कोरोना काळात शासनाच्या निर्बंधांचे उल्लंघन करून श्री देव भैरीची मिरवणूक काढल्याचे प्रकरण
रत्नागिरी – कोरोना काळात शासनाच्या निर्बंधांचे उल्लंघन करून श्री देव भैरीची मिरवणूक काढल्याच्या प्रकरणी वर्ष २०२० मध्ये ११ जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला होता. रत्नागिरी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी माणिकराव सातव यांनी या सर्वांची आता निर्दोष मुक्तता केली. या नागरिकांच्या वतीने अधिवक्ता अविनाश शेट्ये यांनी युक्तीवाद केला.
कोरोना काळात त्याचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी येथील जिल्हाधिकारी यांनी सार्वजनिक कार्यक्रम करण्यास मनाई आणि जमावबंदी केली होती. याच कालावधीत ३० जून २०२० सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास श्री भैरीची पालखी मिरवणूक काढण्यात आली होती. त्यामुळे या प्रकारणी पोलिसांनी १३ जणांविरुद्ध गुन्हा नोंद केला होता. या खटल्यादरम्यान दोघांचे निधन झाले होते. त्यामुळे ११ जणांवर गुन्हा नोंद करून न्यायालयापुढे दोषारोपपत्र ठेवण्यात आले. नागरिकांच्या दोषसिद्धीसाठी कोणताही सबळ, संयुक्त पुरावा न्यायालयापुढे ठेवण्यात आलेला नसल्याने सर्वांची निर्दाेष मुक्तता करण्यात आली.