गोव्यात बालवाडीत नवीन शैक्षणिक धोरण २०२० ची यंदापासून कार्यवाही
पणजी, १६ जून (वार्ता.) – गोवा सरकारने यंदाच्या शैक्षणिक वर्षात बालवाडीत नवीन शैक्षणिक धोरण २०२० लागू केले आहे. या धोरणानुसार शिक्षणाचे माध्यम हे कोकणी किंवा मराठी या प्रादेशिक भाषांमध्ये असणार आहे; मात्र इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेण्याची संधीही उपलब्ध करणार असल्याची माहिती शिक्षण खात्याचे संचालक शैलेश झिंगडे यांनी दिली आहे. भारतीय भाषा सुरक्षा मंचने हल्लीच सरकारने बालवाडीत नवीन शैक्षणिक धोरण २०२० ची यंदापासून कार्यवाही करतांना बालवाडीत शिक्षणाचे माध्यम सरकारने घोषित करण्याची मागणी केली होती.
वास्तविक नवीन शैक्षणिक धोरणानुसार बालवाडीत शिक्षणाचे माध्यम हे प्रादेशिक भाषेतच असणे आवश्यक आहे. याविषयी अधिक माहिती देतांना संचालक शैलेश झिंगडे म्हणाले, ‘‘गोव्यात गोव्याबाहेरील अनेक विद्यार्थी शिकत आहेत. शिक्षण खात्याला सर्व प्रादेशिक भाषांमध्ये शिक्षक उपलब्ध करणे शक्य होणार नाही आणि यामुळे ‘बालवाडीत शिक्षणाचे माध्यम हे कोकणी किंवा मराठी भाषाच असावे’, असा निर्णय शिक्षण खात्याने घेतला आहे; मात्र इंग्रजी माध्यमातून शिकण्याची संधीही खात्याने खुली ठेवली आहे. आतापर्यंत खात्याकडे ६२० बालवाड्यांनी नोंदणी केलेली आहे. या शाळांचे सर्वेक्षण केल्यानंतर त्यांना खाते अनुज्ञप्ती देणार आहे. या शाळांना खात्याने मान्यता दिल्यानंतर त्यांना सरकार अनुदान देणार आहे.’’
संपादकीय भूमिकाइंग्रजीतून शिकण्याचीही संधी दिली, तर सर्व ख्रिस्ती आणि इंग्रजाळलेले हिंदु पालक मुलांना इंग्रजीतूनच शिक्षण देणार. त्यामुळे शिक्षणाचे माध्यम सर्वांना एकसारखेच लागू करणे आवश्यक आहे. |