भारत पाकवर आणखी एक ‘सर्जिकल स्ट्राईक’ करण्याची शक्यता !  

  • पुंछ येथील आतंकवादी आक्रमणाचे प्रकरण

  • पाकचे भारतातील माजी राजदूत अब्दुल बासित यांचा दावा

(‘सर्जिकल स्ट्राईक’ म्हणजे आतंकवाद्यांवर गोपनीय पद्धतीने केलेली  कारवाई)

पाकचे भारतातील माजी राजदूत अब्दुल बासित

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानात सध्या भारताकडून आणखी एका सर्जिकल स्ट्राईकच्या धोक्याची चर्चा चालू आहे. हे हवाई आक्रमणही असू शकते. मला हेही वाटते की, भारतात शांघाय सहकार्य परिषद होणार आहे आणि जी २० संघटनेचे अध्यक्षपद भारताकडे आहे. त्यामुळे ‘तो हे पाऊल उचलेल का ?’, असेही मला वाटते. तसे पुढच्या वर्षी तिथे निवडणूक आहे आणि त्यामुळे कोणत्याही आक्रमणाचा धोका पुष्कळ अधिक असेल. सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी पाकिस्तानवर एखादे आक्रमण होऊ शकते, अशी भीती पाकचे भारतातील माजी राजदूत अब्दुल बासित यांनी केले आहे. २० एप्रिल या दिवशी काश्मीरच्या पुंछ येथे आतंकवाद्यांनी सैन्याच्या ट्रकवर केलेल्या आक्रमणात ५ सैनिक वीरगतीला प्राप्त झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर बासित यांनी हे विधान केले आहे. बासित यांनी त्यांच्या यू ट्यूब चॅनलवरून एक व्हिडिओ प्रसारित केला आहे. यात त्यांनी ही भीती व्यक्त केली आहे.

पुंछ येथील आक्रमणाविषयी बासित म्हणाले की, ज्यानेही पुंछमध्ये भारतीय सैन्यावर आक्रमण केले असेल, त्याने केवळ सैन्याला लक्ष्य केले. कोणत्याही नागरिकाला लक्ष्य केले नाही. ते मुजाहिदीन (लढवय्ये) असू शकतात, ते त्यांच्या अधिकाराचा लढा देत आहेत. जेव्हा कोणतेही आंदोलन होते, तेव्हा सैन्याला लक्ष्य केले जाते. (काश्मीरमध्ये आतंकवाद्यांनी आंदोलन पुकारले नसून तो जिहाद आहे. असा शब्दच्छल करून बासित आतंकवाद्यांची तळी उचलत आहेत ! – संपादक) सामान्य नागरिकांना नाही. भारताला चांगल्या प्रकारे ठाऊक आहे की, तो सध्या कुठे उभा आहे.

संपादकीय भूमिका

भारताने पाकच्या विरोधात सर्जिकल स्ट्राईकसारखी कारवाई करण्याऐवजी त्याचा सोक्षमोक्ष लावणारी कारवाई करणेच आवश्यक !