सावंतवाडी (सिंधुदुर्ग) येथे ‘हिंदू एकता दिंडी’द्वारे हिंदुत्वाचा गजर !

  • सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने…

  • प.पू. दास महाराज, पू. (सौ.) लक्ष्मी (माई) नाईक आणि सद्गुरु सत्यवान कदम यांची वंदनीय उपस्थिती !

सावंतवाडी, २२ मे (वार्ता.) – हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी अखंडपणे कार्यरत असलेले सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने सावंतवाडी शहरातून ‘हिंदू एकता दिंडी’ काढण्यात आली. या दिंडीच्या माध्यमातून समस्त हिंदूंना देव, देश आणि धर्म यांच्या रक्षणासाठी, तसेच हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी पद, पक्ष, संघटना विसरून एक हिंदु म्हणून संघटित होण्याची हाक देण्यात आली. या ‘हिंदू एकता दिंडी’मध्ये ४५० हून अधिक हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मप्रेमी सहभागी झाले होते. पारंपरिक वेशात हातात भगवे झेंडे घेतलेले आणि भगवे फेटे परिधान केलेले हिंदुत्वनिष्ठ, तसेच चपई नृत्य, वारकरी पथक, लहान मुलांच्या ऐतिहासिक व्यक्तीरेखा यांमुळे सावंतवाडीतील वातावरण भारावून गेले होते.

श्रीफळ वाढवून फेरीचा प्रारंभ करतांना डॉ. नितीन मावळणकर

या वेळी पानवळ, बांदा येथील प.पू. दास महाराज, पू. (सौ.) लक्ष्मी उपाख्य माई नाईक आणि सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु सत्यवान कदम यांची वंदनीय उपस्थिती लाभली होती. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण भारतात ‘हिंदु राष्ट्र-जागृती अभियान’ राबवले जात आहे. या अभियानाचा भाग म्हणून, तसेच हिंदूंमधील ब्राह्मतेज जागृत करून त्यांना हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी कृतीप्रवण करण्यासाठी अशा दिंड्यांचे विविध ठिकाणी आयोजन केले जात आहे.

दिंडीतील सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची प्रतिमा असलेली पालखी
४५० हून अधिक राष्ट्र आणि धर्म प्रेमींसह निघालेली हिंदू एकता दिंडी
शहरातून निघालेली हिंदू एकता दिंडी

सावंतवाडी शहरात काढण्यात आलेल्या फेरीचा प्रारंभ गवळी तिठा येथून झाला. तत्पूर्वी सनातनचे उमाजी चव्हाण यांनी शंखनाद केला. त्यानंतर श्री. जयवंत देसाई यांच्या हस्ते धर्मध्वजाचे पूजन झाल्यावर सद्गुरु सत्यवान कदम यांच्या हस्ते धर्मध्वजाला पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी श्री. जनार्दन भागवत यांनी पौरोहित्य केले. डॉ. नितीन मावळणकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवल्यानंतर दिंडी मार्गस्थ झाली. पुढे एस्.टी. बसस्थानक, श्रीराम वाचन मंदिर, गांधीचौक, मुख्य बाजारपेठ, मिलाग्रीस हायस्कूल, पंचम खेमराज महाविद्यालय, सावंतवाडी नगरपरिषद कार्यालय, श्री देव नारायण मंदिरमार्गे पुन्हा एस्.टी. बस स्थानकाजवळ आल्यावर दिंडीची सांगता झाली. सांगतेच्या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. हेमंत मणेरीकर आणि सनातन संस्थेच्या सौ. अंजली हेमंत मणेरीकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

धर्मप्रेमी श्री. प्रशांत पेडणेकर यांनी दिंडीच्या मार्गात धर्मध्वजाचे पूजन केले

संत बाळूमामा संप्रदायाचे तालुक्यातील भालावल, विलवडे येथील चपई नृत्य पथक, मायनेवाडी, कोचरा येथील वारकरी संप्रदायाचे पथक, डोक्यावर कलश घेतलेल्या मळगाव येथील धर्मप्रेमी महिला यांच्यासह राष्ट्र आणि धर्म प्रेमी या दिंडीत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पोलिसांचे चांगले सहकार्य लाभले होते.

या दिंडीत ‘राणी पद्मिनी’, ‘कित्तूरची राणी चन्नमा’, स्वा. सावरकर, राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, वारकरी, झाशीची राणी लक्ष्मीबाई, नेताची सुभाषचंद्र बोस आदी ऐतिहासिक व्यक्तीरेखा लहान मुलांनी साकारून देव, देश, धर्म आणि संस्कृती यांच्या रक्षणासाठी कृतीप्रवण होण्याचे आवाहन केले. इन्सुली, तालुका सावंतवाडी येथील धर्मप्रेमी श्री. स्वागत नाटेकर आणि डेगवे येथील श्री. जयवंत देसाई हे दिंडीत सहभागी झाले होते.

दिंडीच्या अग्रस्थानी भगवा धर्मध्वज होता. त्यामागे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांची प्रतिमा असलेली पालखी होती. वीरश्री निर्माण करणार्‍या मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके, प्रथमोपचारकांचे पथक, वारकरी, पारंपरिक वेषात नृत्य करणार्‍या महिला, श्रीकृष्णभक्तीत तल्लीन झालेल्या गोपिका, लाठीकाठी घेतलेले स्वसंरक्षकांचे पथक अशी दिंडीची रचना होती.