छत्रपती संभाजीनगर – शहरात ‘सोशल क्लब’च्या नावाखाली चालू असलेले जुगार अड्डे बंद करावेत, या मागणीसाठी पोलीस आयुक्तालयासमोर अर्धनग्न आंदोलन करणार्या व्यक्तीवर पोलिसांनी चक्क विनयभंगाचा गुन्हा नोंद केला आहे. सार्वजनिक ठिकाणी लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केल्याप्रकरणी महिला पोलीस कर्मचार्यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. रमेश कसारे पाटील (रा. दलालवाडी) असे आंदोलन करणार्या व्यक्तीचे नाव आहे.
‘सोशल क्लब’च्या नावाखाली चालू असलेले जुगाराचे अड्डे बंद करण्याची मागणी रमेश पाटील यांनी पोलिसांकडे केली होती; मात्र यावर कोणतीही कारवाई करण्यात येत नसल्याने पोलीस आयुक्त कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन करण्याची चेतावणी पाटील यांनी दिली होती. (या पार्श्वभूमीवर २३ जूनच्या दुपारी आयुक्तालयाच्या प्रवेशद्वारावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.) दुपारी १ वाजता मिलकॉर्नर भागातील पोलीस आयुक्तालयाच्या ठिकाणी पाटील अर्धनग्न अवस्थेत हातात लाठी घेऊन आंदोलन करण्यासाठी पोचले. रमेश कसारे यांना पोलिसांनी आंदोलन चालू करण्यापूर्वीच कह्यात घेतले, तसेच त्यांना पोलिसांच्या वाहनात नेऊन पोलीस ठाण्यात नेले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रमेश पाटील विनाअनुमती पोलीस आयुक्त कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर सार्वजनिक ठिकाणी पोचल्यावर महिलांना लज्जा निर्माण होईल असे अश्लील लैंगिक हावभाव करू लागला. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा नोंद केला.
संपादकीय भूमिका :जेवढ्या तत्परतेने हा गुन्हा नोंद केला, तेवढ्या तत्परतेने पोलिसांनी आतापर्यंत जुगाराचे अड्डे बंद का केले नाहीत ? जुगार चालू ठेवण्यास उत्तरदायी पोलिसांवर गुन्हे कधी नोंद होणार ? |