भारतीय पुरातत्‍व विभागाला लोहगडावरील अतिक्रमण हटवण्‍याची केली मागणी

लोहगड मुक्‍तीसाठी एकवटले समस्‍त हिंदू !

प्रतीकात्मक छायाचित्र

लोणावळा (जिल्‍हा पुणे) – मावळ तालुक्‍यातील लोहगडावर मागील काही काळापासून अतिक्रमणे वाढू लागली आहेत. सदरची अतिक्रमणे तात्‍काळ काढून टाकत लोहगड अतिक्रमणमुक्‍त करावा, या मागणीसाठी १८ जून या दिवशी मावळ तालुका, पुणे जिल्‍हा आणि पश्‍चिम महाराष्‍ट्र येथून मोठ्या संख्‍येने समस्‍त हिंदु बांधव एकवटले होते. भाजे गावातील शिवस्‍मारकाच्‍या समोर मारुति मंदिराच्‍या प्रांगणात हिंदु बांधवांनी आपल्‍या मागण्‍यांचे निवेदन भारतीय पुरातत्‍व विभागाला दिले, तर पुरातत्‍व विभागाने समस्‍त हिंदु बांधवांच्‍या मागणीचा आदर करत वरिष्‍ठांशी चर्चा करून नकाशाप्रमाणे गडावर काही अतिक्रमण झाले असल्‍यास कारवाई करण्‍याचे आश्‍वासन दिले आहे. याविषयी पुढील मासात २४ जुलै या दिवशी लोणावळा उपविभागीय कार्यालयात अहवाल सादर करण्‍याचे आश्‍वासन भारतीय पुरातत्‍व विभागाचे पुणे विभागाचे अधिकारी मंडावरे यांनी दिले आहे. (गडावर अतिक्रमणे होत असतांना पुरातत्‍व विभाग झोपा काढत असतो का ? पुरातत्‍व विभागाला लक्षात कसे येत नाही. – संपादक)

सकाळपासूनच मोठ्या संख्‍येने विविध हिंदु समित्‍या आणि संघटना यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते या ठिकाणी एकत्र जमले होते. जमावामधून कायदा आणि सुव्‍यवस्‍थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये, याकरता पुणे ग्रामीण अन् लोणावळा उपविभागीय पोलीस कार्यालयाच्‍या वतीने मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्‍त तैनात करण्‍यात आला होता. सुरक्षेच्‍या कारणास्‍तव १८ जूनला लोहगड बंद ठेवण्‍यात आला होता.

हिंदूंनी दिलेल्‍या निवेदनात म्‍हटले आहे की,

१. लोहगडाच्‍या पायथ्‍यालाही अतिक्रमणे वाढत आहेत. भारतीय पुरातत्‍व विभागाच्‍या नियंत्रणात सदरचा गड असल्‍याने त्‍या ठिकाणी कोणत्‍याही प्रकारची अतिक्रमणे आणि अनधिकृत बांधकामे होणार नाहीत, याची दक्षता घेणे आवश्‍यक असतांनाही ती न घेतली गेल्‍यामुळे अतिक्रमणांमध्‍ये वाढ होत आहे.

२. पुरातत्‍व विभाग कारवाई करत नसल्‍याने मागील आठवड्यात काही तरुणांनी सदर अतिक्रमणे काढण्‍याचा प्रयत्न केला होता; मात्र पुरातत्‍व विभागाने पुन्‍हा ती आहे त्‍या स्‍थितीत दुरुस्‍त केली आहेत. यामुळे समस्‍त हिंदु बांधवांच्‍या भावना दुखावल्‍या असून गडदुर्गांचे पावित्र्य राखण्‍यासाठी ऐतिहासिक वास्‍तूंचे जतन आणि संवर्धन करणे, तसेच त्‍या ठिकाणी कोणत्‍याही प्रकारचे अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकाम होणार नाही, याची काळजी घेणे आवश्‍यक असल्‍याच्‍या भावना त्‍यांनी व्‍यक्‍त केल्‍या. समस्‍त हिंदु बांधवांच्‍या वतीने शिवभक्‍त रवींद्र पडवळ यांनी गडदुर्ग अतिक्रमण मुक्‍त करण्‍याविषयीची भूमिका विषद केली.

३. भारतीय पुरातत्‍व विभागाने लोहगडाचा जुना नकाशा उपलब्‍ध करून सत्‍य निदर्शनास आणून द्यावे, लोहगडावरील सदरचे बांधकाम अनधिकृत आढळल्‍यास ते तात्‍काळ काढण्‍यात यावे आणि गडाला पुर्वस्‍वरूप प्राप्‍त करून द्यावे. वरील सूत्रांच्‍या अनुषंगाने प्रत्‍येक मासाला लोणावळा साहाय्‍यक पोलीस अधीक्षक कार्यालयात बैठक घेत कार्याचा आढावा समस्‍त हिंदु बांधवांना द्यावा.