नवी मुंबईमध्‍ये पर्यावरणदिनी वृक्षारोपण मोहीम; एक लाख वृक्षारोपणाचा संकल्‍प

 क्रांतिसिंह नाना पाटील उद्यानामध्‍ये वृक्षारोपण मोहीम

नवी मुंबई, ६ जून (वार्ता.) – जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ५ जून या दिवशी वाशी सेक्‍टर १४ येथील क्रांतिसिंह नाना पाटील उद्यानामध्‍ये भाजप, ग्रीन होप संस्‍था आणि श्री गणेशजी नाईक चॅरिटेबल ट्रस्‍ट यांच्‍या माध्‍यमातून भव्‍य वृक्षारोपण मोहीम राबवण्‍यात आली. या वेळी एक लाख वृक्षारोपणाचा संकल्‍प करण्‍यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्‍हणून ऐरोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संदीप नाईक हे उपस्‍थित होते.

या वेळी नाईक म्‍हणाले की, पर्यावरणरक्षणाचा आरंभ स्‍वतःपासून करणे आवश्‍यक आहे. केवळ ५ जून नव्‍हे, तर वर्षाच्‍या ३६५ दिवसांमध्‍ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव ठेवली पाहिजे. नवी मुंबईमध्‍ये पर्यावरणविषयक कृतीशील जाणीव दिसून येत असून ग्रीन होप आणि अन्‍य स्‍वयंसेवी संस्‍थांच्‍या माध्‍यमातून अनेक पर्यावरण संवर्धनाचे आणि जनजागृतीचे कार्यक्रम सातत्‍याने राबवण्‍यात येत आहेत. मँग्रो मार्शल सारख्‍या संस्‍था खाड्या, समुद्र, नद्या येथील प्रदूषण रोखण्‍याचे कौतुकास्‍पद कार्य करीत आहेत.  प्रदूषणासाठी घातक प्‍लास्‍टिकचा वापर टाळायला हवा.

याप्रसंगी एक लाख रोपे लावण्‍याचा आणि जगवण्‍याचा संकल्‍प करण्‍यात आला. या कार्यक्रमातून पर्यावरणाच्‍या रक्षणाचा संदेश देण्‍यात आला. नागरिकांचे वाढदिवस वृक्षारोपण करून साजरे करण्‍यात आले. समाजातील गुणवंतांचा सत्‍कार करतांना त्‍यांना वृक्षरोपे आणि पर्यावरणपूरक जूटच्‍या पिशव्‍या भेट देण्‍यात आल्‍या.

विनामूल्‍य वृक्षरोपांचे वाटप

ग्रीन होप संस्‍थेतर्फे वृक्षरोपांच्‍या विनामूल्‍य वितरणाचा उपक्रम राबवण्‍यात येणार आहे. ज्‍या व्‍यक्‍ती आणि संस्‍थांना वृक्षारोपणासाठी वृक्ष रोपे पाहिजे असतील त्‍यांनी नवी मुंबई भारतीय जनता पार्टी बोनकोडे कार्यालय येथे शैलेश गोगावले  मोबाईल क्रमांक 8451869616 आणि ऐरोली कार्यालय येथे अनिल मिश्रा यांच्‍याशी 7718888108 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.