स्‍वतःची आणि कार्यकर्त्‍यांची साधना व्‍हावी, यासाठी तळमळीने प्रयत्नरत असलेले हिंदु जनजागृती समितीचे महाराष्‍ट्र अन् छत्तीसगड राज्‍य संघटक श्री. सुनील घनवट !

‘हिंदु जनजागृती समितीचे महाराष्‍ट्र आणि छत्तीसगड राज्‍य समन्‍वयक श्री. सुनील घनवट यांचा आज ज्‍येष्‍ठ कृष्‍ण चतुर्थी (७ जून २०२३) या दिवशी वाढदिवस आहे. त्‍या निमित्ताने नागपूर येथील सौ. गौरी विद्याधर जोशी यांना श्री. सुनील घनवट यांच्‍याकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि त्‍यांची जाणवलेली गुणवैशिष्‍ट्ये येथे देत आहोत.

श्री. सुनील घनवट यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्‍छा !

श्री. सुनील घनवट

१. स्‍वावलंबी 

मी सुनीलदादांकडे अनेक वेळा त्‍यांचे कपडे धुण्‍यासाठी मागितले. मी त्‍यांना ‘त्‍यांचे कपडे ‘इस्‍त्री’ करण्‍यासाठी बाहेर देऊया’, असेही सुचवले. त्‍यांनी माझ्‍याकडून ‘धुलाईयंत्र (वॉशिंग मशीन) कसे वापरायचे ?’, हे समजून घेतले आणि स्‍वतःचे कपडे स्‍वतःच धुवून इस्‍त्री केले.

२. इतरांना समजून घेणे

मला अनेक वेळा ‘घरची कामे किंवा अन्‍य सेवा’ यांमुळे दादांना ‘अल्‍पाहार देणे, चहा देणे आणि जेवण वाढणे’, या सेवा करायला उशीर होत असे; मात्र दादांनी त्‍याविषयी कधीही गार्‍हाणे केले नाही. यातून मला ‘इतरांना समजून घेऊन त्‍यांना साहाय्‍य कसे करावे ?’, हे शिकायला मिळाले.

३. चौफेर लक्ष असणे

दादा त्‍यांच्‍या खोलीत बसलेले असूनही ‘बाहेर काय चाललेे आहे ?’, हे अचूकपणे हेरतात. ते ‘कुठल्‍या कार्यकर्त्‍याला किती आणि नेमकेपणाने काय सांगितले असता त्‍याला पुढील दिशा मिळेल’, हे अचूकपणे हेरून त्‍याप्रमाणे सांगत होते.

४. ‘घर हा आश्रमच आहे’, या भावाने खोलीची नियमित स्‍वच्‍छता आणि शुद्धी करणे

दादा ‘घर हे आश्रमच आहे’, या भावाने स्‍वतः रहात असलेली खोली आणि ते वापरत असलेले प्रसाधनगृह यांची प्रतिदिन स्‍वच्‍छता करायचे. ते त्‍यांच्‍या खोलीची नियमितपणे शुद्धी करत होते. ते इथून गेल्‍यानंतरही त्‍या खोलीत चैतन्‍य जाणवते. ‘त्‍या खोलीत एक प्रकारचा सुगंध दरवळत आहे’, अशी अनुभूती मला आणि माझ्‍या मुलाला (श्रीवल्लभला) आली. दादांच्‍या या कृतीमुळे मलाही ‘घरातील अन्‍य खोल्‍या त्‍यांनी ठेवलेल्‍या खोलीप्रमाणे स्‍वच्‍छ आणि सुंदर दिसाव्‍यात’, असे वाटले. त्‍यामुळे मी घरातील अन्‍य कक्षांचीही स्‍वच्‍छता केली.

५. व्‍यष्‍टी साधनेचे गांभीर्य 

दादांना सेवेमुळे झोपायला विलंब होत असे. ते रात्री १२ वाजेपर्यंत झोपत नसत, तरीही ते सकाळी उठून त्‍यांची व्‍यष्‍टी साधना पूर्ण करायचे. ते ‘स्‍वतःच्‍या समवेत आमचीही व्‍यष्‍टी साधना व्‍हावी’, यासाठी प्रयत्न करत असत.

६. धर्मकार्याची तीव्र तळमळ 

६ अ. हिंदु जनजागृती समितीच्‍या कार्यकर्त्‍यांना सेवेत साहाय्‍य करणे : एकदा मी दादांना नागपूर येथे प्रत्‍येक रविवारी होत असलेल्‍या धर्मप्रेमींच्‍या वर्गात येऊन मार्गदर्शन करण्‍याची विनंती केली. तेव्‍हा त्‍यांनी लगेच होकार दिला. दादांनी ‘या कार्यक्रमाचे नियोजन कसे करायला हवे ? त्‍यातील लहानातील लहान सेवेचे चिंतन करून त्‍यातील बारकावे कसे शोधायचे ?’, हे आम्‍हाला सांगितले. दादांनी आमच्‍याकडून भावाच्‍या स्‍तरावर सर्व होण्‍यासाठी त्‍यासंबंधी चिंतन आणि कृती करवून घेतली. त्‍यामुळे आम्‍हाला वर्गातील धर्मप्रेमींची कृतीशीलता वाढल्‍याचे लक्षात आले.

६ आ. एकाच वेळी अनेक सेवा सहजतेने करणे आणि सेवा करतांना देहभान विसरणे : दादा संपूर्ण दिवस ‘कार्यक्रमांचे नियोजन करणे, धर्मप्रेमींशी संपर्क करणे आणि विविध उपक्रमांनिमित्त सत्‍संग घेणे’, यांत व्‍यस्‍त असायचे. दादा स्‍वस्‍थ बसले आहेत, असे मी कधीही पाहिले नाही, तरीही ते रात्री थकलेले दिसले नाहीत. रात्री होणार्‍या सत्‍संगातही ते तेवढ्याच उत्‍साहाने मार्गदर्शन करायचे. त्‍यामुळेे कार्यकर्त्‍यांना आलेला थकवा आणि मरगळ दूर होऊन त्‍यांचाही उत्‍साह वाढल्‍याचे लक्षात आले. दादा एकाच वेळी अनेक सेवा सहजतेनेे करत होते. ते देहभान विसरून सेवा करायचे.

६ इ. अभ्‍यासवर्गामध्‍ये ‘धर्मप्रेमींना कृतीप्रवण कसे करायचे ?’, याची प्रायोगिक स्‍तरावरील सोपी सूत्रे सांगणे : एकदा दादांनी ‘सत्‍संग किंवा अभ्‍यासवर्ग घेत असतांना ‘१०० टक्‍के सकारात्‍मक राहून कसे प्रयत्न करायला हवेत ?’, हे कार्यकर्त्‍यांना सांगितले. त्‍यांनी अभ्‍यासवर्गात कार्यकर्त्‍यांना ‘धर्मशिक्षणवर्ग घेतांना केवळ तात्त्विक विषयांवर भर न देता धर्मप्रेमींना कृतीप्रवण कसे करायचे ?’, याची प्रायोगिक स्‍तरावरील सोपी सूत्रे सांगितली. त्‍यामुळे ‘धर्मशिक्षणवर्ग घेणे’, ही सेवा अत्‍यंत सोपी आहे आणि सर्व जण ती सेवा करू शकतात’, याविषयी कार्यकर्त्‍यांचा आत्‍मविश्‍वास वाढला.

६ ई. कार्यकर्त्‍यांना क्रियाशील होण्‍यास उद्युक्‍त करणे : सत्‍संगात सकारात्‍मकता निर्माण झाल्‍यावर दादा लगेचच कार्यकर्त्‍यांचे नियोजन करून देत आणि तत्‍परतेने पुढील कार्याची दिशा ठरवून ध्‍येयनिश्‍चिती करून देत. यामुळे कार्यकर्ते क्रियाशील झाले.

६ उ. ‘कार्यकर्त्‍यांची साधना व्‍हावी’, अशी तळमळ असणे : मला दादांकडून ‘कार्यकर्त्‍यांना आध्‍यात्‍मिक स्‍तरावर कसे हाताळायला हवे ?’, हा त्‍यांचा एक अत्‍यंत महत्त्वाचा गुण शिकायला मिळाला. दादांनी अनेक वर्षांपासून साधना करणार्‍या कार्यकर्त्‍यांचा सत्‍संग घेतला. तेव्‍हा त्‍यांनी कार्यकर्त्‍यांना सुस्‍पष्‍टपणे जाणीव करून दिली, ‘‘आपण धर्मकार्य केले नाही, तरीही ते होणारच आहे; परंतु आपल्‍या जन्‍माचे कल्‍याण होण्‍यासाठी आपण आपली साधना म्‍हणून ते करणे आवश्‍यक आहे.’’ ते कार्यकर्त्‍यांना अशी जाणीव करून देत असतांना त्‍यांची ‘इतरांची साधना व्‍हावी’, ही तळमळ आणि त्‍यांचा कार्यकर्त्‍यांप्रतीचा प्रेमभाव माझ्‍या लक्षात येत होता. त्‍यांच्‍या या सत्‍संगात अनेक कार्यकर्त्‍यांची भावजागृती झाली. दादांचे धर्मप्रसाराचे कार्य आणि साधना वाढवण्‍यासाठीचे सर्व दृष्‍टीकोन सुस्‍पष्‍ट असायचे.

६ ऊ. कार्यकर्त्‍यांच्‍या शंका आणि अडचणी सोडवणे : कार्यकर्ते काही आध्‍यात्मिक सूत्रे सांगत असतांना दादा ती डोळे मिटून ऐकायचे. त्‍या वेळी ‘ते कार्यकर्त्‍यांच्‍या मनातील ‘गुरु आणि गुरुकार्य’ यांप्रतीचा भाव तपासून पहात आहेत’, असे मला जाणवले. दादा कार्यकर्त्‍यांच्‍या शंका दूर करून त्‍यांच्‍या अडचणी सोडवायचे.

७. चुकांची प्रेमाने जाणीव करून देणे 

दादा आमच्‍या घरी वास्‍तव्‍याला असतांना आमच्‍याकडून काही चुका झाल्‍या. तेव्‍हा दादांनी आम्‍हाला त्‍या चुकांची प्रेमाने जाणीव करून दिली. त्‍यामुळे आमच्‍या मनात चुकांप्रती गांभीर्य निर्माण झाले, तसेच त्‍यांना चुका सांगतांना आम्‍हाला ताण आला नाही.

८. भाव 

८ अ. कुटुंबियांप्रती कृतज्ञताभाव : एकदा मी दादांकडे त्‍यांच्‍या पत्नीचे छायाचित्र पहाण्‍याची इच्‍छा व्‍यक्‍त केली. तेव्‍हा दादांना ते छायाचित्र भ्रमणभाषवर पुष्‍कळ वेळ शोधावे लागले. यावरून ‘सुनीलदादा कुटुंबियांमध्‍ये अडकलेले नाहीत’, हे लक्षात आले; परंतु ते त्‍यांच्‍या पत्नीविषयी सांगत असतांना त्‍यांच्‍या बोलण्‍यातून ‘पत्नीमुळेच मी साधना करू शकत आहे’, असा कृतज्ञतेचा भाव जाणवत होता. ते स्‍वतःच्‍या मुलाविषयी सांगत असतांनाही ‘तो आश्रमात आहे आणि गुरुकृपेने त्‍याची साधना उत्तम प्रकारे चालू आहे’, असे समाधान त्‍यांच्‍या बोलण्‍यातून व्‍यक्‍त होत होते.

८ आ. सद़्‍गुरूंप्रती भाव : दादांनी ‘सद़्‍गुरु स्‍वाती खाडये यांच्‍या वागण्‍यात किती सहजता आणि आत्‍मीयता आहे ! सद़्‍गुरु अनुराधा वाडेकर यांच्‍या जीवनातील प्रसंगातूनही आपल्‍याला कसे शिकायला मिळते ?’, याविषयी आम्‍हाला भावपूर्णपणे सांगितले.

८ इ. गुरूंप्रती भाव : एकदा आम्‍ही परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍याविषयी बोलत होतो. तेव्‍हा आम्‍हाला दादांच्‍या तोंडवळ्‍यावर गुरुदेवांप्रती पुष्‍कळ भाव जाणवत होता. ते गुरुदेवांविषयी आठवणी सांगतांना त्‍यांच्‍यातील भावामुळे ‘ते प्रसंग आमच्‍या समोरच घडत आहेत आणि आम्‍ही ते प्रसंग अनुभवलेले आहेत’, असे आम्‍हाला जाणवले.

९. जाणवलेला पालट 

प्रत्‍येक वेळी दादांना पहातांना ‘दादा पूर्वीपेक्षा अधिक अंतर्मुख झाले आहेत’, असे आम्‍हाला जाणवलेे.

१०. अनुभूती

घरकाम आणि सेवा यांमुळे मी दादांविषयीची सूत्रे रात्री १२ वाजता लिहायला आरंभ केला. गुरुदेवांच्‍या चरणी प्रार्थना करून सूत्रे लिहित असतांना कुठेही उदबत्ती लावली नसतांनाही मला २ – ३ वेळा अकस्‍मात् सुगंध आला. तेव्‍हा मला प.पू. गुरुदेवांचे अस्‍तित्‍व जाणवत होते.

११. कृतज्ञता आणि प्रार्थना

‘परात्‍पर गुरुदेवांनी आम्‍हाला पू. अशोक पात्रीकर यांच्‍यासारखे साधनेविषयी मार्गदर्शन करणारे संत आणि श्री. सुनीलदादा यांच्‍यासारखे तळमळीने धर्मकार्य करणारे हिंदु जनजागृती समितीचे राज्‍य संघटक दिले’, यासाठी मी श्री गुरुचरणी कोटीशः कृतज्ञता व्‍यक्‍त करते.

‘श्री. सुनीलदादा यांच्‍याकडून शिकायला मिळालेली सर्व सूत्रे आमच्‍या आचरणात येऊन आम्‍हा सर्वांची जलद गतीने आध्‍यात्‍मिक उन्‍नती व्‍हावी’, अशी माझी श्री गुरुचरणी प्रार्थना आहे.’

– सौ. गौरी विद्याधर जोशी, नागपूर (१८.१.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक