पुणे – पंढरपूरकडे निघालेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे पुणे येथे १२ जून या दिवशी सायंकाळी आगमन झाले. येथील संगमवाडी पुलाजवळ दोन्ही पालख्या एकमेकांना भेटल्या. या दोन्ही पालख्यांतील लाखो वारकरी हातात भगवे ध्वज घेऊन टाळ-मृदंगाच्या गजरात श्री विठ्ठलाच्या जयघोषात दंग झाले होते. या वेळी ‘ज्ञानोबा तुकाराम’च्या जयघोषाने संपूर्ण पुणे शहर दुमदुमुन गेले होते.
१. संत तुकाराम महाराजांच्या पालखीने १० जून या दिवशी देहू येथून प्रस्थान केले होते, तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ११ जून या दिवशी आळंदीहून पुण्याच्या दिशेने निघाली होती. या दोन्ही पालख्यांच्या स्वागतासाठी पुणेकरांनी रस्त्याच्या दुतर्फा रांगोळी काढली होती. पुणे महापालिकेच्या वतीने पाटील इस्टेट परिसरात दोन्ही पालख्यांचे स्वागत करण्यात आले.
२. पंढरपूर वारीच्या कालावधीत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांची होणारी ही पहिली भेट असते. त्यानंतर या दोन्ही पालख्या वाखरी येथे एकत्र येतात. या दोन्ही पालख्या २ दिवस पुण्यात मुक्कामाला असणार आहेत. संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी विठोबा मंदिरात, तर संत तुकाराम महाराजांची पालखी निवडुंगा विठ्ठल मंदिरात विसावणार आहे.
क्षणचित्रे
१. दिंडीच्या स्वागतासाठी शेकडो महिला आणि पुरुष यांनी एकाच वेळी शंखनाद केला. एकाच वेळी झालेल्या शंखनादाने संपूर्ण परिसर चैतन्यमय वातावरणाने भारित झाला होता.
२. दोन्ही पालख्यांच्या स्वागतासाठी पुणेकरांनी रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी केली होती.