‘साधकाने जिज्ञासूला साधनेकडे वळवण्याच्या उद्देशाने त्याचा अभ्यास अथवा निरीक्षण देवाच्या अनुसंधानात राहून सहजभावात करायला हवे. त्यासाठी साधकाने देवाला प्रार्थना करून त्याला शरण जायला हवे. ‘देवा, तूच मला जिज्ञासूचा अभ्यास अन् निरीक्षण करायला शिकव’, अशी प्रार्थना देवाला केल्याने देव साधकाला जिज्ञासूंच्या संदर्भात अनेक गोष्टींचे निरीक्षण करायला शिकवतो. जिज्ञासूंना संपर्क करण्याची सेवा परिणामकारक होण्यासाठी देवाने माझ्याकडून करून घेतलेले चिंतन पुढे दिले आहे. (भाग १)
१. जिज्ञासूला संपर्क करणे
१ अ. जिज्ञासूचे वय आणि त्याची स्थिती जाणून त्यानुसार त्याच्याशी बोलणे : जिज्ञासूंना संपर्क करण्याची सेवा करतांना ‘मला जिज्ञासूला साधनेत साहाय्य करायचे असून त्यातून मलाही शिकायचे आहे’, ही जाणीव असणे’, हे साधकासाठी तितकेच महत्त्वाचे आहे. जिज्ञासूचे वय आणि त्याची स्थिती जाणून त्यानुसार त्याला संपर्क केला पाहिजे.
एकदा मी एका विज्ञापनदात्याच्या घरी गेलो होतो. घरी ते, त्यांची पत्नी आणि २ मुले होती. दुसर्या दिवशी त्या मुलांची परीक्षा होती; म्हणून मी मुलांना ‘तुम्ही अभ्यासाला जाऊ शकता’, असे सांगितले; पण आमचे बोलणे ऐकतांना ती दोन्ही मुले शेवटपर्यंत थांबली. नंतर लगेच त्यांनी सनातनच्या ग्रंथांची निवड करून ग्रंथ घेतले. त्यामुळे ‘त्यांची दोन्ही मुले जिज्ञासू आहेत’, असे माझ्या लक्षात आले.
१ आ. जिज्ञासूची प्रकृती ओळखणे
१ आ १. साधनेची आवड : साधकाला जिज्ञासूंचा अभ्यास पुढील सूत्रांनुसार करता येतो, ‘जिज्ञासूला साधनेची आवड आहे का ? आवड असेल, तर त्याचे साधनेच्या संदर्भात विचार कसे आहेत ? त्याची कोणत्या देवतेवर श्रद्धा आहे ? तो कोणती साधना करतो किंवा त्याला राष्ट्र आणि धर्म यांच्या संदर्भातील कोणत्या गोष्टींची आवड आहे ?’ इत्यादी.
१ आ २. जिज्ञासूचे ‘सनातन संस्थे’विषयी असलेले मत अभ्यासणे : जिज्ञासूचे ‘सनातन संस्थे’विषयी मत सकारात्मक आहे का किंवा त्याची सनातनविषयीची प्रतिक्रिया चांगली असेल, तर ‘त्याला सनातन संस्थेमधील नक्की काय आवडते ? उदा. सनातनचे ग्रंथ, सात्त्विक उत्पादने, सत्संग, राष्ट्र आणि धर्म यांविषयीचे कार्य’, हे जाणून घेऊन त्यानुसार आपण त्याला कृतीशील करू शकतो.
२. जिज्ञासूंचा अभ्यास करून त्यांच्यात होत असलेल्या पालटांच्या नोंदी करणे
जिज्ञासूला नियमित संपर्क करतांना त्याच्यात होत असलेल्या पालटांच्या नोंदीही त्या त्या वेळी आणि नेमकेपणाने ठेवाव्यात, उदा. साधकाने जिज्ञासूला पहिला संपर्क करतांना त्याला आध्यात्मिक प्रगतीसाठी कुलदेवीचा किंवा पूर्वजांचा त्रास दूर होण्यासाठी दत्ताचा नामजप करायला सांगितला असल्यास पुन्हा संपर्क करतांना जिज्ञासूने नामजपाला प्रारंभ केला का ? त्यात त्याला काही अडचणी आहेत का किंवा नामजप करतांना त्याला काही अनुभूती आल्या आहेत का ? त्याने दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचून त्यातील काही सूत्रे कृतीत आणली का ?’ इत्यादी. साधकाला असा अभ्यास करण्याची सवय लागायला हवी. जिज्ञासूला संपर्क केल्यावर साधकाने जिज्ञासूविषयी केलेल्या अभ्यासपूर्ण नोंदींमुळे त्याला लाभ होतात आणि त्या न ठेवल्यामुळे हानी होते.
२ अ. जिज्ञासूंच्या निरीक्षणांच्या नोंदी ठेवण्याचे लाभ !
१. ‘जिज्ञासूचा कल राष्ट्र, धर्म अथवा साधना यांपैकी कशाकडे आहे ?’, हे देव आपल्या लक्षात आणून देतो.
२. संपर्काच्या नोंदी नियमित ठेवल्याने जिज्ञासूच्या प्रकृतीचा अभ्यास योग्य पद्धतीने होऊन त्याला साधनेत साहाय्य करणे सुलभ जाते. त्यामुळे साधकाकडून देवाला अपेक्षित अशी संपर्काची सेवा घडते.
३. जिज्ञासूचा सकारात्मक भाग लक्षात येतो. जिज्ञासूमध्ये होत असलेल्या पालटांचा अभ्यास झाल्याने त्याला वेळोवेळी साधनेसाठी प्रोत्साहन देता येते.
२ आ. जिज्ञासूंच्या निरीक्षणाच्या नोंदी न ठेवल्याने होणारी हानी ! : साधकाला समोरच्या व्यक्तीशी बोलतांना ‘ती जिज्ञासू आहे कि नाही ?’, हेच न समजल्याने साधकाचे बोलणे विषयाला सुसंगत होत नाही किंवा साधकाने जिज्ञासूला त्याच्या कलाने आणि टप्प्याटप्याने साधना न सांगितल्याने त्याला तो विषय समजणे कठीण जाते. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘पातळीनुसार साधना’ हा विषय सांगितला आहे. त्याला अनुसरून जिज्ञासूला साधना सांगितल्यास त्याला ती पटकन आकलन होते आणि करावीशी वाटते; नाहीतर त्याला ते कठीण अन् नकोसे वाटते. त्यामुळे साधकाचा जिज्ञासूच्या समवेत सुसंवाद होत नाही आणि त्याच्याशी जवळीक निर्माण होत नाही. त्यामुळे जिज्ञासू साधकाला टाळतो; परिणामी संपर्काची फलनिष्पत्ती अल्प होते.
३. सूक्ष्मातील कळणे
३ अ. अध्यात्मप्रसाराची सेवा करतांना साधकाला सूक्ष्मातील कळण्याचे महत्त्व ! : ‘जिज्ञासूचे स्थुलाच्या समवेत सूक्ष्मातून निरीक्षण कसे करायचे ?’, हेही देवाने मला शिकवले. यातून सूक्ष्मातील कळण्याचे महत्त्व माझ्या लक्षात आले.
१. ईश्वरी तत्त्व सूक्ष्मतम आहे. या आपत्काळात देव साधकाला सूक्ष्मातून अखंड मार्गदर्शन करतच आहे; पण ‘देवाने केलेले मार्गदर्शन समजण्यासाठी साधकाला सूक्ष्मातील कळणे आवश्यक आहे’, असे मला वाटते.
२. सूक्ष्मातील कळू लागल्यामुळे साधकाची समष्टी सेवा अधिक चांगल्या प्रकारे होते. सूक्ष्मातील कळण्यामुळे जिज्ञासूंना संपर्क अचूक आणि देवाला अपेक्षित असा होण्यास साहाय्य होते.
‘सूक्ष्मातून काही सूत्रे समजल्यावर माझा अहं वाढेल का ?’, अशी भीती देवाला शरण गेल्याने रहात नाही. ‘देव सर्व पाहील’, असे वाटते.
– श्री. धनंजय हर्षे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.३.२०२१)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |
या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/678345.html