लव्‍ह जिहाद विरोधातील लढाई शेवटच्‍या श्‍वासापर्यंत चालू ठेवणार ! – श्रीमती योगिता साळवी, उपसंपादिका, मुंबई तरुण भारत

पुणे येथे ‘भारत विकास परिषदे’च्‍या वतीने ‘लव्‍ह जिहाद मुक्‍त माझे शहर’ या व्‍याख्‍यानाचे आयोजन

श्रीमती योगिता साळवी

पुणे – लव्‍ह जिहाद विरोधातील लढाई शेवटच्‍या श्‍वासापर्यंत चालू ठेवणार आणि आम्‍हीच जिंकणार असा विश्‍वास मुंबई तरुण भारतच्‍या उपसंपादिका श्रीमती योगिता साळवी यांनी व्‍यक्‍त केला. भारत विकास परिषद, शिवाजीनगर शाखा, पुणेच्‍या वतीने १० जून या दिवशी वीर बाजी पासलकर स्‍मारक येथे विवेकानंद व्‍याख्‍यानमालेच्‍या अंतर्गत ‘लव्‍ह जिहाद मुक्‍त माझे शहर’ या व्‍याख्‍यानाचे आयोजन करण्‍यात आले होते. त्‍या वेळी साळवी यांनी उपस्‍थितांना ‘लव्‍ह जिहाद’ विषयी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला मराठी चित्रपट सृष्‍टीतील ज्‍येष्‍ठ अभिनेते श्री. राहुल सोलापूरकर हेही उपस्‍थित होते.

या वेळी श्रीमती साळवी यांनी ‘लव्‍ह जिहाद’च्‍या कार्यात आलेले अनुभव आणि हिंदू समाजाची मानसिकता याविषयी उपस्‍थितांना सांगितले. लव्‍ह जिहादच्‍या प्रकरणात अडकलेल्‍या मुलींना सोडवायला गेल्‍यावर त्‍यांना लव्‍ह जिहाद विषयी विचारल्‍यावर त्‍याविषयी काहीच माहिती नसल्‍याचे लक्षात आले. त्‍याचसमवेत धर्मांधांकडून या प्रकरणात लक्ष न घालण्‍यासाठी दबाव टाकण्‍यात आला. तरीही न घाबरता त्‍यांच्‍या संपूर्ण टीमने शेवटपर्यंत त्‍याचा पाठपुरावा घेऊन मुलींना न्‍याय मिळवून दिला, तसेच काही ठिकाणी सामाजिक न्‍यायमंत्री मंगलप्रभात लोढा यांचेही सहकार्य लाभले.

कार्यक्रमाचा आरंभ स्‍वामी विवेकानंद आणि भारत मातेच्‍या प्रतिमा पूजनाने झाला. त्‍यानंतर संपूर्ण वंदे मातरम म्‍हणण्‍यात आले. या वेळी श्रीमती योगिता साळवी यांचा सत्‍कार श्री. राहुल सोलापूरकर यांनी केला. शेवटी भारत विकास परिषदेचे नीलेश गोरे यांनी आभारप्रदर्शन केले आणि सामूहिक राष्‍ट्रगीतााने सांगता झाली. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने श्रीमती योगिता साळवी यांना लव्‍ह जिहाद स्‍मरणिका भेट देण्‍यात आली. त्‍यांनी समितीच्‍या कार्याचे कौतुक केले.