बकरी ईदच्‍या पार्श्‍वभूमीवर जनावरांच्‍या वाहतुकीच्‍या संदर्भातील नियमांचे पालन करावे ! – पुण्‍याचे उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी

प्रतीकात्मक चित्र

पुणे – बकरी ईदच्‍या पार्श्‍वभूमीवर जनावरांची मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. त्‍याअनुषंगाने परिवहन विभागाकडून वाहतूकदारांना दक्षता घेण्‍याविषयी कळवण्‍यात आले आहे. जनावरांची वाहतूक करण्‍यापूर्वी वाहतूकदारांनी केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ नुसार वाहनाच्‍या बांधणीमध्‍ये सुयोग्‍य पालट करून नोंदणी प्राधिकरणाकडे अर्ज करून विशेष परवाना प्राप्‍त करून घेणे बंधनकारक आहे, असे उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे यांनी स्‍पष्‍ट केले आहे. खालीलप्रमाणे काही नियमांचे पालन करण्‍याचे आवाहन करण्‍यात आले आहे.

१. प्राण्‍यांना क्रूरतेने वागवण्‍यास प्रतिबंध करण्‍याविषयी (प्राण्‍यांची पायी वाहतूक) नियम २००१ च्‍या नियम ९६ मधील प्रावधानानुसार वाहनातून जनावरांची वाहतूक करतांना वाहतूकदाराने सक्षम प्राधिकरण तथा भारतीय प्राणी कल्‍याण मंडळ आणि केंद्रशासनाने प्राधिकृत केलेले अधिकारी अथवा व्‍यक्‍ती अथवा प्राणी कल्‍याण संस्‍था यांनी जारी केलेले प्रमाणपत्र सोबत बाळगावे. असे प्रमाणपत्र जारी केले नसल्‍यास जनावरांची वाहतूक करण्‍यास वाहतूकदाराने नकार देणे अपेक्षित आहे.

२. प्राण्‍यांना क्रूरतेने वागवण्‍यास प्रतिबंध करण्‍याविषयी अधिनियम १९६०, प्राण्‍यांच्‍या वाहतुकीचे नियम १९७८ आणि प्राण्‍यांना क्रूरतेने वागवण्‍यास प्रतिबंध करण्‍याविषयी (प्राण्‍यांची पायी वाहतूक) नियम २००१ या कायदा आणि नियमांच्‍या प्रावधानांचे काटेकोरपणे पालन केल्‍याखेरीज जनावरांची वाहतूक करण्‍यात येऊ नये. या तरतुदींचे पालन न केल्यास संबंधितांविरुद्ध न्यायालयीन कारवाई करण्यात येईल.