कायद्याचे उल्लंघन करणार्‍या दोषी वाहनधारकांकडून ६८ लाख ५९ सहस्र ३६६ रुपयांचा दंड वसूल !

जनतेला शिस्‍त न लावल्‍याचा परिणाम ! याचे दायित्‍व सर्वपक्षीय राज्‍यकर्त्‍यांचेच आहे !

प्रतिकात्मक चित्र

सातारा, १२ जून (वार्ता.) – येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्‍या वतीने १ ते ३१ मे या कालावधीत मोटर वाहन कायद्याचे उल्लंघन करणार्‍या ५ सहस्र ६८९ दोषी वाहनांवर कारवाई करण्‍यात आली आहे. या वाहनधारकांकडून ६८ लाख ५९ सहस्र ३६६ रुपये दंड वसूल करण्‍यात आला आहे, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्‍हाण यांनी दिली.

विनोद चव्‍हाण पुढे म्‍हणाले की, या कारवाईत हेल्‍मेट, वाहन चालवतांना मोबाईलचा उपयोग, अतीवेगाने चालणारी वाहने, सीटबेल्‍ट न लावणे, चुकीच्‍या लेनमधून वाहन चालवणे, धोकादायक पार्किंग, ट्रिपल सिट, विमा नसलेली वाहने, पीयूसी नसलेली वाहने, योग्‍यता प्रमाणपत्र नसलेली वाहने, रिफ्‍लेक्‍टर आणि टेललॅम्‍प नसलेली वाहने अशा वाहनांवर कारवाई करण्‍यात आली आहे. खासगी प्रवासी बसेसची विशेष तपासणी मोहीम राबवण्‍यात आली. या मोहिमेच्‍या माध्‍यमातूनही वाहनांवर कारवाई करण्‍यात आली आहे.