जागतिक स्तरावर भारताने महत्त्वाची भूमिका बजावण्याची वेळ आली आहे ! – पंतप्रधान मोदी

नवी देहली – भारत आणि चीन यांच्यामधील संबंध सुधारण्यासाठी सीमेवर शांतता असणे आवश्यक आहे. आम्ही सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेचा आदर करतो. कायदेशीर आणि शांततापूर्ण मार्गाने विवाद आणि मतभेद सोडवण्यावर आमचा विश्‍वास आहे. या सगळ्यासह आम्ही आमचा सन्मान आणि अखंडता जपण्यासाठी पूर्णपणे तयार आहोत, असे विधान पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकेतील वृत्तपत्र ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ला दिलेल्या मुलाखतीत केले. अमेरिकेला प्रस्थान करण्याच्या पार्श्‍वभूमीवर ही मुलाखत देण्यात आली आहे. ‘जागतिक स्तरावर भारताने महत्त्वाची भूमिका बजावण्याची वेळ आली आहे’, असेही ते म्हणाले.

१. रशिया-युक्रेन युद्धावर भारताच्या भूमिकेविषयी पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारत शांततेला पाठिंबा देत आहे. सर्व देशांनी आंतरराष्ट्रीय कायद्यांचे पालन केले पाहिजे आणि इतर देशांच्या सार्वभौमत्वाचा आदर केला पाहिजे. वाद युद्धाने नव्हे, तर चर्चेने सोडवावा. हे युद्ध थांबवण्यासाठी भारत शक्य ते सर्व प्रयत्न करेल.

२. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, भारत केवळ दक्षिणेकडील देशांचा नेता नाही, तर वर्षानुवर्षे दुर्लक्षित राहिलेल्या इतर विकसनशील देशांचे प्रश्‍नही मांडत आहे.

३. भारतात सहस्रो वर्षांपासून सर्व धर्म आणि श्रद्धा यांना एकत्र रहाण्याचे अन् प्रगती करण्याचे स्वातंत्र्य मिळाले आहे. तुम्हाला भारतात प्रत्येक श्रद्धा आणि धर्म यांचे लोक शांततेने जगतांना आढळतील, असेही ते म्हणाले.