पैठण (जिल्हा छत्रपती संभाजीनगर) – छत्रपती संभाजीनगर-पैठण रस्त्याच्या कामावर पत्रकारांनी लक्ष ठेवावे. काहीही गडबड झाल्यास मला कळवावे. संबंधित कंत्राटदारावर आमच्याकडून कडक कारवाई करण्यात येईल. त्याला रगडून टाकायचे काम मी करीन, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले. पैठण येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषेदत ते बोलत होते. छत्रपती संभाजीनगर ते पैठण या राष्ट्रीय महामार्गाचे काम चालू आहे. नितीन गडकरी यांनी या कामाची पहाणी केली.
#NitinGadkari : एकही ठेकेदार माझ्या घरी येत नाही, आमच्याकडे भ्रष्टाचार होत नाही.https://t.co/GVufVsbSBZ
— ABP माझा (@abpmajhatv) June 12, 2023
ते म्हणाले की, मी आतापर्यंत ५० लाख कोटी रुपयांची कामे केली आहेत. एकही ठेकेदार माझ्या घरी येत नाही. आमच्याकडे भ्रष्टाचार होत नाही, तर स्पर्धा होते. त्यामुळे पैठण रस्त्याच्या कामासाठी ज्याने ४१ टक्के कमिशन घेतले आहे, त्याच्या कामावर लक्ष ठेवा. त्याने कुठेही गडबड केली, तर मला सांगा.
छत्रपती संभाजीनगर-पैठण महामार्गाच्या रुंदीकरणाच्या कामावेळी सहस्रो छोटे-मोठी झाडे तोडली आहेत. त्यात अनेक वर्षांच्या वटवृक्षांचाही समावेश आहे; मात्र या कामात हटवण्यात आलेल्या एकूण ५१ वटवृक्षांचे ‘रुट बॉल’ प्रक्रियेद्वारे पुनर्रोपण करण्यात आले आहे. त्यामुळे कित्येक वर्षांचे वटवृक्ष जिवंत रहाणार आहेत, असे गडकरी यांनी सांगितले.
महामार्गांवरील वेग वाढवणार…
गडकरी म्हणाले की, देशातील द्रुतगती मार्ग आणि राष्ट्रीय महामार्गांवरील वाहनांची वेगमर्यादा वाढवण्याचा केंद्र आणि राज्य सरकार दोघांनाही अधिकार आहे. यासाठी देहली येथे रस्ते वाहतूक मंत्र्यांची बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीत सर्वांचा समुपदेश घेण्यात आला. त्यानंतर आता नवीन वेग अंतिम करण्यात आला आहे. याविषयी ३-४ दिवसांत आदेश काढण्यात येईल. नवीन स्पीड ठेवण्याविषयी २ मते होती. त्यामुळे यातील समन्वय साधून वेग ठरवण्यात आला आहे. यासाठी राज्य सरकारला दोन-तीन दिवसांत ‘गॅझेट नोटिफिकेशन’ जाणार आहे. त्यानंतर राज्य सरकार सुधारित ‘गॅझेट नोटिफिकेशन’ काढतील.