वारीची परंपरा अधिकाधिक वृद्धींगत करणारे संत आणि श्रद्धा अन् भक्ती यांद्वारे आजही तो वसा चालू ठेवणारे वारकरी !

आज आळंदी (पुणे) येथून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे. त्या निमित्ताने…

१. ‘वारी’ या शब्दाच्या व्युत्पत्ती

१ अ. वार : ‘अमरकोषात ‘वार’ हा शब्द ‘समुदाय’ या अर्थाने वापरला आहे. यावरून ‘भक्तांचा समुदाय’, असा ‘वारी’ शब्दाचा अर्थ काढता येतो.

१ आ. वारी : संस्कृत भाषेत ‘वारि’ म्हणजे पाणी. पाण्याचा प्रवाह जसा अनेक वळणे घेऊन समुद्राला मिळतो, तसा वारकर्‍यांच्या भक्तीच्या प्रेमाने भारलेला प्रवाह पंढरपूरला येऊन मिळतो.

१ इ. फेरा किंवा खेप : संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीत ‘वारी’ हा शब्द ‘फेरा’ किंवा ‘खेप’ या अर्थाने वापरला आहे. ‘ही वारी कधी चालू झाली ?’, याविषयी विद्वानांमध्ये मतभेद आहेत; मात्र ‘ज्ञानेश्वर माऊलींनी ‘वारी’ची महती अधिक प्रमाणात वाढवली’, असे म्हणता येईल.

१ ई. पदोपदी भगवंताचे कीर्तन करणे म्हणजे वारी :

श्री शिवलीलामृत ग्रंथात श्रीधरस्वामी म्हणतात,

‘ज्यासी न घडे सत्समागम । त्याने करू जावे तीर्थाटन ।।’ – श्रीधरस्वामी

अर्थ : प्रतिदिनच्या रहाटगाडग्यात ज्याला सत्समागम होत नाही, त्याने तीर्थाटन करावे.

हे करतांना आपोआपच संतदर्शन होते. पंढरपूरच्या वारीत या दोन्ही गोष्टी होतात. सर्व जातीभेद विसरून ‘वासुदेवः सर्वम् ।’ म्हणजे ‘सर्वकाही वासुदेवच आहे’, याचा बोध घेत जनसामान्यही भक्तीचा रस चाखू शकतात. केवळ पायी चालणे म्हणजे वारी नसून पदोपदी भगवंताचे कीर्तन करणे म्हणजे वारी.

२. प्राचीन काळापासून प्रतिष्ठित असलेले पंढरपूर

पद्मपुराण आणि स्कंदपुराण यांतील उल्लेखावरून ‘पंढरपूर हे देवस्थान प्राचीन काळापासून प्रतिष्ठित होते’, असे दिसते. तेव्हापासून लोक पंढरपूरला दर्शनासाठी येत होते.

३. भक्त पुंडलिकाने मागितलेला वर

‘भक्त पुंडलिकाने पांडुरंगाकडे ‘दर्शनास आलेल्या सर्वांची पापे नष्ट कर’, असा वर मागितला’, असा उल्लेख पद्मपुराणात आहे.

४. ‘रुसून गेलेल्या रुक्मिणीच्या शोधार्थ श्रीकृष्ण दिंडीरवनात (आजचे पंढरपूर) आला आणि पुंडलिकासाठी तिथेच उभा राहिला’, अशी आख्यायिका असणे

एकदा रुक्मिणी श्रीकृष्णावर रुसून दिंडीरवनात गेली. श्रीकृष्ण तिला शोधत-शोधत दिंडीरवनात पुंडलिक जेथे आई-वडिलांची सेवा करत होता, तेथे आला. पुंडलिकाने दिलेल्या विटेवर श्रीकृष्ण तिथेच ‘अठ्ठावीस युगे’ उभा राहिला.

‘इति स्तुत्वा ततो देवं प्राह गद्गदया गिरा ।
अनेनैव स्वरूपेण त्वया स्थेयं ममान्तिके ।।

ज्ञानविज्ञानहीनानां मूढानां पापिनामपि ।
दर्शनान्ते भवेन्मोक्षः प्रार्थयामि पुनः पुनः ।। – स्कन्दपुराण

अर्थ : त्यानंतर अशा प्रकारे स्तुती करून तो आनंदाने देवाला म्हणाला, ‘‘आपण याच रूपामध्ये माझ्याजवळ रहावे. आपल्या केवळ दर्शनाने मूढ, अज्ञानी आणि पापी लोकांनाही मुक्ती मिळावी’, अशी आपल्या चरणी मी पुन्हा पुन्हा प्रार्थना करतो.’’

५. पहिली वारी

‘श्रीकृष्णाने श्री विठ्ठलाच्या रूपात विटेवर उभे राहून सर्व भक्तांचा उद्धार करावा’, हा वर पुंडलिकाने देवाकडे मागितला आणि तेव्हापासून ही ‘वारी’ चालू झाली. वारकरी पंथातील काही सांप्रदायिक भक्तांची अशीही एक धारणा आहे की, पहिली वारी महादेवाने केली.

६. वारीची परंपरा अधिकाधिक वृद्धींगत करणारे संत

संत ज्ञानदेव, संत नामदेव, संत एकनाथ आणि संत तुकाराम या प्रमुख संतांनी वारीची परंपरा अधिकाधिक वृद्धींगत केली. हा वसा अगदी आजपर्यंतच्या पालखी आणि दिंडी सोहळ्यात पहावयास मिळतो.

७. वारीचा मूळ गाभा

श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन या नऊ भक्ती एक ‘वारी’ केल्यास सिद्ध होतात अन् ‘याची देही याची डोळा’ माणसाचे जीवन कृतार्थ होते. हा वारीचा मूळ गाभा आहे.

(साभार : त्रैमासिक ‘सद्धर्म’, जुलै २०१७)