२ सहस्र रुपयांच्या नोटा पालटून घेण्यासाठी नक्षलवाद्यांची खटपट !

रायपूर – रिझर्व्ह बँकेने २ सहस्र रुपयांच्या नोटा चलनातून काढून घेतल्यानंतर छत्तीसगड राज्यातील बस्तरमधील नक्षलवादी संघटनेला मोठा झटका बसला आहे. स्वतः जवळील २ सहस्र रुपयांच्या नोटा पालटून घेण्यासाठी नक्षलवादी खटपट करत आहेत. बस्तर विभागातील विजापूर, सुकमा, दंतेवाडा, नारायणपूर यांसह इतर नक्षलग्रस्त भागांत नक्षलवाद्यांकडे मोठ्या संख्येने २ सहस्र रुपयांच्या नोटा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.

नक्षलवादी सप्टेंबर मासापूर्वी ग्रामीण आणि शहरी भागांत या नोटा खपवण्याचा प्रयत्न करू शकतात किंवा ते त्यांच्या सहकार्‍यांच्या माध्यमातून बँक खात्यात जमा करू शकतात. हे लक्षात घेऊन बस्तर पोलिसांसह सर्व सुरक्षा यंत्रणा पूर्णपणे सतर्क झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच विजापूर भागात पोलिसांनी नक्षलवादी कमांडर मल्लेश याच्याकडून ६ लाख रुपयांची रोकड जप्त केली होती. ही संपूर्ण रक्कम २ सहस्र रुपयांच्या नोटांचीच होती.

बस्तरचे पोलीस महानिरीक्षक सुंदरराज पी. यांनी सांगितले की, बस्तरमधील नक्षलवादी संघटना प्रतिवर्षी व्यापारी, कंत्राटदार आणि इतर लोक यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शुल्क वसूल करतात. हे शुल्क रोकडमध्ये घेतले जाते. या पैशांच्या जोरावर नक्षलवाद्यांनी त्यांची संघटना प्रबळ केली आहे. गेल्या ४० वर्षांपासून बस्तरमध्ये समांतर सरकार चालवण्यातही नक्षलवादी यशस्वी ठरले आहेत.