मंदिरांच्या विकासासाठी रत्नागिरी जिल्ह्याला गेल्या ५ वर्षांमध्ये साडेदहा कोटी रुपये संमत !

पर्यटनाला चालना मिळण्याचा मानस

रत्नागिरी – येथील गावागावांमधील मंदिरांना ग्रामीण यात्रास्थळाचा दर्जा शासनाकडून देण्यात आला आहे. त्यानुसार प्रतिवर्षी शासन यात्रास्थळांच्या विकासासाठी निधीचे प्रावधान करते. या योजनेतून रत्नागिरी जिल्ह्याला गेल्या ५ वर्षांमध्ये साडेदहा कोटी रुपयांचा निधी संमत झाला आहे. वर्ष २०२२-२३ मध्ये २ कोटी २५ लाख रुपये संमत झाले असून त्यातील कामे अंतिम टप्प्यात आहेत. ही मंदिरे सुशोभित केल्यास जिल्ह्यात पर्यटनाला चालना मिळू शकते, असे शासनाने म्हटले आहे.

जिल्हा परिषद ग्रामविकास विभागाकडून ग्रामीण यात्रास्थळांची निश्चिती केली जाते.  प्राचीन काळातील मंदिरांना इतिहास आहे. यामध्ये राजापूर तालुक्यातील कशेळी येथील सूर्यमंदिर, चिपळूण तालुक्यातील रामवरदायिनी मंदिर, धामणसे येथील रत्नेश्वर मंदिर, गुहागरमधील सोमेश्वर मंदिर, अशी जिल्ह्यात अनेक मंदिरे आहेत.

आध्यात्मिक लाभ होईल, या दृष्टीने मंदिरांचा विकास व्हायला हवा !

या मंदिरांचे सुशोभिकरणे करणे, परिसरात संरक्षण भिंत बांधणे किंवा परिसरात ‘पेव्हर ब्लॉक’ टाकणे, रस्ता करणे, पाखाडी बांधणे, सार्वजनिक स्वच्छता गृह बांधणे, सभा मंडप  यांसारख्या कामांसाठी शासनाकडून निधी दिला जातो. याचे प्रस्ताव पंचायत समितींकडून जिल्हा परिषद ग्रामविकास विभागाकडे दिले जातात. त्यांच्याकडून शासनाला सादर केल्यानंतर या कामांना संमती मिळते.

गेल्या ५ वर्षांमध्ये सर्वाधिक निधी २०२१-२१ या आर्थिक वर्षात ४ कोटी ४० लाख रुपये निधी संमत झाला असून २०२२-२३ या वर्षात सव्वा दोन कोटी रुपये निधी संमत होता. यामधून १९ कामे संमत झाली होती. ती कामे चालू आहेत.

संपादकीय भूमिका

केवळ पर्यटनाला चालना मिळण्यासाठी नव्हे, तर प्रत्येकाला आध्यात्मिक लाभ होईल, या दृष्टीने मंदिरांचा विकास व्हायला हवा !