मी समलैंगिक विवाहांच्या १०० टक्के विरोधात ! – सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश कुरियन जोसेफ

नवी देहली – मी समलैंगिक विवाहांच्या १०० टक्के विरोधात आहे, असे विधान सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश कुरियन जोसेफ यांनी केले आहे. ‘लाईव्ह लॉ’ या वृत्तसंकेतस्थळाने हे वृत्त दिले आहे.

माजी न्यायाधीश कुरियन जोसेफ म्हणाले की,

१. विवाहाचा उद्देश वेगळा असतो. विवाहचे मूळ हे पुरुष आणि स्त्री यांच्यातील मीलन आहे. समलिंगी संबंध हे ‘युनियन’ किंवा ‘असोसिएशन’ यांप्रमाणे आहे. विवाहानंतर स्त्री आणि पुरुष एकत्र येऊन मुलांना जन्म देतात.

२. समलिंगी विवाह नैतिकतेला धरून नाही. समलिंगी संबंध ठेवणे, एकत्र रहाणे, मैत्री असणे, घनिष्ठ मैत्री असणे, विशेष मित्र असणे हे सगळे असू शकते; मात्र त्यांच्यात विवाह होऊ शकत नाही. विवाह ही वेगळी संकल्पना आहे. विवाहाला समाजात एक विशेष स्थान आहे. समलिंगी संबंध हा असा प्रकार आहे जो विवाहाच्या मूळ उद्देशावर प्रभाव टाकू शकतो.

३. समलिंगी विवाह हे असे सूत्र आहे जे धर्म आणि संस्कृती यांच्याशी घट्टपणे जोडले गेले आहे. या सूत्रावर नैतिक स्तरावर वाद-विवाद झाले पाहिजेत. याकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टीकोन असला पाहिजे; मात्र आता प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे.त्यामुळे मी यावर अधिक भाष्य करू इच्छित नाही.