ब्रह्मोत्‍सवाच्‍या दिवशी आणि ब्रह्मोत्‍सवाचा सोहळा झाल्‍यानंतर साधिकेला आलेल्‍या वैशिष्‍ट्यपूर्ण अनुभूती !

१. सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले रथामध्‍ये आरूढ होण्‍यासाठी रथाच्‍या पायर्‍या चढत असतांना आलेल्‍या अनुभूती

सौ. साक्षी जोशी

अ. ‘११.५.२०२३ या ब्रह्मोत्‍सवाच्‍या दिवशी सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले रथामध्‍ये आरूढ होण्‍यासाठी येत होते. ते रथामध्‍ये चढत असतांना त्‍यांच्‍याकडे बघितल्‍यावर मला त्‍यांच्‍यामध्‍ये विष्‍णुरूप दिसत होते.

आ. ते जेव्‍हा रथाच्‍या २ पायर्‍या चढले, तेव्‍हा मी त्‍यांच्‍याकडे पाहिल्‍यावर मला त्‍यांच्‍यातील वात्‍सल्‍यस्‍वरूप प्रीती जाणवत होती. ‘या ब्रह्मोत्‍सवात त्‍यांच्‍याकडून साधकांकडे मातृवत् वात्‍सल्‍यभावाची स्‍पंदने येत आहेत’, असे मला वाटले.

इ. प.पू. गुरुदेव रथाच्‍या पुढील ३ पायर्‍या चढत असतांना ‘जगद़्‍गुरु, विश्‍वगुरु आणि प्रत्‍यक्ष नारायणाचे भव्‍य रूप उंच उंच होत आहे’, असे मला वाटत होते.

ई. पायर्‍या चढून त्‍यांनी जेव्‍हा सगळ्‍यांकडे मागे वळून पाहिले, तेव्‍हा ‘नारायणाने भव्‍य रूप धारण केले आहे’, असे मला वाटत होते. त्‍या वेळी ‘त्‍यांच्‍यापुढे आम्‍ही अत्‍यंत लहान असून मान वर करून त्‍यांच्‍या रूपाचे दर्शन घेत आहोत’, असे मला वाटले.

२. ब्रह्मोत्‍सवाचा सोहळा झाल्‍यानंतर आलेल्‍या अनुभूती

२ अ. ब्रह्मोत्‍सव झाल्‍यावर रात्री झोपतांना नारायणाचे दर्शन झाल्‍याबद्दल कृतज्ञता वाटणे, पहाटे एका दैवी शक्‍तीच्‍या झोताने जागे केल्‍याचे जाणवणे आणि कृष्‍णाचा नामजप जोरात चालू होणे : परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या ब्रह्मोत्‍सवाचा सोहळा झाल्‍यानंतर रात्री झोपतांना ‘त्‍यांच्‍या कृपेमुळे मला नारायणाचे दर्शन झाले’, अशी कृतज्ञता वाटत होती. पहाटे ३.३० वाजता ‘मला एका दैवी शक्‍तीच्‍या झोताने जागे केले’, असे वाटले आणि मी जागी होऊन मी उठून बसले. त्‍या वेळी माझा ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’, हा नामजप जोरात चालू झाला.

२ आ. नामामध्‍ये प्रत्‍यक्ष विष्‍णु असल्‍याप्रमाणे वाटणे आणि ते नाम दैवी रूपात असून दैवी ऊर्जा देत असल्‍याचे जाणवणे : त्‍या नामामध्‍ये मला प्रत्‍यक्ष विष्‍णु असल्‍याप्रमाणे वाटत होते. माझा नामजप अशा पद्धतीने चालू झाला की, ‘ते नाम एका दैवी रूपात आहे आणि मला दैवी ऊर्जा देत आहे’, असे मला वाटले.

२ इ. त्‍यानंतर तो दैवी झोत माझ्‍या सहस्रारचक्रातून माझ्‍या आतमध्‍ये एका धबधब्‍याप्रमाणे जाऊ लागला. त्‍यामुळे मला अंतस्‍थ शांती आणि स्‍थिरता जाणवली. तेव्‍हा मला स्‍वतःभोवती दैवी ऊर्जा जाणवत होती.

२ ई. ४ वर्षांपूर्वी ‘असाच दैवी झोत माझ्‍याकडे आला आणि त्‍याने माझ्‍याकडून नामजप करून घेतला’, असे मी अनुभवले होते.

२ उ. त्‍यानंतर पूर्ण दिवस माझ्‍याकडून नामजप आपोआप होत होता.

‘प.पू. गुरुदेव, तुमच्‍या कृपेमुळे मला ही अनुभूती आली’, त्‍याबद्दल मी अत्‍यंत कृतज्ञ आहे. ‘तुम्‍ही करत असलेल्‍या कृपेपुढे मी न्‍यून पडते’, त्‍याबद्दल मला क्षमा करा. ‘तुम्‍हाला अपेक्षित अशी साधना करण्‍याची क्षमता माझ्‍यामध्‍ये निर्माण करण्‍याचे प्रयत्न तुम्‍ही माझ्‍याकडून करून घ्‍या’, ही तुमच्‍या चरणी प्रार्थना !’

– सौ. साक्षी नागेश जोशी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.५.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक