बुलंदशहरमधील ४ मंदिरांतील देवतांच्या मूर्तींची तोडफोड !

  • हिंदू संतप्त !

  • मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त

४ मंदिरांतील देवतांच्या मूर्तींची तोडफोड !

बुलंदशहर (उत्तरप्रदेश) – समाजकंटकांनी ४ मंदिरांतील अनेक देवतांच्या मूर्तींची तोडफोड केली. बुलंदशहरमधील गुलावटी येथील बराल गावात ही घटना घडली. या घटनेनंतर हिंदुत्वनिष्ठ संघटनांसह समस्त हिंदूंनी संताप व्यक्त करत मंदिरांना संरक्षण देण्याची मागणी केली.

३१ मेच्या रात्री उशिरा ही घटना घडली. दुसर्‍या दिवशी सकाळी जेव्हा भाविक येथील एका मंदिरांत पूजा-अर्चा करण्यासाठी गेले, तेव्हा त्यांना देवतांच्या मूर्तींची तोडफोड करण्यात आल्याचे दिसून आले. यानंतर अशी तोडफोड आणखी ३ मंदिरांतही झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. काही क्षणांत ही माहिती संपूर्ण गावात वार्‍यासारखी पसरली. त्यानंतर स्थानिक हिंदु ग्रामस्थ, तसेच हिंदुुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. या ४ मंदिरांपैकी एक मंदिर १०० वर्षांपूर्वीचे आहे.

पोलीस अधीक्षक सुरेंद्रनाथ तिवारी

आरोपींना लवकरच पकडू ! – पोलीस अधीक्षक सुरेंद्रनाथ तिवारी

या घटनेनंतर पोलिसांनी ही मंदिरे बंद केली आहेत. पोलीस अधीक्षक सुरेंद्रनाथ तिवारी यांनी आरोपींना शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आश्‍वासन हिंदूंना दिले. सध्या घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

(ही छायाचित्रे / व्हिडिओ देण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नसून सर्वांना वस्तूस्थिती कळावी, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहे. – संपादक)

संपादकीय भूमिका

उत्तरप्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांचे हिंदुत्वनिष्ठ सरकार असतांना अशा घटना घडू नयेत, असेच हिंदूंना वाटते !