मणीपूरमध्ये भाजपच्या महिला आमदाराच्या घरावर अज्ञातांनी बाँब फेकला !

जीवितहानी नाही !

भाजपच्या आमदार सोराईसम केबी देवी यांच्या घरावर बाँब फेकण्याची घटना

इंफाळ (मणीपूर) – मणीपूरमध्ये गेल्या मासापासून चालू झालेला हिंसाचार अद्याप थांबलेला नाही. आता राजधानी इंफाळमधील भाजपच्या महिला आमदार सोराईसम केबी देवी यांच्या घरावर बाँब फेकण्याची घटना घडली. दुचाकीवरून आलेल्या दोन जणांनी हा बाँब घरावर फेकला. त्याच्या स्फोटामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोचले आणि त्यांनी अन्वेषण चालू केले आहे. मणीपूरमध्ये यापूर्वी सेरो गावातील काँग्रेसचे आमदार रणजित सिंह यांच्या घरावर लोकांनी आक्रमण करून तोडफोड करून घराला आग लावली होती.

भाजपच्या आमदार सोराईसम केबी देवी

या स्फोटाविषयी आमदार केबी देवी यांनी म्हटले, ‘राज्यात चालू असलेल्या हिंसाचाराच्या काळात माझ्या घरावर बाँबस्फोट करणे निंदनीय आणि संतापजनक आहे.

हा स्फोट करणार्‍या लोकांनी भविष्यात असे कृत्य कुठेही होऊ नये. आम्ही सर्व माणसे आहोत आणि २ समाजात जे काही मतभेद आहेत ते बाँबस्फोट न करताही सोडवले जाऊ शकतात.’

संपादकीय भूमिका

गेल्या एक मासापासून चालू असलेला हिंसाचार रोखता न येणे पोलीस आणि प्रशासन यांना लज्जास्पद !