आळंदीत पोलिसांकडून वारकर्‍यांवर सौम्‍य लाठीमार !

पोलीस आणि वारकरी यांच्‍यातील नियोजन चुकल्‍यामुळे झालेल्‍या वादातून लाठीमार !

संतश्रेष्‍ठ ज्ञानेश्‍वर माऊलींच्‍या पालखीचे पंढरपूरकडेे प्रस्‍थान

आळंदी (जिल्‍हा पुणे) – संतश्रेष्‍ठ ज्ञानेश्‍वर माऊलींच्‍या पालखी सोहळ्‍याचे ११ जून या दिवशी आळंदीमधून सायंकाळी प्रस्‍थान झाले; मात्र त्‍यापूर्वी मंदिर व्‍यवस्‍थापनाने घेतलेल्‍या एका निर्णयामुळे वारकरी आणि पोलीस यांमध्‍ये वाद झाला अन् पोलिसांनी वारकर्‍यांवर सौम्‍य लाठीमार केला. सायंकाळी संतश्रेष्‍ठ ज्ञानेश्‍वर माऊलींच्‍या पालखीचे पंढरपूर येथे प्रस्‍थान झाले.

मंदिर व्‍यवस्‍थापनाने या वर्षी केवळ ७५ दिंड्यांना मंदिरामध्‍ये प्रवेश देण्‍याचा निर्णय घेतला आहे. त्‍यामुळे वादाचा प्रसंग निर्माण झाला. पालखी प्रस्‍थानाच्‍या वेळी मानाच्‍या पालख्‍यांनाच केवळ प्रवेश दिला जातो. याच मानाच्‍या दिंड्या मंदिराच्‍या जवळ असतात; मात्र ऐनवेळी या दिंडीतील मोजक्‍या लोकांना मंदिराच्‍या आत प्रवेश देण्‍यात आला. त्‍यामुळे दिडींतील इतर वारकरी अप्रसन्‍न झाले. ते मंदिरात जाण्‍यासाठी गर्दी करत होते. याच वेळी पोलीस आणि दिंडीतील वारकरी यांमध्‍ये वाद झाला. हा वाद चालू असतांना अनेक वारकरी जमले होते. वारकर्‍यांवर पोलिसांनी काही प्रमाणात लाठीमार केला. मंदिरासमोर आता पोलीस बंदोबस्‍तात वाढ करण्‍यात आली आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये आणि वारीला गालबोट लागू नये, यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहे. काही प्रमाणात तणावाचे वातावरण निर्माण झाले; मात्र नंतर परिस्‍थिती नियंत्रणात आणण्‍यात आली. वारकर्‍यांना कोणत्‍याही प्रकारचा त्रास होऊ नये आणि सुरक्षेसाठी पोलीस फाटा तैनात करण्‍यात आला आहे. हा वाद पोलीस आणि वारकरी यांमध्‍ये झाल्‍याने पोलिसांचे नियोजन चुकल्‍याचे बोलले जात आहे.

संपादकीय भूमिका

शेकडो वर्षांच्‍या परंपरेच्‍या संदर्भात नियोजन चुकू नये, असेच भाविकांना वाटते.