प्रियकराने ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ रहाणार्‍या प्रेयसीच्या मृतदेहाचे तुकडे करून ते कुकरमध्ये शिजवून कुत्र्यांना खाऊ घातले !

(लिव्ह इन रिलेशनशिप म्हणजे विवाह न करता एकत्र रहाणे)

प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई – पालघर जिल्ह्यातील मीरारोड येथे ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ मध्ये रहाणार्‍या प्रेयसीच्या मृतदेहाचे तुकडे करून प्रियकराने ते शिजपात्रात (प्रेशरकुकरमध्ये) शिजवले. त्यानंतर त्याने तिच्या शरिराचे तुकडे भाजून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. माणुसकीला काळीमा फासणारे हे कृत्य करणार्‍या आरोपीचे नाव मनोज साने असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. त्याला न्यायालयात उपस्थित केले असता न्यायालयाने त्याला १६ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. त्याच्या मृत प्रेयसीचे नाव सरस्वती वैद्य (वय वर्षे ३२) असे होतेे. सरस्वतीच्या चारित्र्याविषयी संशय असल्यामुळे मनोज याने तिची हत्या केल्याचे प्राथमिक अनुमान आहे.

मनोज साने आणि सरस्वती वैद्य हे मीरारोड येथील गीतानगर येथे एका इमारतीमधील सदनिकेत मागील ३ वर्षांपासून ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ मध्ये रहात होते. ते रहात असलेल्या इमारतीच्या ७ व्या मजल्यावरील सदनिकेतून दुर्गंध येत असल्यामुळे ७ जून या दिवशी त्यांच्या शेजार्‍यांनी पोलिसांना बोलावले. पोलिसांनी  कुलूप तोडून सदनिकेत प्रवेश केला. त्या वेळी पोलिसांना मानवी पाय आढळले; मात्र त्यावर धड नव्हते. घरात शोध घेतला असता स्वयंपाकघरात पातेल्यामध्ये आणि बालदीमध्ये शरिराचे काही तुकडे कापून ठेवल्याचे आढळले. शरिराचे काही तुकडे कुकरमध्ये शिजवलेले होते, तर काही तुकडे गॅसवर भाजलेले आढळले.   प्राथमिक माहितीनुसार मनोज याने सरस्वती वैद्य हिचे भाजलेल्या शरिराचे तुकडे मिक्सरमध्ये बारीक करून कुत्र्यांना खाऊ घातले, तर काही तुकडे जवळच्या गटारात फेकून दिले. याविषयी पोलिसांकडून अन्वेषण चालू आहे. अद्याप मृतदेहाचे शिर पोलिसांना सापडलेले नाही. नयानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांनी ही हत्या ५ दिवसांपूर्वी झाल्याची माहिती दिली. साने याने मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी वापरलेले साहित्य पोलिसांनी कह्यात घेतले असून पुढील अन्वेषण चालू आहे.

(सौजन्य : News18 Lokmat) 

संपादकीय भूमिका

  • ‘लिव्ह इन रिलेशनशिप’सारखे किळसवाणे प्रकार खपवून घेतल्याचा परिणाम ! सरकार आता तरी भारतात ‘लिव्ह इन रिलेशनशिप’वर बंदी घालणार का ?
  • कुठे आदर्श भारतीय संस्कृतीकडे आकर्षित होणारे पाश्‍चात्त्य, तर कुठे ‘लिव्ह इन रिलेशनशिप’सारख्या पाश्‍चात्त्य विकृतीकडे आकर्षित होणारे नतद्रष्ट भारतीय !