श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्‍याविषयी साधिकेला जाणवलेली सूत्रे

१. अपार प्रीती करणार्‍या श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ !

कु. माधुरी दुसे

‘६.१.२०२२ श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा मला (कु. माधुरी दुसे) फोन आला. त्‍यांनी मला विचारले, ‘‘कशी आहेस ?’’ मी म्‍हटले, ‘‘छान आहे. मला तुमची आठवण येते. माझ्‍या मनात ‘तुम्‍हाला माझी आठवण येत असेल का ?’, असा विचार आला.’’ त्‍यावर ताई म्‍हणाल्‍या, ‘‘माधुरी, तू माझ्‍या हृदयातच आहेस आणि हृदयात असणार्‍याला कुणी विसरतं का ?’’ हे त्‍यांचे वाक्‍य ऐकून मला माझ्‍यावर असलेल्‍या त्‍यांच्‍या अपार प्रीतीची जाणीव झाली. माझी भावजागृती होऊन मला कृतज्ञता वाटली आणि माझ्‍यातील संकुचितपणा या स्‍वभावदोषाची जाणीव झाली.

२. जगभरातील प्रत्‍येक साधकाची माऊली, म्‍हणजे श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ !

मी त्‍यांना म्‍हटले, ‘‘ताई, क्षमा करा. माझ्‍या संकुचितपणामुळे माझ्‍या मनात ‘तुम्‍हाला माझी आठवण येत असेल का ?’ असा विचार आला.’’ तेव्‍हा मला वाटले, ‘श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ जगभरातील प्रत्‍येक साधकाची माऊली असल्‍यामुळे प्रत्‍येकच साधक त्‍यांच्‍या हृदयात आहे. प.पू. डॉक्‍टरांप्रती (सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्‍याप्रती) त्‍यांचा जो उच्‍च प्रतीचा भाव आहे, तो प्रत्‍येक साधकात यावा; म्‍हणून ‘भक्‍तीसत्‍संगाच्‍या’ माध्‍यमातून त्‍या प्रत्‍येक साधकाला साहाय्‍य करतात.’ गुरूंच्‍या या प्रीतीविषयी मी त्‍यांच्‍या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे. ‘सद़्‍गुरु माऊली, तुम्‍हाला अपेक्षित असे घडता येऊ द्या’, ही तुमच्‍या चरणी प्रार्थना !

३. ‘मी कुठे न्‍यून पडते ?’, हा विचार मनात येऊन निराश होणे आणि श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना आत्‍मनिवेदन केल्‍यावर मनातील विचार न्‍यून होऊन झोप लागणे

‘मे’ मासातील एका बैठकीमध्‍ये माझ्‍या स्‍तरावर ‘मी कुठे न्‍यून पडते ?’, हा भाग लक्षात आला होता. त्‍यानंतर माझे मन थोडे निराश झाले होते. त्‍या रात्री मी श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना आत्‍मनिवेदन केले. त्‍यांना शरण गेले आणि प्रार्थना केली, ‘तुम्‍हीच आता मला साहाय्‍य करा. ‘मी कसे प्रयत्न करू’, हे तुम्‍हीच मला सांगा.’ मी ताईंशी मानस बोलले, ‘तुम्‍ही माझ्‍या समवेत आहात ना ? तुम्‍ही माझ्‍या समवेत आहात ना ? तुम्‍ही माझ्‍या समवेत आहात ना ?’ त्‍यानंतर मला झोप लागली आणि दुसर्‍या दिवशी सकाळी मी नेहमीप्रमाणे सेवा चालू केली अन् मी रात्रीचा सर्व प्रसंग विसरून गेले.

४. श्री महालक्ष्मीच्‍या दर्शनाला गेल्‍यावर महालक्ष्मीच्‍या मुखाच्‍या जागी श्रीसत्‌शक्‍ति(सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे मुख दिसणे

त्‍यानंतर २-४ दिवसांनी श्री महालक्ष्मीच्‍या दर्शनाला जाण्‍याची संधी मिळाली. देवीचे अगदी जवळून दर्शन झाले. दर्शन घेतल्‍यानंतर मला श्री महालक्ष्मीच्‍या मुखाच्‍या जागी श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे मुख दिसले. त्‍या मला म्‍हणाल्‍या, ‘माधुरी, मी तुझ्‍या समवेतच आहे.’ मला माझ्‍या डोळ्‍यांवर विश्‍वास बसला नाही; म्‍हणून मी डोळे पुसून पुन्‍हा नीट बघितले, तर साक्षात सद़्‍गुरु बिंदाताई मला दिसत होत्‍या. हे अनुभवल्‍यावर श्री महालक्ष्मी, प.पू. डॉक्‍टर आणि सद़्‍गुरु बिंदाताई यांच्‍या प्रति कृतज्ञताभाव जागृत झाला. ‘ते अखंड माझ्‍या समवेत आहेतच’, असे मला जाणवले. ‘हे ईश्‍वरा, तू माझ्‍या समवेत अखंड आहेस, या जाणिवेतून प्रत्‍येक प्रयत्न तुला अपेक्षित असा होऊ दे’, अशी तुझ्‍या चरणी प्रार्थना आहे.

११.१०.२०२२ या दिवशी सकाळी ९ वाजता घरातील एक सेवा करत असतांना माझ्‍या मनात आपोआप पुढील ओळी आल्‍या –

या देवी सर्वभूतेषु बिन्‍दारूपेण संस्‍थिता ।
नमस्‍तस्‍यै नमस्‍तस्‍यै नमस्‍तस्‍यै नमो नमः ॥

अर्थ : जी देवी सर्व प्राणिमात्रांमध्‍ये बिंदारूपाने (श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्‍या रूपाने) विराजमान आहे, त्‍या देवीला त्रिवार नमस्‍कार असो.’

– कु. माधुरी दुसे, कोल्‍हापूर सेवाकेंद्र, कोल्‍हापूर. (१६.१०.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक