विश्व हिंदु परिषदेच्या वतीने रत्नागिरीत ‘सीता नवमी सप्ताह’

विश्व हिंदु परिषदेच्या वतीने ‘सीता नवमी सप्ताह’

रत्नागिरी, ४ मे (वार्ता.) – विश्व हिंदु परिषदेच्या वतीने २९ एप्रिल ते ५ मे २०२३ या कालावधीत ‘सीता नवमी सप्ताह’ साजरा केला जात आहे. या सप्ताहामध्ये शहरातील विविध ठिकाणी सीतामातेला वंदन करून सीतामाता चरित्राचा अभ्यास केला जात आहे. या कार्यक्रमांमध्ये भजन, गीतगायन, व्याख्यान, कथाकथन आदी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. शहरातील विविध भागांत आतापर्यंत ४ ठिकाणी सीता नवमी कार्यक्रम साजरा करण्यात आला. आज ५ मे या दिवशी अखेरचे कार्यक्रम होणार आहेत. सर्वत्रच्या या कार्यक्रमांना महिलावर्गाची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर होती.

‘महापतिव्रता सीतामाईचे चरित्र मातृशक्तीला प्रेरणादायी आणि मार्गदर्शक असल्याने सुसंस्कृत अन् सत्शील समाज निर्मितीसाठी सीतामाईचा आदर्श स्त्री शक्तीने ठेवावा’, अशी प्रतिक्रिया उपस्थित महिलावर्गाकडून व्यक्त केली जात आहे.

‘मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम आणि सती महापतिव्रता सीता यांच्या जीवनप्रवासाचा अभ्यास अन् त्यांनी आचरणात आणलेल्या मूल्यांचे अनुकरणानेच आदर्श कुटुंबे निर्माण होतील’, अशी भावना या कार्यक्रमांत व्यक्त होतांना दिसली.