नाशिक – सध्या सामाजिक माध्यमांवरील फेसबूक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप, टेलिग्राम यांतून रोजगारांची अनेक विज्ञापने दिसून येतात. अनेक तरुण-तरुणी रोजगार मिळेल, या आशेने तिथे संपर्क साधतात; मात्र काही वेळा त्यांची फसवणूक होत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. शहरात ‘वर्क फ्रॉम होम’ करण्याच्या नादात एका महिलेची १८ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.
शहरातील सिडको भागातील खुटवडनगर येथील ३२ वर्षीय महिलेला टेलिग्रामवरून ‘वर्क फ्रॉम होम’चे ध्येय देण्यात आले. तिला प्रश्नावली देऊन आणि वारंवार बँक खात्यात पैसे भरण्यास सांगून ही फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यामध्ये २४ बँक खातेधारकांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या महिलेने फसवणुकीची तक्रार प्रविष्ट केली आहे.