‘इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग’मधील पालटांमुळे झाला ओडिशातील रेल्वे अपघात ! – अश्‍विनी वैष्णव, रेल्वेमंत्री

रेल्वेमंत्री अश्‍विनी वैष्णव यांची माहिती !

(‘इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग’ म्हणजे रेल्वेगाडी एका रुळावरून दुसर्‍या रुळावर  जाण्यासाठी रुळांमध्ये ‘इलेक्ट्रॉनिक’ पद्धतीने करण्यात येणारा पालट)

भुवनेश्‍वर (ओडिशा) – ओडिशातील बालासोर येथे २ जून या दिवशी झालेल्या रेल्वे अपघातामागील कारण समोर आले आहे. रेल्वेमंत्री अश्‍विनी वैष्णव यांनी ‘ए.एन्.आय.’ या वृत्तसंस्थेला सांगितले की, या दुर्घटनेची चौकशी पूर्ण झाली असून अपघाताचे कारण स्पष्ट झाले आहे. या दुर्घटनेला कोण उत्तरदायी असणारे आहेत ?, तेदेखील स्पष्ट झाले आहे. ‘इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग’मधील पालटांमुळे ही दुर्घटना झाली.

१. रेल्वेमंत्री अश्‍विनी वैष्णव पुढे म्हणाले की, ४ जूनच्या संध्याकाळपर्यंत रेल्वे रुळ पूर्ववत् होतील. सर्व अपघातग्रस्त डब्यांतून मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. या मार्गावर रेल्वे गाड्यांची टक्करविरोधी कवच यंत्रणा अस्तित्वात नाही; मात्र या अपघाताचा त्याच्याशी काहीही संबंध नाही.

२. ‘इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग’मधील पालटामुळे कोरोमंडल एक्सप्रेस मालगाडी उभ्या असणार्‍या रुळावर वळवण्यात आली. त्यासाठी हिरवा सिग्नलही मिळाला होता. यामुळेच ही गाडी मालगाडीला जाऊन धडकली आणि अपघात झाला. रेल्वेगाडीचा चालक संपूर्णपणे या ‘इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग’द्वारे गाडी रुळावरून पुढे नेत असतो. जसे रुळ आपोआप पालटले जातात, तसेच गाडी या रुळावरून दुसर्‍या रुळावर जात असते. या ‘इंटरलॉकिंग’मध्ये पालट झाल्याने एकाच रुळावर दोन गाड्या आल्या आणि अपघात झाला.