देहली विश्‍वविद्यालयाच्या अभ्यासक्रमात ‘सावरकर यांचे योगदान आणि दर्शन’ हा विषय समाविष्ट

नवी देहली – देहली विश्‍वविद्यालयाच्या बी.ए. (राज्यशास्त्र) च्या अभ्यासक्रमात ‘सावरकर यांचे योगदान आणि दर्शन’ हा विषय समाविष्ट करण्यात आला आहे. देहली विश्‍वविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागाने दिलेल्या प्रस्तावानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. विश्‍वविद्यालयाच्या कार्यकारी परिषदेच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर कवी महंमद इक्बाल यांच्या कविताही वगळण्याचा निर्णय घेण्यात आला. अभ्यासक्रमात सावरकर यांचा समावेश करण्यास विरोध नसला, तरी म. गांधी यांच्या आधी सावरकर यांचे विचार शिकवले जाऊ नयेत, अशी भूमिका शैक्षणिक परिषदेच्या काही सदस्यांनी घेतली होती.

कुलगुरू योगेश सिंह म्हणाले की, कवी इक्बाल यांनी ‘सारे जहाँ से अच्छा’ गीत लिहिले; पण त्यांनी ते कधीच मानले नाही. अभ्यासक्रमात पालटण्यात आलेले विषय ऐच्छिक आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

संपादकीय भूमिका 

स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर देशासाठी सर्वस्वाचा त्याग करणारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार एका विश्‍वविद्यालयाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट होणे, हे सर्वपक्षीय राजकारण्यांसाठी लज्जास्पद ! स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे योगदान दडपण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी त्यांच्या राष्ट्रवादी विचारांचा विजय होणार, हेच यातून दिसून येते !