म. गांधी यांची हत्या केली असली, तरीही नथुराम गोडसे भारताचे सुपुत्र ! – केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह

रायपूर (छत्तीसगड) –  नथुराम गोडसे यांनी म. गांधी यांची हत्या केली असली, तरीही ते भारताचा सुपुत्र होते; कारण नथुराम गोडसे यांचा जन्म भारतात झाला. ते भारतात जन्माला आले. औरंगजेब किंवा बाबर यांच्या प्रमाणे घुसखोर नव्हते, असे विधान केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी केले आहे. ‘ज्याला ‘बाबरची अवलाद आहोत’, असे म्हणण्यात धन्यता वाटते तो भारतमातेचा सुपुत्र असू शकत नाही’, असेही त्यांनी या वेळी सांगितले. केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह हे सध्या छत्तीसगडच्या दौर्‍यावर आहेत. तेथे ते पत्रकारांशी बोलत होते.

छत्तीसगडमध्ये काँग्रेस सरकार आतंकवादाला खतपाणी घालत आहे !

गिरिराज सिंह पुढे म्हणाले की, छत्तीसगडमध्ये जर भाजपचे सरकार आले, तर आम्ही धर्मांतरविरोधी कठोर कायदा आणू. जर कायद्याच्या कक्षेत कुणाला धर्मांतर करायचे असेल, तर ती व्यक्ती धर्मांतर करू शकते; मात्र बलपूर्वक, प्रलोभन दाखवून धर्मांतर केले गेले, तर त्याविरोधात कारवाई होईल. छत्तीसगडमध्ये काँग्रेस सरकार आतंकवादाला खतपाणी घालत आहे. तसेच लोकांना धर्मांतरासाठी भरीस पाडले जात आहे, असा आरोपही त्यांनी केला.