‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवा’च्‍या द्वितीय आणि तृतीय दिवशी (१७ आणि १८ जून २०२३) केलेले आध्‍यात्मिक स्‍तरावरील उपाय

१७.६.२०२३

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

१. सूत्रसंचालन करणार्‍या साधिकेचे पोट अचानक खूप दुखू लागणे, तिला सूत्रसंचालन करणे अशक्‍य होणे आणि तिच्‍यासाठी नामजप केल्‍यावर अन् तिच्‍यावरील त्रासदायक शक्‍तीचे आवरण काढल्‍यावर ती १० मिनिटांनी सूत्रसंचालनासाठी पुन्‍हा येऊ शकणे : ‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवा’मध्‍ये सूत्रसंचालन करणार्‍या २ जणांपैकी सौ. क्षिप्रा जुवेकर यांचे पोट अचानक दुखायला लागले. पोटाचे दुखणे सहन न झाल्‍याने त्‍या खोलीत झोपायला गेल्‍या. महोत्‍सवात सूत्रसंचालन करायला दुसरा साधक होता; म्‍हणून कार्यक्रमात खंड पडला नाही. मी सौ. क्षिप्रा यांच्‍यासाठी आध्‍यात्मिक स्‍तरावरील उपाय शोधला. तेव्‍हा मला ‘उजवा तळहात डोक्‍याच्‍या डावीकडे शरिरापासून १ – २ सें.मी. अंतरावर ठेवणे आणि डाव्‍या हाताचा तळवा मणिपूरचक्रासमोर १ – २ सें.मी. अंतरावर ठेवणे अन् ‘निर्गुण’ हा नामजप करणे’ हा उपाय मिळाला. मी त्‍याप्रमाणे सौ. क्षिप्रा यांच्‍यासाठी स्‍वतःवर उपाय केले, तसेच त्‍यांच्‍यावरील त्रासदायक शक्‍तीचे आवरणही काढले. १० मिनिटे हे उपाय केल्‍यावर त्‍यांना बरे वाटू लागले आणि त्‍या पुन्‍हा सूत्रसंचालनासाठी कार्यक्रमस्‍थळी उपस्‍थित झाल्‍या.

२. ‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवा’चे चित्रीकरण ‘टेप’वर घेत असतांना ते मधे मधे खंडित होत असणे आणि हा अडथळा दूर करण्‍यासाठी ‘निर्विचार’ हा नामजप ५ मिनिटे केल्‍यावर तेथे चैतन्‍य अन् हलकेपणा निर्माण होऊन दिवसभरात पुन्‍हा त्‍या सेवेमध्‍ये कोणताही अडथळा न येणे : ‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवा’चे चित्रीकरण प्रसिद्धीच्‍या प्रक्रियेसाठी ‘टेप’वर घेतले जाते. आज एका ‘टेप’वर चित्रीकरण घेत असतांना ते मधे मधे खंडित होत होते. त्‍यामुळे तेवढ्या कालावधीचे चित्रीकरण मिळत नव्‍हते, तसेच ते तुकड्या तुकड्यांनी त्‍या ‘टेप’मध्‍ये संरक्षित (सेव्‍ह) होत होते. साधकांचाही न मिळालेले चित्रीकरण पुन्‍हा घेण्‍यात वेळ जात होता. ही अडचण मला सांगितल्‍यावर ‘यामध्‍ये कोणतेही तांत्रिक कारण नसून तो आध्‍यात्मिक स्‍तरावरील अडथळा आहे’, हे माझ्‍या लक्षात आले. मी तो अडथळा दूर करण्‍यासाठी ‘निर्विचार’ हा नामजप ५ मिनिटे केला. तेव्‍हा मला तो अडथळा दूर झाल्‍याचे जाणवले. देवाने माझ्‍याकडून नामजप करवून घेतल्‍यामुळे ती सेवा चालू असलेल्‍या खोलीत चैतन्‍य आणि हलकेपणा जाणवू लागला. त्‍यानंतर ‘टेप’मध्‍ये महोत्‍सवाचे चित्रीकरण करण्‍यामध्‍ये दिवसभरात कोणताही अडथळा आला नाही.

१८.६.२०२३

१. छायाचित्रकासाठी (कॅमेर्‍यासाठी) प्रकाश सोडणारे दिवे (फ्‍लॅश लाईट्‍स) चालत नसणे आणि ‘निर्गुण’हा नामजप केल्‍यावर त्‍यांवरील आवरण दूर होऊन ते चालू होणे : ‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सव’ चालू असतांना त्‍यांतील भाषण करणारे वक्‍ते, त्‍यांचे सत्‍कार सोहळे इत्‍यादींची छायाचित्रे काढली जातात. याकरता छायाचित्रकासाठी (कॅमेर्‍यासाठी) प्रकाश सोडणारे ५ दिवे (फ्‍लॅश लाईट्‍स) व्‍यासपिठाभोवती लावलेले आहेत. यांपैकी ३ दिवे अचानक सकाळी ९.५७ वाजता चालेनासे झाले. ते ‘एरर्’ (काहीतरी त्रुटी असल्‍याचे) दाखवत होते. मला हा अडथळा सांगितल्‍यावर माझ्‍या डोक्‍यावर दाब जाणवला. मी ‘महाशून्‍य’ हा नामजप करत आणि डोक्‍यावर ‘मनोरा’ मुद्रा करून तो दाब दूर केला. तेव्‍हा ३ पैकी केवळ १ दिवा चालू झाला; म्‍हणून मी प्रत्‍यक्ष त्‍या ठिकाणी जाऊन पाहिल्‍यावर मला सूक्ष्मातून त्‍या दिव्‍यांच्‍या भोवती अजूनही त्रासदायक शक्‍तीचे आवरण असल्‍याचे लक्षात आले. मी कोणतीही मुद्रा किंवा न्‍यास न करता केवळ डोळे मिटून ‘निर्गुण’ हा नामजप १० मिनिटे केला. त्‍यानंतर मला त्‍या दिव्‍यांभोवतीचे आवरण नष्‍ट झाल्‍याचे जाणवले. मी छायाचित्रे काढणार्‍या साधकाला ‘आता ते दिवे चालतात का ?’, हे पहाण्‍यास सांगितले. तेव्‍हा त्‍याला ते तिन्‍ही दिवे आता चालत असल्‍याचे लक्षात आले.

२. ‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवा’चे थेट प्रक्षेपण दाखवणारा ‘प्रोजेक्‍टर’ मधेच बंद पडणे आणि त्‍यावर आलेले त्रासदायक शक्‍तीचे आवरण ‘निर्गुण’ हा नामजप करत काढल्‍यावर १५ मिनिटांनी तो पुन्‍हा चालू होणे : ‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवा’चा कार्यक्रम एका सभागृहात चालू असतांना त्‍याच्‍या वरच्‍या मजल्‍यावरील दुसर्‍या सभागृहात तो प्रत्‍यक्ष कार्यक्रम ‘प्रोजेक्‍टर’द्वारे दाखवला जात होता. सकाळी १० वाजता तो ‘प्रोजेक्‍टर’ काही कारण नसतांना बंद पडला. आलेला हा अडथळा मला एका साधकाने सांगितला. तेव्‍हा सूक्ष्मातून निरीक्षण केल्‍यावर मला माझे डोके आणि चेहरा यांवर त्रासदायक शक्‍तीचे आवरण जाणवले. तसेच ते आवरण दूर करण्‍यासाठी ‘निर्गुण’ हा नामजप करणे आवश्‍यक असल्‍याचेही जाणवले. मी डोक्‍यावर ‘मनोरा’ (‘टॉवर’ची) मुद्रा करून, तसेच ‘निर्गुण’ हा नामजप करत माझे डोके आणि चेहरा यांवरील आवरण दूर केले. त्‍यानंतर मी माझ्‍या डोळ्‍यांवरील आवरणही काढले. यासाठी मला एकूण १५ मिनिटे लागली. माझ्‍याकडून हे उपाय पूर्ण झाल्‍यावर मी ‘आता ‘प्रोजेक्‍टर’ व्‍यवस्‍थित चालू झाला का ?’, असे विचारले. तेव्‍हा त्‍यांनी ‘हो’, असे सांगितले.

३. अमावास्‍या समाप्‍त होण्‍याच्‍या शेवटच्‍या १० मिनिटांच्‍या कालावधीत (सकाळी ९.५७ ते १०.०७) आलेल्‍या वरील दोन्‍ही अडथळ्‍यांवरून ‘वाईट शक्‍ती शेवटचा प्रयत्न म्‍हणून कसे चिकाटीने आक्रमण करतात’, हे लक्षात येणे : काल सकाळी (१७.६.२०२३ या दिवशी सकाळी ९.१२ वाजता) अमावास्‍येला आरंभ झाला होता आणि आज सकाळी १०.०७ वाजता ती समाप्‍त होणार होती. वरील दोन्‍ही अडथळे हे अमावास्‍या समाप्‍त होण्‍याच्‍या शेवटच्‍या १० मिनिटांच्‍या कालावधीतच आले होते. यावरून लक्षात आले, ‘वाईट शक्‍तींना अमावास्‍येच्‍या काळात आक्रमण करण्‍यास सोपे जाते आणि त्‍या अमावास्‍या संपत आली, तरी अडथळे आणण्‍याचा शेवटचा प्रयत्न म्‍हणून आपला जोर एकवटून आक्रमण करतात. यावरून वाईट शक्‍तींचा ‘चिकाटी’ हा गुण लक्षात येतो.’

४. लिंबू संगणकाच्‍या जवळ न ठेवल्‍यास त्‍या संगणकावर ‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवा’च्‍या चित्रीकरणाचे दृश्‍य दिसणे बंद होणे : ‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवा’च्‍या चित्रीकरणाचा ‘इनपुट’(‘केबल’द्वारे आलेले चित्रीकरण) महोत्‍सवाच्‍या प्रसिद्धीसाठी एका संगणकाकडे येत होता. तेव्‍हा असे लक्षात आले, ‘त्‍या संगणकाच्‍या जवळ लिंबू ठेवले नाही, तर त्‍या संगणकाच्‍या ‘मॉनिटर’वर चित्रीकरणाचे दृश्‍य दिसणे बंद होत होते. यावरून ‘लिंबू आध्‍यात्मिक उपायासाठी एखाद्या वस्‍तूजवळ किंवा स्‍वतःजवळ ठेवले, तर ते वाईट शक्‍तींची होणारी आक्रमणे स्‍वतःकडे आकर्षित करून (नष्‍ट करून) त्‍यांच्‍या प्रभावापासून कसे रक्षण करते’, हे त्‍याचे कार्य लक्षात आले.

या उदाहरणांतून लक्षात येईल की, साधना आणि आध्‍यात्मिक उपाय यांच्‍या बळावर आपण वाईट शक्‍ती निर्माण करत असलेल्‍या अडथळ्‍यांवर गुरुकृपेने मात करू शकतो !’

– (सद़्‍गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालय, गोवा. (१९.६.२०२३)

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.