प्रशासनाचे दुर्लक्ष
सातारा, ८ जून (वार्ता.) – शासनाच्या आदेशाला हरताळ फासत काहीजण वेण्णा नदी पात्रातील गाळमिश्रित माती घेऊन जात असतांना मुरुम आणि दगडही घेऊन जात आहेत; मात्र या सर्व गोष्टींकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्यामुळे जागृत नागरिकांतून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
नदी पात्रातील गाळ काढल्यामुळे पाणी साठ्यामध्ये वाढ होईल, या उद्देशाने प्रतिवर्षी रॉयल्टी भरून मेपर्यंत गाळ काढून नेण्याची अनुमती प्रशासनाकडून दिली जाते. ३१ मे ही शेवटची तारीख असूनही काहीजण गाळमाती, मुरुम आणि दगडही नेत आहेत; मात्र हे प्रशासनाला दिसत नाही. मोठ्या प्रमाणात हे उत्खनन चालू असल्यामुळे भविष्यात खोदलेल्या खड्ड्यांमुळे जीवितहानी होण्याची शक्यता आहे. नदीपात्रात जनावरे पाणी पिण्यासाठी, तसेच मुले पोहण्यासाठी जात असतात. नदीपात्रात कुठेही खड्डे झाल्यामुळे भविष्यात कोणतीही अप्रिय घटना घडू शकते, असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. तरी महसूल प्रशासनाने तातडीने या प्रकरणात लक्ष घालून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षा सूज्ञ नागरिक व्यक्त करत आहेत.
संपादकीय भूमिकाअसे प्रशासन काय कामाचे ? असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ? |