‘साधकाने जिज्ञासूला साधनेकडे वळवण्याचा प्रयत्न करत असतांना साधकाने देवाला प्रार्थना करून त्याला शरण जायला हवे. जिज्ञासूंना संपर्क करण्याची सेवा परिणामकारक होण्यासाठी देवाने माझ्याकडून करून घेतलेले प्रयत्न पुढे दिले आहेत. २ एप्रिल २०२३ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘जिज्ञासूंना संपर्क करणे’, याविषयीचे सूत्र वाचले. आजच्या अंतिम लेखात अन्य सूत्रे येथे देत आहे.
(भाग २)
४. भाव
४ अ. सेवा करतांना ‘भाव’ हा घटक प्राणाइतका महत्त्वाचा असणे : ‘प्राणाविना मनुष्याच्या शरिराला काहीच महत्त्व रहात नाही. जिज्ञासूला संपर्क करण्याच्या सेवेत ‘भाव’ हा घटक प्राणाइतका महत्त्वाचा आहे. ‘भाव तेथे देव’, या उक्तीप्रमाणे संपर्काची सेवा करतांना साधकात भाव असणे महत्त्वाचे आहे. आपण संपर्काला जातो, तेव्हा देवाला समवेत घ्यायला हवे.
४ आ. समष्टी सेवा करतांना भाववृद्धीसाठी करावयाचे प्रयत्न !
१. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले सतत आपल्या समवेत आहेत’, असा भाव ठेवणे.
२. ‘देव जिज्ञासूंना कसे घडवतो ?’, ही ईश्वरी लीला अनुभवत त्याचा आनंद घेणे.
३. देवाचे कार्य पाहून स्वतःमध्ये कृतज्ञतेचा भाव आणि शरणागती निर्माण होण्यासाठी प्रयत्न करणे.
४. देवाचे कार्य पाहिल्यावर ‘देवासारखे नामानिराळे रहायला पाहिजे’, हे स्वतःच्या मनावर बिंबवणे.
५. सर्व भार देवावर सोपवण्यास शिकणे.
६. देवाच्याच कृपेने ‘जिज्ञासू साधनेकडे वळत आहेत’, ही जाणीव ठेवणे.
४ इ. सेवा करतांना देवाला करावयाच्या प्रार्थना ! : संपर्काच्या सेवेला जातांना देवाला पुढील प्रार्थना कराव्यात, ‘देवा, तू सतत माझ्या समवेत रहा. मला तुझा विसर पडला, तर तू मला तुझी आठवण करून दे. हे तुझे कार्य आहे. तू मला इथे आणले आहेस. ‘तुझ्या अखंड अनुसंधानात राहून सेवा कशी करायची ?’, हे तूच मला शिकव. ‘देवा, ‘तू या जिज्ञासूला कसा घडवत आहेस ?’, हे मला शिकव. या सेवेतून मला तुझी कृपा संपादन करायची आहे.’ अशा प्रार्थना करून संपर्काची सेवा केल्यास देव साहाय्याला येतोच !
४ उ. प्रत्येक संपर्कानंतर देवाप्रती कृतज्ञता व्यक्त करावी ! : जिज्ञासूला संपर्क करण्याची सेवा पूर्ण झाल्यावर देवाच्या चरणी शरणागतभावाने कृतज्ञता व्यक्त करावी. ‘सेवा करतांना देव आपल्यासाठी आला’, हे सर्व साधकांनी अंतर्मनात साठवायला हवे. सेवेत झालेल्या चुकांचे चिंतन करून त्यानंतरच पुढील संपर्क करण्यासाठी जावे. प्रत्येक संपर्कानंतर देवाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी न्यूनतम ५ मिनिटे द्यावीत.
हिंदु राष्ट्र येणारच आहे. ते स्थापन झाल्यावर सर्वत्रची बाह्य परिस्थिती वेगळी असेल; पण ‘हिंदु राष्ट्र’ येण्यासाठी आपण काय अनुभवले ? देवाने आतापर्यंत आपल्याकडून कशी साधना करून घेतली आणि आपत्काळात देवाने वेगवेगळ्या संकटांतून आपले रक्षण कसे केले ?’, हे सर्व हिर्यासारखे भावमय प्रसंग अंतर्मनात साठवून आपण ‘हिंदु राष्ट्रा’ची पहाट पहाणार आहोत.
‘हिंदु राष्ट्र’ आल्यावर समाजातील लोक कृतज्ञ होतील. तेव्हा आपल्या मनात परात्पर गुरु डॉक्टरांविषयीचा शरणागतभाव दाटून येईल आणि तो परात्पर गुरु डॉक्टरांच्या कीर्तीचे गुणगान करून कृतज्ञता व्यक्त करील.
(समाप्त)
– श्री. धनंजय हर्षे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.(४.३.२०२१)
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/668935.html