राज्यातील वसतीगृहांच्या सुरक्षेचा सरकार आढावा घेणार !
मुंबई – चर्चगेट परिसरातील उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या अखत्यारितील सावित्रीबाई फुले वसतीगृहातील एका विद्यार्थीवर बलात्कार करून तिची हत्या झाल्याच्या प्रकरणाची सरकारकडून उच्चस्तरीय चौकशी घोषित करण्यात आली आहे. यासाठी केंद्रशासनाच्या ‘राष्ट्रीय उच्चतर शिक्षण अभियान’ या संस्थेचे राज्य प्रकल्प संचालक डॉ. निपुण विनायक यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारने एक सदस्यीय समिती गठित केली आहे. या समितीने अहवाल तात्काळ सादर करण्याचा आदेश सरकारने दिला आहे.
६ जून या दिवशी येथील वसतीगृहातील विद्यार्थिनीवर बलात्कार करून हत्या झाल्याचा प्रकार उघड झाला. वसतीगृहाच्या सुरक्षारक्षकानेच विद्यार्थीवर बलात्कार करून हत्या केल्याचे उघड झाले आहे. ७ जून या दिवशी आरोपी सुरक्षारक्षकाचा मृतदेह मुंबईतील रेल्वेमार्गावर मृतावस्थेत आढळला आहे. यावरून सुरक्षारक्षकाने रेल्वेखाली आत्महत्या केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या अखत्यारितील राज्यातील सर्व शासकीय वसतीगृहांच्या सुरक्षेचा आढावा घेण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे. यासाठी उच्च शिक्षण विभागाच्या संचालकांच्या अध्यक्षतेखाली ५ जणांची समिती सरकारने स्थापन केली आहे. १४ जूनपर्यंत सर्व वसतीगृहांच्या सुरक्षेचा आढावा सरकारकडे सादर करावयाचा आहे.