उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. समर्थ पटदारी हा या पिढीतील एक आहे !
राजहंसगड, बेळगाव येथील साधिका कु. सविता शंकर हलगेकर (वय २२ वर्षे) मध्यंतरी सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात आल्या होत्या. त्यांच्या बहिणीचा मुलगा राजहंसगड, बेळगाव येथील कु. समर्थ पटदारी याचा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती अपार भाव आहे. तो सतत परात्पर गुरुदेवांच्या भावविश्वात रमलेला असतो. त्याच्या बोलण्यात सतत गुरुदेवांचेच नाव असते. कु. समर्थ याचे वेगळेपण जाणवणारे आणि त्याचे भावविश्व उलगडणारे काही प्रसंग पुढे दिले आहेत.
१. समर्थच्या भावविश्वाची ओळख करून देणारे संभाषण
१ अ. ‘मी सूक्ष्मातून परात्पर गुरु डॉक्टरांना भेटतो’, असे सांगून समर्थने आजीला तू ‘प.पू. गुरुदेवांना प्रार्थना कर, ते आपल्या हृदयातच असतात’, असे सांगणे
समर्थ : मी सूक्ष्मातून प्रतिदिन परात्पर गुरुदेवांना बघतो आणि भेटतोही. तेही मला भेटतात. आमचे प्रेम ‘राधा आणि कृष्ण’ यांच्याप्रमाणे आहे. आजी, तुला प.पू. गुरुदेवांची आठवण येते का ? तू त्यांना प्रार्थना कर, म्हणजे ते तुझ्याकडेही येतील. प.पू. गुरुदेव आपल्या हृदयातच असतात.
आजी (भाव जागृत होऊन) : तुझे बोलणे ऐकून मला पुष्कळ आनंद झाला.
समर्थ : कृष्णाला होतो, तसाच आनंद तुला होत आहे ना ? तू प्रतिदिन नामजप कर. मीही नामजप करतो. तू प.पू. गुरुदेवांना प्रार्थना कर, ‘समर्थला लवकर मोठे करा.’ ते एका मिनिटात मोठे करतात. त्यांनी मला एका दिवसात हुशार बनवले आहे.
१ आ. ‘परात्पर गुरु डॉक्टर माझी सर्व काळजी घेतात आणि मला खेळण्यासाठी सायकल देतात’, असे समर्थने सांगणे
मी (कु. सविता) : गुरुदेव तुझी काळजी घेतात ना ?
समर्थ : हो. प.पू. बाबा (परात्पर गुरु डॉक्टर) माझी सर्व काळजी घेतात. (ढगाकडे पाहून) प.पू. बाबा मला ढगातून बघतात. मी खेळावे; म्हणून ते माझ्यासाठी सायकल घेऊन येतात. ते सर्व मुलांनाही सायकल देतात. त्यांनी एक बटण दाबले की, सर्व मुलांना सायकल मिळते. सायकल खेळून झाल्यावर प.पू. बाबा ते बटण बंद करतात. तेव्हा सर्व सायकली अदृश्य होतात आणि केवळ माझ्या एकट्याकडेच सायकल रहाते.
१ इ. समर्थने ‘मी सूक्ष्मातून रामनाथी आश्रम पाहिला आहे’, असे सांगून ‘मी तेथे गुरुदेवांची पूजा करणार आहे’, असे सांगणे
मी : तू गोव्यातील रामनाथी आश्रम पाहिला आहेस का ? आश्रम मोठा आहे का ?
समर्थ : हो, मी आश्रम पाहिला आहे. मी तो सूक्ष्मातून (मनाने) पाहिला आहे. मी आता प.पू. बाबांकडे जाणार आहे.
आजी : तेथे तू काय सेवा करणार आहेस ?
समर्थ : आश्रमात दोन मुली आहेत. एक मुलगी ताट घेऊन आणि दुसरी मुलगी फुले घेऊन येते. त्या दोघी माझ्याजवळ ताट देतात. त्यानंतर मी प.पू. बाबांचे चरण धुतो आणि त्यांच्या चरणांजवळ गोलाकारात फुले ठेवतो. मी तुळशीला पाणीही घालतो. नंतर परात्पर गुरुदेव मला जेवायला बोलावतात. नंतर आम्ही दोघे जेवण करतो.
१ ई. समर्थला रामनाथी आश्रम आणि परात्पर गुरु डॉक्टर यांची लागलेली ओढ !
समर्थ (मावशीला) : मला रामनाथी आश्रमात जायचे आहे. तू मला सोडले नाहीस, तर मी प.पू. गुरुदेवांना प्रार्थना करीन. ते मला बोलावतील आणि मी जाईन. मी गाडीतून न जाता त्यांच्याकडे धावतच जाणार आहे. वाटेत माझे पाय दुखले, तर मी प.पू. गुरुदेवांना प्रार्थना करून सांगीन, ‘मी तुमच्याकडे धावत येत आहे. तुम्ही माझे पाय दुखू देऊ नका.’ नंतर ते मला शक्ती देतील. त्यामुळे मी डोळे बंद करून धावत धावतच जाईन आणि डोळे उघडले की, मी आश्रमात पोचलेला असेन.
१ उ. समर्थने परात्पर गुरु डॉक्टरांसाठी चिठ्ठी लिहिणे
समर्थने श्रीकृष्णाला आणि परात्पर गुरु डॉक्टरांना मराठी भाषेतून एक चिठ्ठी लिहिली आहे. ही चिठ्ठी तो शाळेत जातांनाही घेऊन जातो. समर्थ त्याच्या जवळची चिठ्ठी उघडून घरातील सर्वांना दाखवतो आणि सांगतो,
समर्थ : या चिठ्ठीत पुष्कळ शक्ती आहे. ही चिठ्ठी प.पू. बाबांसाठी लिहिली आहे. त्यामुळे या चिठ्ठीत शक्ती आहे. तू प.पू. बाबांना भ्रमणभाष करून सांग, ‘मी त्यांना चिठ्ठी लिहिली आहे.’
मी : तू प.पू. बाबांशी भ्रमणभाषवरून बोलणार आहेस का ?
समर्थ : हो. मी त्यांना सांगीन, ‘प.पू. बाबा, मी एक चिठ्ठी लिहिली आहे. मी आश्रमात येऊ का ? मी ग्रंथ लिहिणार आहे.’ प.पू. बाबांचा माझ्यावर विश्वास आहे.
२. समर्थने रामनाथी आश्रमात येण्याचा हट्ट करून ‘प.पू. गुरुदेवांनी मला आश्रमात बोलावले आहे’, असे सांगणे
काही दिवसांनी मी घरातून रामनाथी आश्रमात येण्यासाठी एस्.टी.ने निघाले. तेव्हा समर्थ एस्.टी.त माझ्याजवळ येऊन बसला. मी त्याला म्हणाले, ‘‘आश्रमात जाण्यापूर्वी तेथे विचारावे लागते.’’ त्या वेळी तो म्हणाला, ‘‘तुम्ही सर्व जण रात्री झोपला होतात. तेव्हा मी उठलो आणि प.पू. बाबांना भ्रमणभाष करून विचारले, ‘मी आश्रमात येऊ का ?’ तेव्हा त्यांनी मला सांगितले, ‘तू आश्रमात ये.’’
३. समर्थ परात्पर गुरु डॉक्टरांना प्रतिदिन प्रार्थना करताे, ‘माझ्या आजी-आजोबांना सुखी ठेव.’
४. समर्थचे स्वभावदोष
‘हट्टीपणा आणि रागीटपणा.’
– कु. सविता हलगेकर (कु. समर्थची मावशी, वय २२ वर्षे), राजहंसगड, बेळगाव. (५.१.२०२२)
श्रीकृष्णासमवेत तर कधी स्वत: श्रीकृष्ण बनून खेळणारा राजहंसगड, बेळगाव येथील कु. समर्थ मडिवाळी पटदारी !१. श्रीकृष्णाच्या समवेत खेळणारा समर्थ ! : ‘समर्थ ३ – ४ वर्षांचा असल्यापासून एकटाच खेळत असे. त्याला ‘तू एकटाच काय करत आहेस ?’, असे विचारल्यावर तो म्हणत असे की, मी कृष्णाच्या समवेत खेळत आहे. २. समर्थ आणि त्याची मावसबहीण यांनी ‘राधा-कृष्ण’ बनून खेळणे : आमच्या घरी समर्थची मावशी, सौ. रंजना मुरारी आली की, तो तिच्या मुलीशी, राधिकाशी खेळायचा. समर्थ एक ओढणी घेऊन ती धोतराप्रमाणे नेसायचा आणि उपरणे घेतल्याप्रमाणे ती ओढणी खांद्यावर टाकायचा. नंतर तो डोक्याला एक कापड बांधून त्यामध्ये एक मोरपीस खोवायचा आणि कापड बाजूला खाली सोडायचा. अशा प्रकारे दोघेही जणू ‘राधा-कृष्ण’ होऊन खेळायचे.’ – सौ. रेणुका शंकर हलगेकर (समर्थची आजी, आईची आई), राजहंसगड, बेळगाव. (५.१.२०२२) |
|