे दर्शन घेतांना ‘त्यांचा श्वासोच्छ्वास चालू आहे’, असे जाणवून ‘त्या आता उठतील कि काय ?’, असे मला वाटत होते.
३. मला घरात त्यांचे अस्तित्व जाणवत होते. त्यांना स्नान घालतांना ‘प्रत्यक्ष गंगामाताच स्नान घालत आहे’, असे वाटून माझी भावजागृती झाली. ‘गुरुमाऊलींच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कृपेने गंगा आली’, असे वाटून मला कृतज्ञता वाटली.
४. पू. आजींचा चेहरा पिवळा दिसत होता आणि प्रसन्न वाटत होता.
पू. आजींनी पदोपदी स्वतःच्या कृतीतून आम्हा कुटुंबियांना पुष्कळ शिकवले आणि तसे आमच्या आचरणात येण्यासाठी प्रयत्नही केले. ‘कोणतेही काम चालढकलपणा न करता तत्परतेने करणे, प्रत्येक कृती सेवा म्हणून वेळेत करणे, सर्वांचे प्रेमाने आदरातिथ्य करणे’, हे सर्व शिकवून सांभाळून घेणार्या सासूबाई मला दिल्याबद्दल देवाच्या चरणी पुष्कळ कृतज्ञता ! ‘त्यांच्यासारखे गुण आमच्यामध्ये येऊन आमच्या सर्वांच्या गुणांत वाढ होऊ दे. आमच्या आध्यात्मिक प्र्रगतीतील अडथळे दूर होऊन गुरुदेवांना अपेक्षित अशी साधना आमच्याकडून होऊ दे’, अशी श्री गुरुचरणी प्रार्थना करते.’
२. आहिताग्नी वेदमूर्ती केतन रविकांत शहाणे (पू. शहाणेआजींचा नातू, पू. आजींच्या मधल्या मुलाचा मुलगा), रत्नागिरी
अ. ‘पू. आजींनी देहत्याग केला’, हे समजल्यावर रत्नागिरी येथून नाटे येथे जायला निघाल्यापासून माझा ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप होत होता.
आ. पू. आजींचा चेहरा पुष्कळ पिवळा आणि प्रकाशमान दिसत होता.
इ. ‘पू. आजी शांत झोपल्या आहेत’, असे मला वाटत होते.’
३. सौ. स्मिता प्रभुदेसाई (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, वय ७५ वर्षे, पू. आजींच्या पूर्वीच्या शेजारी), राजापूर, जिल्हा रत्नागिरी.
३ अ. कठीण परिस्थितीत सर्व भार देवावर सोपवून जीवन कृतार्थ करणार्या पू. (कै.) सुशीला शहाणे ! : ‘पू. सुशीला शहाणेवहिनींना देवाज्ञा झाली’, हे वाचून मला भूतकाळ आठवला. तरुण वयातच त्यांच्या यजमानांचे निधन झाले. तेव्हा त्यांच्यावर त्यांच्या ५ मुलांचे दायित्व होते. त्यांना केवळ देवाचा आधार होता. त्यांनी अतिशय कठीण दिवस काढले; परंतु आहे त्या परिस्थितीत सर्व भार देवावर सोपवून त्यांनी मुलांना मोठे केले. ‘सदा हसतमुख चेहरा, दुसर्यांना साहाय्य करण्याची तळमळ, आपले दुःख कधीही दुसर्याला दिसू न देणे’, असे अनेक गुण त्यांच्याकडे होते. सतत नामस्मरण केल्याने त्या या परिस्थितीतही संतपद गाठू शकल्या आणि स्वतःचे जीवन कृतार्थ करून त्यांनी घराण्याचाही उद्धार केला. धन्य ती माऊली ! मला त्यांचे दर्शन घेण्यास येण्याची इच्छा होती; पण शक्य झाले नाही. क्षमा असावी.
‘पू. सुशीला शहाणेवहिनींचे गुण माझ्यात येवोत’, अशी प्रार्थना ! ‘पू. वहिनींच्या मार्गाने जाऊन स्वतःचा उद्धार करून घेणे’, हीच त्यांना खरी श्रद्धांजली असेल !’
(सर्व सूत्रांचा दिनांक : १८.६.२०२३)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत. या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |