मनसे आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे येथे ७ दिवसांचा शौर्यजागृती वर्ग पार पडला !

शौर्यजागृती वर्गात सहभागी युवक आणि युवती

ठाणे – प्रत्येकाने स्वतःच्या रक्षणासाठी सिद्ध असायला हवे, याकरता महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमानाने ठाणे येथे ७ दिवसांच्या शौर्यजागृती वर्गाचे आयोजन केले होते. शास्त्रीनगर येथील पटांगणात या वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या ७ दिवसांत प्रशिक्षणार्थींना कराटे, लाठीकाठी आणि दंडसाखळीचे प्रशिक्षण, तसेच बचावाचे सोपे तंत्र शिकवण्यात आले. १६ ते ४० या वयोगटातील अनेक युवक आणि युवती यांनी या शौर्यजागृती वर्गाचा लाभ घेतला.

प्रशिक्षण वर्गापूर्वी प्रार्थना करताना

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून या वर्गाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी ‘स्वसंरक्षण प्रशिक्षण प्रत्येकाने शिकणे का आवश्यक आहे ?  ते येणार्‍या काळात आपल्याला कसे उपयुक्त आहे’, या संदर्भात हिंदु जनजागृती समितीचे श्री. अमोल पाळेकर यांनी मुलांना अवगत केले. ‘शारीरिक प्रशिक्षणासमवेत आध्यात्मिक बळही आवश्यक असल्याने ‘नामजप कोणता करावा ?’, ‘कुलदेवता आणि दत्त यांच्या नामजपाचे महत्त्व’ , ‘नमस्कार करण्याची योग्य पद्धत’, ‘हॅलोऐवजी नमस्कार का म्हणावे ?’, अशी धर्मशिक्षणाची माहितीही या वेळी देण्यात आली.

१.  श्री. संदीप पाचंगे, सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य आणि विभाग अध्यक्ष, ओवळा माजिवडा विधानसभा, मनसे – उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांनी भ्रमणभाषवर वेळ वाया घालवण्यापेक्षा स्वरक्षण प्रशिक्षण शिकून इतरांनासुद्धा याविषयी माहिती द्यावी. तसेच या वर्गात स्वतःच्या ओळखीच्या मुलांनाही सहभागी करून घ्यावे.

२. श्री. अमोल राणे, पदाधिकारी, मनसे – तरुण-तरुणींच्या दृष्टीने हे प्रशिक्षण आवश्यक असल्यामुळे आठवड्यातून २-३ दिवस प्रत्येकाने या वर्गासाठी वेळ द्यावा.

युवक-युवतींनी व्यक्त केलेले मनोगत

१. श्री. साहिल पळसमकर – मी अगोदर कराटेचा वर्ग लावला होता; पण तो कधी गंभीर्याने केला नाही आणि अर्धवट सोडून दिला. या वर्गात सोप्या पद्धतीने सर्व शिकता आले. मी नियमित या वर्गाला येऊन स्वतःला सिद्ध करीन.

२. कु. श्रावणी मेस्ट – माझी बहीण कराटेच्या वर्गाला जायची. तिला बघून मला त्या सर्व प्रकारांची भीती वाटायची; पण जेव्हा या वर्गाचा निरोप आला, तेव्हा ‘एकदा जाऊन बघूया’, असे वाटले. पहिल्या दिवशी मी प्रात्यक्षिके मनापासून केली नाहीत; पण जेव्हा महिलांवरील अत्याचारांची माहिती सांगितली, तेव्हापासून मी मनापासून शिकायला आरंभ केला. मला कुणाशी बोलायलासुद्धा भीती वाटायची; पण आता मी मोकळेपणाने चारचौघात बोलू शकते आणि माझा आत्मविश्वास त्यामुळे वाढला आहे.

३. कु. दीपिका घरत – ‘मी स्वतः‘७ दिवसांत हे सर्व शिकू शकते’, असे मला वाटले नव्हते; पण या वर्गामुळे माझा आत्मविश्वास वाढला आहे. धर्मशिक्षणाच्या संदर्भात जी आम्हाला माहिती नाही, ते तुम्ही सांगितली, त्यासाठी धन्यवाद आणि मला ते नियमित ऐकायला आवडेल.

प्रशिक्षण वर्गात प्रात्यक्षिके करतांना युवक आणि युवती

विशेष सहकार्य

या शौर्यजागृती वर्गासाठी मनसेचे सरचिटणीस आणि महाराष्ट्र राज्य अन ओवळा-माजिवडा विधानसभा क्षेत्राचे विभाग अध्यक्ष श्री. संदीप पाचंगे आणि अन्य पदाधिकारी यांनी स्वतः पुढाकार घेऊन सर्व आयोजन केले. हा वर्ग मैदानात होत असल्यामुळे तेथे अन्य वेळी मुले क्रिकेट खेळत असत. तेव्हा मनसेचे सर्व पदाधिकारी आणि अन्य कार्यकर्ते स्वतः मैदानात जाऊन त्यांना वर्गासाठी मैदान रिकामे करायला सांगायचे. संपूर्ण वर्ग संपेपर्यंत हे सर्व पदाधिकारी तेथेच थांबून साहाय्य करायचे.