ज्येष्ठ शुक्ल द्वादशी (१.६.२०२३) या दिवशी सनातनच्या देवद (पनवेल) येथील आश्रमात पूर्णवेळ साधना करणार्या सौ. नम्रता राजेंद्र दिवेकर यांचा ३८ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त देवद आश्रमातील साधक श्री. दीपक गोडसे यांना सौ. नम्रता दिवेकर यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्याविषयी सुचलेले काव्य येथे दिले आहे.
सौ. नम्रता दिवेकर यांना ३८ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
१. नम्रपणा आणि सहजता
‘सौ. नम्रताताई (सौ. नम्रता राजेंद्र दिवेकर) साधकांशी नम्रपणे आणि सहजतेने संवाद साधतात. त्या साधकांची विचारपूस करतात आणि प्रसंगानुरूप त्यांचे कौतुकही करतात.
२. तत्त्वनिष्ठता
२ अ. चूक तत्परतेने सांगून ‘योग्य काय हवे ?’, हेही सांगणे : एखाद्या प्रसंगात त्यांना साधकांची चूक लक्षात आल्यास, त्या लगेच साधकांना चुकीची जाणीव करून देतात आणि ‘या प्रसंगात कशी विचारप्रक्रिया असायला हवी ? योग्य काय हवे होते ?’, हेही त्या साधकांना सांगतात. त्यांच्यामध्ये जेवढा नम्रपणा आहे, तेवढ्याच त्या तत्त्वनिष्ठ राहून साधकांना त्यांच्या चुका सांगून साधनेत साहाय्य करतात.
२ अ १. ‘साधकात पालट व्हावा’, यासाठी त्याचा पाठपुरावा घेऊन प्रयत्न करून घेणे : त्या माझ्याकडून होणार्या चुकांची मला वेळोवेळी जाणीव करून देतात आणि ‘माझ्याकडून त्याच चुका पुनःपुन्हा होऊ नयेत’, यासाठी मी काय प्रयत्न करायला हवेत ?’, हेही मला सांगतात. ‘माझ्यात पालट व्हावा’, यासाठी त्या माझा पाठपुरावा घेऊन माझ्याकडून तसे प्रयत्न करून घेतात.
३. प्रत्येक परिस्थितीत स्थिर रहाणे
अ. नम्रताताईंच्या वडिलांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले, तेव्हा त्या एकदम स्थिर होत्या.
आ. वर्ष २०२२ मध्ये त्यांच्या सासर्यांचे एका अपघातात निधन झाले. तेव्हा ती परिस्थिती अकस्मात् निर्माण झाली होती. त्या परिस्थितीविषयी बोलतांना त्या म्हणाल्या, ‘‘ही सर्व परिस्थिती हाताळणे पुष्कळ कठीण आहे; पण देवच सर्व करून घेईल.’’
४. इतरांचा विचार
४ अ. ‘साधकाच्या आई-वडिलांची साधना व्हावी’, अशी तळमळ असणे : माझ्या आई-बाबांचे देवद आश्रमात पूर्णवेळ साधनेसाठी यायचे नियोजन चालू होते. याविषयी माझे नम्रताताईंशी बोलणे झाले होते. त्यानंतर माझे काही सेवेनिमित्त त्यांच्याशी बोलणे झाल्यावर त्या मला आठवणीने विचारायच्या ‘‘आई-बाबांचे आश्रमात यायचे कुठपर्यंत आले आहे ?’’
४ अ १. साधकाला ‘तुझ्या आई-वडिलांच्या सर्व अडचणी सोडवण्याचे दायित्व तुझे आहे’, अशी जाणीव करून देऊन त्यासाठी साधकाचा पाठपुरावा घेणे : नम्रताताई मला म्हणाल्या, ‘‘तुझे आई-बाबा स्वतःहून त्यांच्या उत्तरदायी साधकांना विचारत नाहीत, तर तू तिथल्या उत्तरदायी साधकांना संपर्क कर. ‘तिथे काही अडचण आहे का ?’, ते विचारून घे. हे सर्व दायित्व तुझेच आहे. तुझ्या आई-बाबांचीही साधना झाली पाहिजे आणि त्यासाठी ते लवकर आश्रमात आले पाहिजेत’, असे तुला वाटायला हवे. त्यासाठी तू प्रयत्न करायला हवेस.’’ यातून त्यांनी मला माझ्या दायित्वाची जाणीव करून दिली. अन्यथा मी आई-बाबांना १५ दिवसांतून एकदाच आश्रमात येण्याविषयी विचारत होतो आणि १ – २ वेळा विचारून सूत्र सोडून देत होतो.
सौ. नम्रताताईंनी माझ्या आई-बाबांना २ – ३ वेळा संपर्क करून त्यांना ‘काही अडचण येत आहे का ?’, असे विचारले. माझ्या आई-बाबांचे आश्रमात यायचे निश्चित होईपर्यंत त्यांनी सतत माझा पाठपुरावा घेऊन माझ्याकडून प्रयत्न करून घेतले. त्यांच्या तळमळीमुळेच मी माझ्या आई-बाबांचे आश्रमात यायचे नियोजन करू शकलो.
४ आ. साधकाला त्याच्या आई-वडिलांना आश्रमाच्या कार्यपद्धतीविषयी सहजतेने सांगायला सांगणे आणि ते आश्रमात आल्यानंतरही ‘त्यांना काही अडचणी नाहीत ना ?’, याविषयी विचारून घेणे : नम्रताताईंनी माझे आई-बाबा आश्रमात येण्यापूर्वी मला आश्रमातील कार्यपद्धतीविषयी त्यांना सांगायला सांगितले होते. त्या मला म्हणाल्या, ‘‘कार्यपद्धती सांगतांना त्यांना ताण येणार नाही, अशा सहजतेने सांग. त्यामुळे आई-बाबांना आश्रमातील काही गोष्टी ठाऊक होतील.’’ आई-बाबा आश्रमात आल्यानंतर त्यांनी ‘आई-बाबांना काही अडचणी नाहीत ना !’ असे विचारून मला आई-बाबांच्या समवेत याविषयी मोकळेपणाने बोलायला सांगितले.
४ इ. नम्रताताईंमधील लक्षात आलेले विविध गुण ! : नम्रताताईंनी मला सेवा आणि साधना यांसाठी पुष्कळ साहाय्य केले आहे. त्यांनी माझे आई-बाबा पूर्णवेळ साधना करण्यासाठी आश्रमात येईपर्यंत आणि नंतरही मला वेळोवेळी योग्य दृष्टीकोन दिले. या प्रसंगांतून मला त्यांच्यातील नम्रपणा, इतरांचा विचार, प्रेमभाव आणि तळमळ असे विविध गुण शिकता आले.
५. कृतज्ञता आणि प्रार्थना
‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊली, ‘माझी साधना व्हावी’, यासाठी आपणच मला आपल्याला प्राणप्रिय असलेल्या साधकांच्या सहवासात ठेवून त्यांच्याकडून शिकण्याची संधी दिली आहे’, यासाठी मी आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो आणि ‘माझ्या साधनेसाठी आवश्यक असे प्रयत्न आपणच माझ्याकडून करून घ्यावेत’, अशी आपल्या श्री चरणी शरणागत भावाने प्रार्थना करतो.’
– आपलाच चरणसेवक,
श्री. दीपक गोडसे, सनातन आश्रम, देवद, पनवेल.
(१०.५.२०२३)
श्री गुरुचरणी जाण्याचे एकच ध्येय असावे मनी ।सहजता आणि निर्मळता असे वागण्यात । लावला जीव आश्रमातील लहान थोरांनाही । स्मित हास्यापेक्षा खळखळते हास्य वहाते ओसंडून । सेवा परिपूर्ण करण्यासाठी प्रयत्नरत रहावे तुम्ही । श्री गुरुचरणी जाण्याचे एकच ध्येय असावे मनी । – आपलाच चरणसेवक, श्री. दीपक गोडसे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१०.५.२०२३) |
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |