पणजी, ३ मे (वार्ता.) – सडये, शिवोली येथील शालेय विद्यार्थ्यांचा अमली पदार्थ व्यवहारामध्ये सहभाग असल्याच्या प्रकरणांचे अन्वेषण करा, अशी मागणी गोवा राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने पोलीस अधीक्षक आणि अमली पदार्थविरोधी पथक यांच्याकडे लेखी स्वरूपात केली आहे. शिवोली पंचायतीच्या नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत शालेय विद्यार्थ्यांचा अमली पदार्थ व्यवहारामध्ये सहभाग असल्याचा आणि विद्यालयांमध्ये अमली पदार्थ सापडल्याच्या वृत्तावर चर्चा झाली होती. याविषयी वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर बाल हक्क संरक्षण आयोगाने ही मागणी केली आहे.
#GoaDiary_Goa_News Drugs jostle with schoolbooks in Siolim school, gram sabha erupts in anger https://t.co/4nMwGh1mli
— Goa News (@omgoa_dot_com) April 30, 2023
ग्रामसभेत म्हापसा पोलीस, अमली पदार्थविरोधी पथक आणि पंचायत अमली पदार्थ व्यवसायाच्या विरोधात गांभीर्याने कारवाई करत नसल्याबद्दल रोष व्यक्त करण्यात आला होता. शालेय विद्यार्थ्यांना अमली पदार्थ व्यवसायात गोवले जात आहे. ग्रामसभेत काही सदस्यांना अधिक प्रमाणात अमली पदार्थांचा व्यवहार चालणारी बाणकारवाडो, मायणा, पिलंबी आणि शेळ या भागांची नावे सांगितली होती. बाल हक्क संरक्षण आयोगाने या प्रकरणांची नोंद घेऊन अन्वेषण करण्याची मागणी केली आहे.
पोलिसांकडून कारवाईला प्रारंभ
सडये, शिवोली येथे विविध ठिकाणी अमली पदार्थाचा व्यवहार, मद्यपान आणि असामाजिक कृत्ये करत असल्याच्या तक्रारीनंतर म्हापसा पोलिसांनी स्थानिक पंचायतीच्या सहकार्याने ३ मे या दिवशी विविध भागांत धाडसत्र आरंभले आहे. या प्रकरणी २ तरुणांना कह्यात घेण्यात आले आहे. या भागांत पोलीस यापुढे साध्या वेशात देखरेख ठेवणार आहेत.
संपादकीय भूमिकाअशा गंभीर प्रकरणांचे अन्वेषण पोलीस स्वतःहून का करत नाहीत ? मागणी का करावी लागते ? |