आज राजमाता जिजाऊ भोसले यांची पुण्यतिथी आहे. त्या निमित्ताने…
‘वर्ष १५९५ मध्ये विदर्भातील सिंदखेडराजा येथे जिजाबाईंचा जन्म झाला. त्या शहाजीराजांची पत्नी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या माता होत्या. त्यांना रामायण-महाभारत आणि पुराणे यांतील कथा अतिशय आवडत होत्या. महाराष्ट्रात आणि संपूर्ण भारतात मोगल अन् विजापूरचे सुलतान यांनी धुमाकूळ घातला होता. ‘राष्ट्ररक्षणासाठी सुपुत्र दे’, अशी प्रार्थना जिजाऊंनी श्री भवानीदेवीला केली. बाल शिवाजीच्या जन्मानंतर जिजाऊंनी त्यांना प्रभु श्रीराम, मारुति, श्रीकृष्ण इत्यादी देवतांच्या, तसेच महाभारत अन् रामायण यांतील कथा सांगून राष्ट्र अन् धर्म भक्तीचे बाळकडूच पाजले. पुण्यात रहाण्यासाठी आल्यानंतर त्यांनी कसब्यात गणपतीची स्थापना केली आणि श्री जोगेश्वरीदेवी अन् केदारेश्वर यांचा जीर्णोद्धार केला. तत्कालीन राजकारणात आणि समाजकारणात जिजाबाई सतत लक्ष घालत होत्या. जिजाबाईंचे ५ पुत्र मृत्यूमुखी पडले होते. एकटे छत्रपती शिवाजी जगले आणि त्यांच्यावरही अनेक संकटे ओढवत होती; पण तशाही स्थितीत मन कठोर करून त्या छत्रपती शिवरायांना यशस्वी होण्याचे आशीर्वाद देत होत्या. छत्रपती शिवरायांनी आगर्याला जातांना सर्व राज्यकारभार जिजाऊंच्या स्वाधीन केला होता. जिजाबाई या केवळ माताच नव्हे, तर छत्रपती शिवरायांच्या प्रेरक शक्तीही होत्या. छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाचा सुवर्णाचा क्षण पाहिल्यानंतर अवघ्या १२ दिवसांतच वर्ष १६७४ मध्ये त्यांनी पाचाड (जिल्हा रायगड) येथे देह ठेवला. अशा जिजाऊंमुळे महाराष्ट्राला छत्रपती शिवराय लाभले आणि त्यामुळे हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली.’
(साभार : भारतीय संस्कृतीकोष)