शरीयत कायद्यातील एकतर्फी तलाकची प्रक्रिया रहित करा ! – क्रिकेटपटू महंमद शमी यांची पत्नी

‘तलाक’च्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका; न्यायालयाने केंद्रशासनाला पाठवली नोटीस !

नवी देहली – भारतीय क्रिकेटपटू महंमद शमी यांची पत्नी हसीन जहां यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करून स्वत:ला शरीयत कायद्यामुळे पीडित असल्याचे म्हटले आहे. त्यांनी एकतर्फी तलाक (तलाक-उल्-हसन) देण्याच्या शरीयतमधील तरतुदींचा विरोध करून त्यांना रहित करण्याची मागणी केली आहे. तसेच तलाकच्या प्रक्रियेला भारतीय दंडविधानाच्या अंतर्गत आणण्याचीही मागणी केली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, शरीयतमधील तरतुदींमुळे पुरुष त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या पत्नींना सोडून देतात.

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी ही याचिका स्वीकारली असून केंद्रशासनाला यासंदर्भात नोटीस पाठवली आहे. तसेच ‘तलाक-ए-हसन’संबंधी प्रलंबित याचिकांसह या याचिकेवरही एकत्रित सुनावणी करण्यात येईल’, असेही त्यांनी म्हटले आहे.

याचिकेमध्ये सांगण्यात आले आहे की,

१. मुसलमान पुरुष शरीयतच्या नियमांना अनुसरून महिलांना सामोपचार आदींसाठी कोणताच वेळ न देता थेट तलाक देण्याचा निर्णय घेतात. यामुळे कोणतीच चर्चा न करता महिलांवर तलाकचा निर्णय लादला जातो.

२. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या ‘शरीयत कायदा – १९३७’च्या अंतर्गत असणारे कलम दुसरे हे भारतीय राज्यघटनेच्या कलम १४, १५, २१ आणि २५ यांतर्गत नागरिकांना देण्यात आलेल्या मौलिक अधिकारांची पायमल्ली करणारे आहे. त्यामुळे त्यास घटनाबाह्य घोषित करायला हवे.

३. तलाकसंबंधी धर्म अथवा लिंग अशा कोणत्याच आधारावर भेदभाव न करता एक समान कायदा असणे आवश्यक आहे.

४. महंमद शमी यांनी २३ जुलै २०२२ या दिवशी पत्नी हसीन जहां यांना तलाकची नोटीस पाठवली होती. गेल्या ४ वर्षांपासून दोघेही वेगळे रहात असून शमी त्यांना भत्त्याच्या रूपात प्रतिमास १ लाख ३० सहस्र रुपये देत आहेत. दोघांना एक मुलगी आहे, जी पत्नीसमवेत रहाते.

संपादकीय भूमिका

  • समलैंगिक विवाहांपेक्षा ‘तलाक’ देण्याच्या कुप्रथेच्या माध्यमातून मुसलमान महिलांवरील होत असलेला अन्याय हा पुष्कळ गंभीर विषय असून न्यायालयाने हा विषय लवकरात लवकर निकाली काढावा, असेच संवेदनशील जनतेला वाटते !
  • केंद्रशासनाने देशभरात ‘समान नागरी कायदा’ लागू करून अशा समस्यांवर कायमचाच उपाय काढणे आवश्यक !
  • महिलाच्या अधिकारांच्या नावाखाली कंठशोष करणारे पुरो(अधो)गामी आता महंमद शमी यांच्या पत्नीच्या पाठीमागे का उभे रहात नाहीत ? कि मुसलमान महिलांच्या अधिकारांचे त्यांना कोणतेच मूल्य नाही ?