तमिळनाडूमधील हिंदुविरोधी कारवायांना सरकारी पाठिंबा !- अर्जुन संपथ, संस्‍थापक अध्‍यक्ष, हिंदु मक्‍कल कत्‍छी, तमिळनाडू

वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवाच्‍या पाचव्‍या दिवशी मान्‍यवरांनी केलेले मार्गदर्शन

श्री. अर्जुन संपथ

(हिंदु मक्‍कल कत्‍छी म्‍हणजे हिंदु जनता पक्ष)

विद्याधिराज सभागृह (रामनाथी, गोवा) – तमिळनाडूमध्‍ये मुसलमान कट्टरपंथी, ख्रिस्‍ती मिशनरी, साम्‍यवादी, प्रसारमाध्‍यमे आणि सत्ताधारी द्रमुक पक्ष हे हिंदुविरोधी कारवाया करत आहेत. राज्‍यातील मंदिरांचे सरकारीकरण करण्‍यात आले आहे. उत्तरप्रदेशमध्‍ये योगी आदित्‍यनाथ देशविरोधी शक्‍तींच्‍या मालमत्तेवर बुलडोझर फिरवत आहेत. तमिळनाडूमध्‍ये मात्र मुख्‍यमंत्री स्‍टॅलिन राज्‍यातील मंदिरांवर बुलडोझर फिरवत आहेत. तमिळनाडूत सरकारने १६० मंदिरे पाडली. तमिळनाडूमधील दलितांमध्‍ये हिंदुविरोधी प्रचार केला जात आहे. शाळांमध्‍ये ख्रिस्‍ती मिशनरी ख्रिस्‍ती धर्माचा प्रचार करत आहेत. त्‍याला सरकारकडून साहाय्‍य केले जात आहे. सरकारकडून ब्राह्मण, संस्‍कृत आणि हिंदी यांच्‍या विरोधी कारवाया चालू आहेत. ख्रिस्‍ती मिशनर्‍यांकडून शहरी नक्षलवादी कारवायांना साहाय्‍य केले जात आहे. तमिळनाडूमध्‍ये मोठ्या प्रमाणात हिंदुविरोधी कारवाया चालू असल्‍या, तरी तमिळनाडू ही मूळ हिंदूंची पुण्‍यभूमी आहे. नवीन संसदेमध्‍ये नेण्‍यात आलेला ‘संगोल’ (धर्मदंड) या भूमीतूनच नेण्‍यात आला. ज्‍या ठिकाणी स्‍टॅलिन यांनी हिंदुविरोधी बैठका घेतल्‍या, त्‍याच ठिकाणी आम्‍ही शिवाचार्य संप्रदायाच्‍या समवेत बैठकांचे आयोजन करून हिंदूंचे संघटन केले. मंदिरे आणि गोमाता यांच्‍या रक्षणासाठी आम्‍ही अभियान चालू केले आहे. तमिळनाडूमधील प्रत्‍येक जिल्‍ह्यात हिंदूंचे संघटन करण्‍यासाठी आम्‍ही प्रयत्न करत आहोत. भारतात हिंदु राष्‍ट्राची स्‍थापना तमिळनाडूमधून होण्‍यासाठी आम्‍ही प्रयत्न करू.


वीरशैव लिंगायत हे हिंदूच ! – पू. श्री.ष.ब्र.प्र.१०८ डॉ. विरुपाक्ष शिवाचार्य महास्‍वामीजी, मठाधिपति, गणाचार्य मठ संस्‍थान, मुखेड, नांदेड, महाराष्‍ट्र

पू. श्री.ष.ब्र.प्र.१०८ डॉ. विरुपाक्ष शिवाचार्य महास्‍वामीजी

लिंगायत ही बोलीभाषा आहे. त्‍यामुळे ‘वीरशैव लिंगायत’ असेच म्‍हणायला पाहिजे. ते हिंदु धर्मानुसार उपासना करत असून सर्व हिंदूच आहेत. वीरशैव लिंगायत हिंदु धर्मापासून वेगळे नसून अभिन्‍न आहेत. आमचा हिंदु राष्‍ट्राच्‍या या कार्यामध्‍ये सदैव सहभाग राहील. तसेच दक्षिणेतील राज्‍यांमध्‍ये कुठेही हिंदु धर्मावर आघात झाला, तर तेथेही आम्‍ही सर्वजण तुमच्‍या समवेत आहोत.

अखंड हिंदुस्‍थान हे हिंदु राष्‍ट्रच आहे; परंतु त्‍याला ‘सेक्‍युलर’ (निधर्मी) ठरवण्‍याचा प्रयत्न करण्‍यात येत आहे. भारतात विविध संप्रदाय असले, तरी सर्वजण हिंदु धर्माप्रमाणे आचरण करतात. त्‍यामुळे सर्व जण हिंदूच आहेत. गेल्‍या १० वर्षांपासून लिंगायत आणि वीरशैव यांना वेगळे ठरवण्‍याचा प्रयत्न होत आहे. एवढेच नाही, तर ‘फोडा आणि राज्‍य करा’, हे धोरण अवलंबून त्‍यांना हिंदु धर्मापासून वेगळे पाडण्‍याचा प्रयत्न करण्‍यात येत आहे. शिवाची उपासना करणारा लिंगायत आहे. गळ्‍यामध्‍ये लिंग धारण केल्‍याने त्‍याला ‘लिंगायत’ म्‍हणतात. लिंग हे शिवाचे प्रतीक आहे. त्‍यामुळे तो वीरशैव आहे. शिव आणि जीव यांचे ऐक्‍य करण्‍याची विद्या शिकणारा वीरशैव आहे.


अखंड भारत होणे आणि त्‍याचे विभाजन रोखणे यांसाठी गोहत्‍या थांबवणे आवश्‍यक ! – सतीश कुमार, राष्‍ट्रीय अध्‍यक्ष, गोरक्षा दल

श्री. सतीश कुमार

ज्‍या देशात ८० टक्‍के जनता सनातन धर्मीय आहे, त्‍याच देशात सनातन धर्माच्‍या श्रद्धेशी संबंधित गोमातांची हत्‍या होत आहे. जेव्‍हापासून देशात गोहत्‍या चालू झाली, तेव्‍हापासून अखंड भारताचे तुकडे झाले. गोमाता ही भूमातेचे रूप आहे. ज्‍या भूमीवर तिचे तुकडे होतील, त्‍या भूमीचेही तुकडे होतील. त्‍यामुळे अखंड भारत हवा असेल आणि त्‍याचे विभाजन थांबवायचे असेल, तर गोहत्‍या थांबवणे आवश्‍यक आहे.

भारतातील गायी बांगलादेशात पाठवल्‍या जातात. त्‍या बदल्‍यात बनावट नोटा आणि अमली पदार्थ भारतात पाठवले जातात. त्‍याच्‍या व्‍यवसायातून मिळालेल्‍या पैशाने देशात आतंकवाद पसरवला जात आहे. त्‍यामुळे ही गोतस्‍करी थांबवणे एक धर्मकार्य आहे. पांडवांना केवळ ५ गावांसाठी युद्ध करावे लागले. आपल्‍याला तर हिंदु राष्‍ट्र हवे आहे. त्‍यामुळे तेही संघर्ष केल्‍याविना मिळणार नाही. हा संघर्ष करतांना मृत्‍यू आला, तरी मोक्ष मिळेल आणि जिवंत राहिल्‍यास हिंदु राष्‍ट्र मिळेल. हिंदु राष्‍ट्राच्‍या आवाजाने प्रचंड रूप धारण केले आहे. त्‍यामुळे आपण सर्वांनी या कार्यात सहभागी होऊन संघटित होणे आवश्‍यक आहे. खलिस्‍तानी आतंकवाद हा हिंदु आणि शीख यांना तोडण्‍याचा प्रयत्न आहे. कुणालाही स्‍वतंत्र खलिस्‍तान नको आहे. विदेशी शक्‍ती धनाच्‍या बळावर भारतात निरपराध लोकांची हत्‍या करत आहे.


नक्षलवादी आणि ख्रिस्‍ती धर्मप्रचारक यांची देशविरोधी युती ! – अधिवक्‍त्‍या (सौ.) रचना नायडू, छत्तीसगड

अधिवक्‍त्‍या (सौ.) रचना नायडू

छत्तीसगडमधील वनवासी हे हिंदूच आहेत. त्‍यांच्‍यावर ख्रिस्‍ती धर्मप्रचारक आणि नक्षलवादी यांच्‍याकडून प्रचंड अत्‍याचार होत आहेत; परंतु त्‍या सर्व घटनांना प्रसारमाध्‍यमांकडून प्रसिद्धी दिली जात नाही. आज वनवासी हिंदू त्‍यांची लढाई एकटे लढत आहेत. त्‍यामुळे त्‍यांना देशव्‍यापी समर्थन मिळणे आवश्‍यक आहेे. नक्षलवादी आणि ख्रिस्‍ती धर्मप्रचारक यांची युती आहे. जेथे विपुल खनिज संपत्ती आणि वनवासी आहेत, त्‍याच ठिकाणी ख्रिस्‍ती धर्मप्रचारक अन् नक्षलवादी यांनी बस्‍तान बसवून ते हिंदूंचे मोठ्या प्रमाणात धर्मांतर करत आहेत. छत्तीसगडमध्‍ये आशिया खंडातील सर्वांत मोठे चर्च आहे. ते वनवासींना प्रलोभने देऊन त्‍यांचे सर्वस्‍व बळकावत आहेत. त्‍यांच्‍या तावडीतून सुटका करून घेतली, तरी त्‍यांनी बळकावलेली संपत्ती आपण परत मिळवू शकत नाही, एवढी त्‍यांची यंत्रणा मोठी आहे.

नक्षलवाद्यांनी प्रतिदिन स्‍फोट घडवून छत्तीसगडमधील बस्‍तरची भूमी रक्‍तरंजित केली आहे. नक्षलवादी संघटनांमध्‍ये सहभागी होण्‍यास नकार देणार्‍यांची क्रूरपणे हत्‍या करण्‍यात येते. नक्षलवाद्यांचे जिहादी ‘पॉप्‍युलर फ्रंट ऑफ इंडिया’शी साटेलोटे आहे. वनवासींच्‍या अत्‍याचारांकडे मानवाधिकार संघटना आणि सरकार या सर्वांचे दुर्लक्ष होत आहे.


शीख, जैन, बौद्ध यांनी ‘हिंदु’ आहोत, हे समजून घ्‍यायला हवे !- कर्नल करतार सिंह मजिठिया, कृपाल रूहानी फाऊंडेशन, गोवा

कर्नल करतार सिंह मजिठिया

कोणताही महात्‍मा जगात येऊन धर्म निर्माण करत नाही. प्रभु श्रीराम, गुरुनानक, गुरुगोविंदसिंह यांनी कोणताही धर्म निर्माण केला नाही. धर्माचे ठेकेदार असतात, ते धर्म निर्माण करतात. विश्‍वात केवळ हिंदु धर्मच आहे. जैन, बौद्ध आणि शीख हे हिंदु आहेत. आमचे पूर्वज हिंदूच होते. माझ्‍या आजोबांनी शीख पंथ स्‍वीकारला. आपले अस्‍तित्‍व आपण समजून घ्‍यायला हवे. आपल्‍याला बलवान व्‍हावे लागेल. आपल्‍या मुलांना आपला इतिहास सांगावा लागेल. ‘जालियनवाला बागेत गोळीबार करून सहस्रावधींची हत्‍या करण्‍याचा आदेश देणार्‍या जनरल डायर याला क्रांतीवीर उधमसिंह यांनी इंग्‍लंडमध्‍ये जाऊन ठार मारले. शीख कुणाला सोडत नाहीत’, अशी मानसिकता हिंदूंमध्‍येही असायला हवी. धर्माच्‍या रक्षणासाठी हिंदूंना कुणावरही अवलंबून रहाता येणार नाही. हिंदु धर्म आणि मंदिरे यांवर आक्रमण करणार्‍यांना हिंदूंनी सोडू नये. हिंदूंनी कुणावर आक्रमण करू नये; मात्र स्‍वत:च्‍या संरक्षणासाठी त्‍यांनी कायम सिद्ध रहायला हवेे.


हलाल अर्थव्‍यवस्‍थेच्‍या विरोधात तीव्र लढा आवश्‍यक !- मोहन गौडा, प्रवक्‍ते, हिंदु जनजागृती समिती, कर्नाटक

श्री. मोहन गौडा

प्रत्‍यक्षात मांसापुरती असणारी मूळ ‘हलाल’ची इस्‍लामी संकल्‍पना आज शाकाहारी पदार्थ, औषधे, रुग्‍णालये, इमारती, उपाहारगृहे आदी प्रत्‍येक क्षेेत्रात लागू करण्‍यात आलेली आहे. केवळ विदेशीच नाही, तर ‘हल्‍दीराम’, ‘बिकानो’ यांच्‍यासारखी शाकाहारी पदार्थ बनवणारी भारतीय आस्‍थापनेही हलाल प्रमाणित खाद्यपदार्थ ग्राहकांना विकत आहेत. हलाल पदार्थांची मागणी केवळ १४ टक्‍के मुसलमानांची असतांनाही बहुसंख्‍य हिंदू, तसेच शीख, जैन, बौद्ध, ख्रिस्‍ती आदी ८६ टक्‍के जनतेवर ही

हलाल उत्‍पादने लादली जात आहेत. भारतात राज्‍यघटनेने सर्वांना स्‍वातंत्र्य दिलेले असतांनाही हिंदूंवर केल्‍या जाणार्‍या हलालसक्‍तीच्‍या विरोधात, तसेच समांतर अर्थव्‍यवस्‍थेच्‍या विरोधात कृती होणे आवश्‍यक आहे. त्‍या दृष्‍टीने जनजागृती करण्‍यासाठी, तसेच हा जिहाद थांबवण्‍यासाठी देशभरातील सर्व हिंदुत्‍वनिष्‍ठ विविध राज्‍यांत ‘हलाल सक्‍तीविरोधी कृती समिती’ची स्‍थापना करत आहेत. एवढ्यावरच न थांबता हलाल अर्थव्‍यवस्‍थेच्‍या विरोधात अधिक तीव्र लढा आवश्‍यक आहे.


‘हिंदु राष्‍ट्रापासून हिंदु विश्‍वापर्यंत’ या ‘फोटो पॉईंट’ वर हिंदुत्‍वनिष्‍ठांनी काढली छायाचित्रे !

वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवाच्‍या ठिकाणी ‘हिंदु राष्‍ट्रापासून हिंदु विश्‍वापर्यंत’ या संकल्‍पनेवर आधारित ‘फोटो पॉईंट’ (छायाचित्र काढण्‍याचा वैशिष्‍ट्यपूर्ण कक्ष) उभारला आहे. या ठिकाणी अनेक हिंदुत्‍वनिष्‍ठांनी ‘जयतु जयतु हिन्‍दुराष्‍ट्रम्’ असा जयघोष करत उत्‍साहाने छायाचित्रे काढली !